आदिमाया आदिशक्तीचा सध्या जागर चालू आहे. शारदीय नवरात्राच्या निमित्ताने सर्वत्र देवीच्या नऊ रूपांची यथासांग पूजा होत आहे. तिची सेवा करत तिचा आशीर्वाद घेत आहे. आपल्या देशामध्ये नवरात्राला खूप मोठे महत्व आहे. नवरात्र म्हणजे महिषासुराचा वध करण्यासाठी देवीने या नऊ दिवसांमध्ये नऊ रूप घेतली आणि त्या दृष्ट राक्षसाचा वध केला. याच नवरात्रीच्या निमित्ताने आज आपण महाराष्ट्रातील अजून एक महत्वाचे शक्तीपीठ जाणून घेणार आहोत.
आजचे शक्तीपीठ आहे, महाराष्ट्रातील अतिशय प्रसिद्ध आणि जागृत असे अंबाजोगाई येथील योगेश्वरी देवी. महाराष्ट्रातील मराठवाडा भागातील बीड जिल्ह्यात हे शक्तीपीठ वसलेले आहे. अंबाजोगाई हे शहर जयवंती या नदीच्या काठी वसलेले आहे. अंबाजोगाईमध्ये योगेश्वरी देवीचे प्रसिद्ध मंदिर आहे. खास करून कोकणी लोकांची म्हणजेच कोकणस्थ ब्राह्मणांची आराध्य देवता किंवा कुलदैवत म्हणून योगेश्वरी देवी प्रसिद्ध आहे. या देवीच्या दर्शनास भाविक मोठ्या संख्येने येत असतात. ही देवी ही महाराष्ट्रातील बऱ्याच जणांची कुलदेवता, कुलदेवी असून, ते येथे दर्शनासाठी येत असतात.
मराठी भाषेचा उगम बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे झाला आहे. देशातील सर्व भाषातज्ज्ञांचे देखील यावर एकमत आहे. त्यामुळे अंबाजोगाई हे ठिकाण मराठी भाषेची जननी म्हणून ओळखले जाते. मराठी भाषेचे आद्यकवी मुकुंदराज यांनी विवेकसिंधू या ग्रंथांची रचना याच ठिकाणी केल्यामुळे अंबाजोगाईला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
अंबाजोगाई हे मराठवाड्यातील परळी वैजनाथपासून २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या योगेश्वरी मंदिरासाठी प्रसिद्ध आहे, हे मंदिर बीड जिल्ह्यातील सर्वात महत्वाच्या मंदिरांपैकी एक आहे. योगेश्वरी हे एक संस्कृत नाव असून, याचा अर्थ “देवी दुर्गा” आहे. श्री योगेश्वरी हे दुर्गा देवीचे प्राचीन मंदिर आहे, जे देवीच्या महत्वाच्या शक्तीपीठांपैकी एक अंबेजोगाई येथे आहे.
योगेश्वरी देवी आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारी देवी म्हणून प्रसिद्ध आहे. शहरातून वाहणाऱ्या जयंती नदीच्या पश्चिमेला या योगेश्वरी देवीचे मंदिर आहे. मंदिराची रचना हेमाडपंथी शैलीची आहे. देवी अंबाबाईचे योगेश्वरी हे संस्कृत नाव आहे ज्याचा अर्थ “देवी दुर्गा” असा होतो. अंबाजोगाईची योगेश्वरी देवी हे मराठवाड्यामधील मोठे तीर्थक्षेत्र मानले जाते.
देवी योगेश्वरी ही साक्षात आदिमाया आदिशक्तीने घेतलेले रूप. ही देवी अंबाजोगाई येथे वास्तव्यास आहे. दंतासूर नावच्या एका राक्षसाने प्रचंड उन्माद माजवला होता. त्याचा वध करण्यासाठी देवीने योगेश्वरीचे रूप घेतले आणि त्याचा वध करत लोकांना त्याच्या जाचातून मुक्त केले.
अमूर्त अनघड अशा तांदळ्याच्या रूपातली ही योगेश्वरी देवी कुमारिका आहे. यामागे देखील एक कथा सांगितली जाते. परळीच्या वैजनाथांचा योगेश्वरीशी विवाह निश्चित करण्यात आला. लग्नाचा मुहूर्त ठरला; पण तो मुहूर्त टळून गेला आणि देवीचा विवाह झाला नाही. यामुळे देवी कुमारिकाच राहिली आणि परत कोकणात न जाता, देवी ज्या ठिकाणी राहिली, ते ठिकाण म्हणेज आंबाजोगाई.
=======
हे देखील वाचा : नवरात्राची चौथी माळ – कुष्मांडा देवी पूजन
=======
देवी पार्वतीचे रूप असलेल्या देवी अंबा या नावावरून अंबाजोगाई शहराला हे नाव पडले. जयवंती नदीच्या काठावर वसलेले हे शहर जयवंतीनगर म्हणूनही ओळखले जात असे. योगेश्वरी देवीचे ऐतिहासिक आणि सर्वात जुने मंदिर प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. या मंदिराच्या खांबावरील नाजूक नक्षीकाम अतिशय आकर्षक आहे. उत्तर दरवाजाला लागूनच ‘सर्वेश्वर तीर्थ’ आहे. पश्चिम दरवाजाला लागून विविध देवतांची मंदिरे आहेत. दसऱ्याच्या वेळी येथे मोठा उत्सव असतो.
योगेश्वरी मंदिराला पूर्वेकडे मुख्य प्रवेशद्वार आहे. एक ‘नगरखाना’ असून, संगीतकारांसाठी जागा आणि दीपमाळ आहे. पूर्वेकडील प्रवेशद्वारातून मंदिराच्या संकुलात प्रवेश केल्यावर, भक्तांना चार लहान बुरुजांनी वेढलेला एक उंच बुरुज दिसतो. उंच मनोरा देवदेवतांच्या चित्रांनी सजलेला आहे. मंदिरातील तांबूल प्रसाद ही या मंदिरातील अनोखी गोष्ट आहे. तांबूल प्रसादात ठेचलेले पान असते. साक्षी गणेश मंदिर जे चालण्याच्या अंतरावर आहे. मंदिरात येणाऱ्या प्रत्येकाला हा गणपती आठवतो असे सांगितले जात आहे.
देवीचा मुख्य उत्सव हा मार्गशीर्ष महिन्यात पौर्णिमेला, म्हणजेच दत्त जयंतीला साजरा केला जातो. अश्विन महिन्यातील शारदीय नवरात्र उत्सवही तितक्याच मोठ्या प्रमाणात साजरे केले जाते.