आता दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. घराची साफसफाई झाली असून आता गृहिणी मुख्य कामाला लागणार असतील तर काहींनी सुरुवात देखील केली असेल. ते मुख्य काम म्हणजे दिवाळीचा फराळ. दिवाळी म्हटले की, रोषणाई, आकाशदिवे, पणत्या, फटाके हे सर्व तर ओघाने येतेच. मात्र दिवाळीचे महत्वाचे किंबहुना मुख्य आकर्षण असते, तो म्हणजे दिवाळीचा फराळ. आजच्या आधुनिक काळात दिवाळीच्या फराळातील सर्वच पदार्थ रोजच उपलब्ध असतात. मात्र पूर्वीच्या काळी दिवाळीमध्ये तयार होणारे पदार्थ फक्त दिवाळीतच केले जायचे, त्यामुळे त्याचा एक वेगळा आनंद आणि उत्साह असायचा.
आजजरी सर्व पदार्थ रोज मिळत असले, तरी दिवाळीच्या दिवसांमध्ये घरी सगळ्यांसोबत फराळ खाण्याची मजा काही औरच असते. घरातील स्त्रिया त्याच्या वेळेनुसार फराळ बनवतात आणि नैवेद्य झाला की घरच्यांना देतात. महाराष्टरातील दिवाळी म्हणजे फराळ. आज या लेखातून दिवाळीच्या फराळातील मुख्य पदार्थांच्या रेसिपी आपण पाहणार आहोत.
भाजणी चकली
साहित्य
दोन किलो तांदूळ
एक किलो हरभरा डाळ
अर्धा किलो उडीद डाळ
100 ग्रॅम धणे
50 ग्रॅम जिरे
चवीपुरते मीठ
तेल (तळण्यासाठी आणि मोहनाकरिता)
कृती
तांदूळ स्वच्छ धुवा आणि कपड्यावर वाळत घाला. हरभरा डाळ आणि उडीददेखील वेगवेगळे धुवा आणि कपड्यावर वाळवून घ्या. पूर्ण एक दिवस वाळल्यानंतर दुसऱ्या दिवशी कढईमध्ये हे तिन्ही वेगवेगळे यामध्ये धने घालून भाजून घ्या. सर्व भाजून झाल्यावर त्यात जिरे मिसळा. त्यानंतर त्याची भाजणी तयार करा. भाजणी मध्ये तेल अथवा तुपाचे मोहन भिजवताना घाला. भाजणी भिजवताना गरम पाण्याचा वापर करावा. खूप घट्ट अथवा सैल मळू नये अन्यथा चकली कडकडीत होते. चकलीपात्रात मळलेले पीठ घालून नंतर व्यवस्थित त्या चकल्या पाडा आणि तेल व्यवस्थित तापले आहे की नाही ते पाहूनच मग तळायला घ्यावे. चकली काढल्यानंतर थंड झाल्यावरच डब्यात भरावी
तांदळाच्या पिठाच्या चकली
साहित्य
दोन वाट्या तांदूळ पीठ
हिंग
धने – जिरे पावडर 1-1 चमचा
पाव वाटी लोणी
पांढरे तीळ
ओवा,
चवीपुरते मीठ
अर्धा चमचा तिखट
कृती
तांदळाच्या पिठामध्ये सर्व साहित्य मिक्स करून घ्या. साध्या पाण्याने हे पीठ घट्ट भिजवा. चकल्या पाडा आणि तळा
चिवडा
साहित्य
अर्धा किलो पातळ पोहे
अर्धी वाटी डाळं (भाजलेली चणाडाळ)
अर्धी वाटी शेंगदाणे
सुक्या खोबऱ्याचे बारीक काप पाव वाटी
कडिपत्ता
हिरव्या मिरच्यांचे तुकडे
तेल
मोहरी
हिंग
हळद
मीठ
साखर
काजू, बेदाणे (हवे असल्यास)
कृती
पातळ पोहे तुम्ही आधी उन्हात वाळवून घ्या आणि मग पातेल्यात व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या. कढईत तेल घ्या. त्यामध्ये शेंगदाणे, डाळं आणि काजू, सुकं खोबऱ्याचे तुकडे घाल आणि व्यवस्थित भाजा. त्यानंतर ते बाहेर काढा आणि त्यात मोहरी, हिंग, हळद, कढिपत्ता, मिरच्या हे घालून वरून पुन्हा शेंगदाणे आणि इतर साहित्य घालून ढवळावे आणि खमंग वास सुटल्यावर भाजलेले पोहे घालून व्यवस्थित मिक्स करून मंद आचेवर ढवळावे
तिखट शंकरपाळे
साहित्य
2 वाट्या गव्हाचे पीठ
दीड चमचा साखर
चिमूटभर हळद
मीठ
जिरे
तिखट
तळण्यासाठी तेल
कृती
गव्हाच्या पिठात वरील सर्व साहित्य मिक्स करून घ्या आणि पाण्याने पीठ घट्ट भिजवून घ्या. गोळे करून लाटा आणि कातणीने बारीक शंकरपाळ्या करून घ्या. मंद आचेवर तेलात तळा. हे तिखट शंकरपाळे खुसखुशीत होतात.
