दिवाळी आपल्या भारतातला आणि वर्षातला सर्वात मोठा सण. तिमिरातुनी तेजाकडे जाण्याची शिकवण देणारा दिवाळीचा सण सगळ्यांनाच आवडतो. फटाक्यांच्या आतिषबाजी, पणत्या, आकाशकंदीत, फराळाच्या पदार्थांची रेलचेल, रांगोळी, तोरण आदी सर्वच गोष्टी दिवाळीमध्ये आपसूकच येतात. पाच दिवस दिवाळीचा सण असतो. या पाचही दिवसांचे आपापले स्वतःचे वेगळे महत्व आहे. या दिवाळीमध्ये सकाळी सर्वात आधी पार पडते ते अभ्यंगस्नान. सुगंधित उटणे, तेल लावून घरातल्या लोकांची अंघोळ होते.
दिवाळीमध्ये उटण्याची अंघोळ खूपच सामान्य बाब आहे. बहुतांशी लोकंच्या घरी उटणे केवळ दिवाळीतच वापरले जाते. उटण्याची अंघोळ केल्याने एक सुवास आजूबाजूला दरवळतो. सोबतच प्रसन्न देखील वाटते. दिवाळीच्या पाच दिवसात आपण जे उटणे वापरतो, त्यामागे एक शास्त्र असते. अभ्यंगस्नानासाठी वापरण्यात येणारे सुगंधी उटणे विविध नैसर्गिक घटकांपासून तयार केले जाते. उटणे हे आयुर्वेदिक स्क्रबच आहे. थंडीतच नाही तर संपूर्ण वर्ष आपण हे उटणे वापरू शकतो. उटण्यामुळे आपल्या त्वचेला अनेक फायदे होतात. हे फायदे कोणते आहेत ते जाणून घेऊया.
सुरकुत्या कमी
प्रत्येक व्यक्तीला वयानुसार त्वचेला सुरकुत्या पडू लागतात. तुम्ही उटणे लावले तर या उटण्यामुळे सुरकुत्या पडण्याचे प्रमाण कमी होते. उटण्यात असलेल्या हळदीमध्ये अॅन्टी एजिंग घटक असल्याने त्याचा त्वचेला फायदा होतो. त्वचा दीर्घकाळ तजेलदार आणि टवटवीत दिसते.
मुलायम त्वचा
दिवाळी थंडीच्या दिवसात येते. थंडीमुळे आपली त्वचा कोरडी होते. अनेकदा या कोरड्या त्वचेला खाज येते. या समस्येपासून सुटका करून घेण्यासाठी पूर्वीपासून उटण्याचा वापर केला जातो. उटण्यामधील आयुर्वेदिक घटकांमुळे त्वचेचा कोरडेपणा कमी होऊन ती मुलायम होण्यास मदत होते.
अनावश्यक केसांची वाढ खुंटते
चेहऱ्यावरील किंवा हाता-पायावरील केस जास्त वाढू नयेत उटणे हा अतिशय उत्तम पर्याय ठरू शकतो. उटणे लावून गोलाकार पद्धतीने स्क्रब केल्यास शरीरावरील अनावश्यक केसांची वाढ थांबण्यास मदत होते.
चमकदार त्वचा
उटण्यामध्ये रक्तचंदन, वाळा, चंदन, वेखंड, कात, नागरमोथा यासारख्या वनस्पती आणि खोडांचा वापर केला जातो. हे घटक त्वचेवर स्क्रबर म्हणून काम करतात. यामुळे काळवंडलेली त्वचा उजळण्यास मदत होते. याशिवाय उटण्याच्याबरोबरीने त्वचेवर बेसन पीठही लावल्यास ते अधिक फायद्याचे ठरते.
स्वच्छ त्वचा
उटण्यामधील आयुर्वेदिक घटकांमुळे संसर्ग कमी होते. परिणामी अॅक्ने, पिगमेंटेशन, स्कार्स कमी होते. सूर्यप्रकाशामुळे झालेले त्वचेचे नुकसान टाळण्यास मदत होते. आठवड्यातून एकदा उटण्याचा वापर केल्याने त्वचा निरोगी राहते.
मुरुम, पुरळ कमी
उटण्यामुळे त्वचा मऊ आणि गुळगुळीत तर होतेच. त्याचबरोबर त्यात मुरुमांपासून बचाव करण्यासाठीचे नैसर्गिक गुणधर्म देखील आहेत. हळद आणि चंदनमध्ये अँटी बॅक्टीरियल आणि एँटी फंगल गुण आढळतात. हे त्वचा आतून स्वच्छ करुन मुरुम/पुरळ होण्याची शक्यता कमी करण्यास मदत करतात.
अशाप्रकारे बनवा घरच्या घरी उटणे
२ चमचे मुलतानी मिट्टी
२ चमचे चंदन पावडर
अर्धी वाटी बेसन अर्थात चणा डाळीचे पीठ
अर्धी वाटी मसूर डाळीचे पीठ
१ चमचा कचोरा पावडर
१ चमचा आवळा पावडर
१ चमचा वाळा पावडर
१ चमचा अनंतमूळ पावडर
१ चमचा गुलाब पावडर
पाव चमचा आंबेहळद, पाव चमचा हळद, पाव चमचा दारूहळद
१ चमचा नागरमोथा पावडर
========
हे देखील वाचा : या दिवाळीत नक्की करून बघा ‘हे’ विविध प्रकारचे लाडू
========
वरील सर्व साहित्य एकत्र करून मिक्सरमध्ये फिरवून घ्या. मात्र उटणे लावण्यापूर्वी यातील कोणत्याही गोष्टीची तुमच्या त्वचेला अलर्जी नाही याची पहिले काळजी घेऊन पॅच टेस्ट करा आणि मगच वापरा
(वरील सर्व साहित्य तुम्हाला आयुर्वेदिक दुकानात किंवा ऑनलाइन सुद्धा मिळेल)