मंदिरांचा देश म्हणून भारताची जगामध्ये एक वेगळीच ओळख आहे. प्रत्येक चौकाचौकांमध्ये एक प्रसिद्ध आणि जुने मंदिर आपल्याला दिसून येतेच. भारतात विविध देवांची अगणित मंदिरं आपल्याला दिसून येतात. भारताला ऐतिहासिक, भोगोलिक, धार्मिक आदी सर्वच बाबतीत अतिशय मोठा आणि जाज्वल्य असा इतिहास लाभला आहे. यातल्या आपण धार्मिक इतिहासाबद्दल जर आपण बोलायचे ठरवले तर अनेक वर्ष लागतील यावर बोलायला. इतके छोटे, मोठे अनेक पैलू या इतिहासाला आहेत. ()
धार्मिक लोकांचा देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतामध्ये सर्वात जास्त पूजनीय देवतांमध्ये पहिले नाव येतं ते भगवान शिव शंकराचं. भारतात जेवढी मंदिरं आहेत त्यापैकी बहुतकरून मंदिरांचा संबंध, इतिहास हा शंकराशी संबंधित असल्याचे आपल्याला प्रकर्षाने जाणवेल. आज भारतामध्ये शेकडो वर्ष जुनी जी शिवाची मंदिरं आहेत, त्यांचा संबंध आपल्याला महाभारत किंवा रामायणाशी असल्याचे पाहायला मिळते. असेच एक भारतातील सर्वात जुने आणि सर्वाधिक उंचीवर असलेले एक महादेवाचे मंदिर म्हणजे तुंगनाथ मंदिर. उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यात हे मंदिर स्थित आहे. तुंगानाथ मंदिराचा पंच केदारमध्ये समावेश होतो.
उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यात समुद्रसपाटीपासून ३६८० मीटर उंचीवर तुंगनाथ पर्वतावर आहे. तुंगनाथ पर्वतावर असल्याने या मंदिराचे नाव ‘तुंगनाथ’ असे ठेवण्यात आले आहे. अलकनंदा आणि मंदाकिनी या नद्याची खोरी येथूनच सुरु होतात. तुंगनाथ मंदिर अति प्राचीन म्हणजे तब्बल १ हजार वर्षापेक्षा जुने असल्याचे सांगितले जाते. मुख्य म्हणजे असे मानले जाते की, या मंदिरात शिवाचे हृदय आणि त्याचे हात असून त्याचीच पूजा केली जाते.
तुंगनाथ मंदिरात असलेल्या शंकराची पूजा करण्याची जबाबदारी मक्कामाथ गावातील एका स्थानिक ब्राह्मणावर आहे. माहितीनुसार मैथानी ब्राह्मण या मंदिरात पुजारी म्हणून काम करतात. सांगितले जाते की त्यांना ही जबाबदारी वारशाने मिळाली आहे. या मंदिरातून हिमालयाच्या सुंदर दऱ्या आपल्याला पाहायला मिळतात. अतिशय शांत आणि सुंदर निसर्ग आपण या मंदिराजवळून अनुभवू शकतो. मात्र तुंगनाथ मंदिरापर्यंत पोहचणे अजिबातच सोपे नाहीये.
हे मंदिर इतर मंदिरांसारखे अजिबातच नाही. इथल्या भगवान शिवाचे दर्शन आणि आशीर्वाद घेण्यासाठी मोठा तर्क करावा लागतो. ते म्हणतात ना देवाला प्राप्त करणे आणि त्याचा आशीर्वाद मिळवणे सोपे नाही. अगदी तसेच आहे हे मंदिर. अतिशय उंच आणि अवघड ट्रेक करून वर जावे लागेते. मात्र वरचे दृश्य पाहिले की, आणि देवाचे दर्शन घेतले की संपूर्ण थकवा निघून जातो.
महाभारत काळात बांधले गेले मंदिर?
एका आख्यायिकेनुसार तुंगनाथ मंदिर महाभारत काळात बांधले गेले. या मंदिराचा पाया अर्जुनने घातला होता. असे मानले जाते की हजारो वर्षांपूर्वी पांडवांनी भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी हे मंदिर बांधले होते. महाभारताच्या मोठ्या युद्धात झालेला नरसंहार आणि जिवलगांचा मृत्यू यामुळे पांडव खूपच खचले होते. आपल्या पापांच्या प्रायश्चित्तासाठी त्यांनी ऋषी व्यासांच्या आज्ञेनुसार, भगवान शिवाची पूजा केली आणि तुंगनाथ येथे शंकराचे मंदिर बांधले. अशी मान्यता आहे की, भगवान शिवाच्या कृपेने पांडवांची सर्व पापं नष्ट झाली.
या मंदिराबद्दल अजून एक कथा सांगितली जाते आणि ती म्हणजे, रावणाने भगवान शिव यांना प्रसन्न करण्यासाठी या ठिकाणी तप केले होते. शिवाय जेव्हा श्रीरामांनी रावणाचा वध केला, तेव्हा त्यांना रावण ब्रह्मन् असल्यामुळे ब्रह्महत्येचे पाप लागले. याच पापातून मुक्त होण्यासाठी श्रीरामांनी या ठिकाणी शिवाची तपश्चर्या केली. तेव्हापासून या जागेचे नाव ‘चंद्रशिला’ म्हणून प्रसिद्ध झाले. तर जमेल तेव्हा नक्की या मंदिराला भेट द्या. निसर्गाने भरभरून या जागेला जे सौंदर्याचे वरदान दिले त्याचा अनुभव याची देही याची डोळा तुम्हाला बघता येईल.