ओल्या नारळाच्या करंज्या
साहित्य
ओलं खोबरं (एक नारळ)
चिरलेला गूळ
वेलची पावडर
काजू – बदाम – बेदाणे (हवे असल्यास)
तूप
गव्हाचे पीठ
मीठ
पाणी
कृती
कणीक मळून घ्या आणि कापडाखाली झाकून ठेवा. एका भांड्यात ओलं खोबरं आणि गूळ एकत्र करून ते भाजून घ्या. व्यवस्थित मिक्स झाले की त्यात वेलची पावडर, काजू, बदाम आणि बेदाणे घाला आणि मिश्रण थंड होऊ द्या. कणेकेचे गोळे करून छोटी पोळी लाटा आणि त्यात हे सारण भरा आणि करंजीच्या आकारात तयार करा. तेल गरम करून मंद आचेवर या करंज्या तळा.
चंपाकळी
साहित्य
1 वाटी मैदा,
मोहन – 2 चमचे तेल किंवा तूप
1 वाटी साखर
तळण्यासाठी तेल
कृती
मैद्यात मोहन घालून थोडे घट्ट भिजवून ठेवावी अर्धा तास. साखरेचा एकतारी पाक करून ठेवायचा, पाकात थोडा केशरी रंग घालायचा. मैद्याच्या पुरी लाटून मधे कापायची केलेली पुरी दोन बाजूला धरुन उलट सुलट अलगद पीळ भरायचा नंतर मंद गॅसवर तळून घ्यावे आणि पाकात टाकावे ती चाफा कळी सारखी दिसते म्हणून ती चंपाकळी.
बेसन लाडू
साहित्य
बेसन
तूप
पिठी साखर
बेदाणे
वेलची पूड
दूध
कृती
तुपावर बेसन खमंग भाजून घ्यावे. गॅस मंद ठेवावा अन्यथा पीठ जळण्याची शक्यता असते. पीठ भाजून झाले की त्यावर थोडेस दूध शिंपडून बाजूला ठेवावे. मिश्रण कोमट झाले की त्यात पिठी साखर, वेलची पूड, बेदाणे घालून पुन्हा एकदा हलकेसे भाजून घ्या. नंतर लाडू वळून घ्या आणि सुकू द्या
=========
हे देखील वाचा : उटणे लावण्याचे ‘हे’ आहेत चमत्कारिक फायदे
=========
अनारसे
साहित्य
एक वाटी तांदूळ
किसलेला गूळ
एक चमचा तूप
खसखस
तळण्यासाठी तेल
कृती
तीन दिवस तांदूळ पाण्यात भिजवून ठेवा. रोज सकाळी याचे पाणी बदला. चौथ्या दिवशी तांदूळ कोरडे करून घ्या आणि मिक्सरमधून एकदम बारीक वाटून घ्या. किसलेला गूळ आणि तूप बारीक केलेल्या तांदळात टाका. सर्व एकत्र करून घट्ट मळून घ्या. हा तयार केलेला गोळा तुम्ही चार ते पाच दिवस एका डब्यात ठेऊन द्या. पाच दिवसांनी बाहेर काढून मळून घ्या. त्याचे छोटे गोळे करून पुरीसारखे लाटा आणि त्यावर खसखस घालून ते तेलात अथवा तुपात तळा.