आपल्या देशाला मंदिरांचा देश म्हणून देखील एक अलिखित ओळख आहे. भारतामध्ये अगणित लहान मोठी नवीन जुनी मंदिरं आहेत. मुख्य म्हणजे प्रत्येक मंदिरामागे एक इतिहास, एक कथा नक्कीच आहे. अशा या मंदिरांच्या देशामध्ये एक असे देखील मंदिर आहे, जे फक्त वर्षातून एकदाच फक्त दिवाळीच्या दिवसांमध्येच उघडते आणि इतर दिवस ते मंदिर बंद असते. दिवाळीचे दिवस झाले की, दिवा लावून पुढील वर्षभरासाठी हे मंदिर बंद करण्यात येते. मुख्य बाब म्हणजे हसनंबा मंदिर भारतातील एक मात्र असे मंदिर आहे, जे फक्त दिवाळीमध्ये उघडते.
अवघ्या काही दिवसांवर दिवाळी आली आहे. सगळीकडे दिवाळीचा आनंद आणि उत्साह पाहायला मिळत असून, दुकानं देखील विविध वस्तुंनी सजले आहे. दिवाळी म्हणजे वर्षातला सर्वात मोठा सण. दिवाळीआधी घरातील साफसफाई केली जाते आणि नंतर लक्ष्मी देवीचे पूजन केली जाते. याच दिवाळीच्या दिवसांमध्ये कर्नाटक कर्नाटक राज्यातील बेंगळुरू पासून १८० किमी अंतरावर हसनंबा मंदिर आहे. जे देवीला समर्पित आहे.
हे मंदिर फक्त दिवाळीमध्येच आठवडाभर उघडण्यात येते. या मंदिरात मंदिर बंद करताना ठेवलेली फुले देखील ताजी राहातात आणि इथे लावलेला दिवा देखील वर्षभर जळत असतो. यासोबतच या मंदिराबद्दल अनेक रहस्यमयी गूढ गोष्टी देखील आहे. चला जाणून घेऊया या मंदिराबद्दल.
कर्नाटकातील जुन्या म्हैसूर हसन जिल्ह्यात असलेले हसनंबा मंदिर अतिशय रहस्यमय मानले जाते. हसनंबा मंदिर हे वर्षातून एका आठवड्यासाठी म्हणजेच सात दिवसांसाठी दिवाळीत उघडले जाते. या मंदिरात हसनंबा देवीची पूजा केली जाते. या मंदिराला भेट देण्याची एक विशिष्ट वेळ आहे. हे मंदिर सकाळी ७ ते १० आणि दुपारी ३ ते रात्री १० पर्यंत सुरू असते.
हे मंदिर १२ व्या शतकात बांधण्यात आले असल्याचे इतिहासकार सांगतात. जवळपास ८२३ वर्ष जुने मंदिर म्हणून देखील याची ख्याती आहे. या मंदिरातील देवीच्या दर्शनासाठी दुरून भक्त दर्शनासाठी येतात. हे मंदिर वर्षातून एका आठवड्यासाठी उघडत असल्यामुळे या एका आठवड्यादरम्यान मंदिराला भेट देण्यासाठी भाविक गर्दी करतात. या दरम्यान हसनंबा देवीचे दर्शन घेता आले तर भाविक स्वत:ला भाग्यवान समजतात.
तसेच हे एक चमत्कारिक मंदिर आहे असे सांगण्यात येते. भक्त इथे पत्र लिहून इच्छा मागतात आणि त्यांच्या इच्छा देवी पूर्ण करते. देशातील हे पहिले मंदिर आहे. जिथे भक्त देवी आईला पत्र लिहून आपली इच्छा व्यक्त करतात. दिवाळीच्या पर्वावर मोठ्या संख्येने भक्तगण इथे दर्शनासाठी पोहचतात. यामंदिरात देवीला फक्त तांदळाचा नैवेद्य दाखवण्यात येतो.
हे हसनंबा देवीचे मंदिर दिवाळीनंतर बंद करण्यापूर्वी या मंदिरात दिवे लावले जातात आणि ताजी फुले देवीला वाहिली जातात. असे म्हणतात की मंदिरात १ आठवडा पूजा असते आणि शेवटच्या दिवशी पूजा केल्यानंतर मंदिराचे दरवाजे बंद केले जातात आणि पुन्हा पुढील वर्षी उघडले जातात. ज्या दिवशी मंदिराचे दरवाजे बंद केले जातात त्याआधी इथे एक दिवा लावला जातो. जेव्हा पुढच्या वर्षी हे मंदिर उघडले जाते तेव्हा हा दिवस तसाच जळत असतो आणि वाहिलेली फुले देखील ताजी असल्याचे दिसून येते. शिवाय देवीला अर्पण केलेला प्रसाद देखील पुढील वर्षापर्यंत ताजा राहतो.
=======
हे देखील वाचा : सकाळी लवकर उठण्याचे फायदे
=======
पौराणिक आख्यायिका
या मंदिराची पौराणिक आख्यायिका आहे की, अंधकासुर या राक्षसाने ब्रह्मदेवाकडून अदृश्य होण्याचे वरदान मागितले होते. यानंतर त्याने पृथ्वीतलावावर अत्याचार करण्यास सुरुवात केली. त्यानंतर भगवान शिवाने त्याला मारण्याचा निर्णय घेतला. ज्या वेळी भगवान शिवाने अंधकासुराचा वध करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याच्या शरीरातून रक्ताच्या थेंबाने तो राक्षस पुन्हा जिवंत व्हायचा. शेवटी शिवाने आपल्या सामर्थ्याने योगेश्वरी देवीची निर्मिती करून राक्षसाचा संहार केला.