आजच्या धावपळीच्या काळात आपल्या शरीराची काळजी घेणे खूप आवश्यक आहे. पोषक आहार आणि नियमित व्यायाम हे शरीराच्या काळजीचे निकष आहे. मात्र आज सगळ्यांनाच भरपूर पैसा आणि करियरच्या मागे धावताना सगळ्यांनाच आपल्या आरोग्याचा विसरच पडला आहे. वेळ कमी आणि कामं फार असे सध्या झाले आहे.
मग वेळेअभावी कसे स्वतःला फिट ठेवावे? असा प्रश्न अनेकदा विचारला जातो आणि पडतो देखील. मग कसा फिटनेस जपावा? घरचे पोषक खाणे आणि कोणताही एक चांगला व्यायाम सकाळी १० ते १५ मिनिटांसाठी करणं नक्कीच तुम्हाला फिट ठेवण्यासाठी खूप लाभदायक ठरेल. मग असा कोणता एक व्यायाम प्रकार आहे, जो केल्यानंतर आरोग्याला फायदा होईल. तर असा एक सर्वांगीण व्यायाम म्हणजे सूर्य नमस्कार.
व्यायामामध्ये सूर्यनमस्काराला विशेष महत्व दिले गेले आहे. सूर्य नमस्कार हा एक पारंपारिक योग सराव आहे ज्यामध्ये १२ आसन समाविष्ट असतात. त्यामुळे एकाच व्यायामामध्ये आपण १२ आसन करतो त्यामुळे त्याचा मोठा सकारात्मक परिणाम आपल्या शरीरावर होतो. या सूर्यनमस्काराचे कोणते लाभ आपल्याला होतात ते जाणून घेऊया.
– सूर्यनमस्कार लवचिकता, शाररीक बळ आणि एकूण फिटनेस सुधारण्यास मदत करते. हे एकाग्रता वाढवून तणाव कमी करू शकते.
– सूर्यनमस्काराचा सरावामुळे शरीर संतुलित स्थिती राहते. यामुळे पाठदुखीपासून होणाऱ्या समस्या देखील कमी होतात.
– रोज सूर्य नमस्कार केल्याने शरीरातील ऊर्जा पातळी वाढते, ज्यामुळे दिवसभर उत्साही वाटते. सूर्य नमस्कारात विविध योगाचे आसन असल्यामुळे शरीरातील लवचिकता वाढते.
– सूर्यनमस्काराचा नियमित सराव केल्याने वजन कमी होण्यास मदत होते. सूर्यनमस्काराचा सराव कॅलरी बर्न करून, चयापचय वाढवतो आणि पचन सुधारतो.
– मानसिक ताण कमी करून सूर्य नमस्कार एकाग्रता वाढविण्यात मदत करतो. नियमित सरावामुळे शरीराची सहनशक्ती वाढून दीर्घकाळ शारीरिक श्रम सहन करण्याची क्षमता वाढते.
– सूर्यनमस्कार केल्याने तुमच्या संपूर्ण शरीराची स्थिती सुधारते. हा व्यायाम स्नायूंसाठी फायदेशीर आहे. सूर्य नमस्कार केल्यामुळे मणक्याचे दुखणे, मानदुखी आणि पाठदुखीमध्ये देखील आराम मिळतो. दररोज सूर्यनमस्कार केल्याने मणक्याचे संरेखन देखील सुधारते, आणि त्यामुळे शरीराची मुद्रा चांगली राहते.
– या धावपळीच्या जीवनात आपल्या सर्वांना एका गोष्टीची गरज आहे ती म्हणजे मानसिक तणावापासून मुक्तता. दररोज सूर्यनमस्कार केल्याने तुमचे मन शांत होते आणि तुमचा ताणही कमी होतो. याबरोबरच निद्रानाशाच्या समस्येपासूनही आराम मिळतो. यामुळे तुमचा फोकस देखील सुधारतो.
– सूर्यनमस्काराचा सराव कॅलरी बर्न करून, चयापचय वाढवतो, पचन सुधारतो आणि यामुळे शरीरातील वजन देखील संतुलित राहतं.
– सूर्यनमस्कारामुळे शरीरातील तणाव कमी होतो यामुळे तुमच्या झोपेची गुणवत्ता सुधारते.
– सूर्यनमस्कारामुळे तुमचे रक्त परिसंचरण सुधारते आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी समस्यांसाठी हे एक उत्तम आहे.
– मासिक पाळीतील अनियमितता देखील सूर्यनमस्कारांनी नियमित होते. सुलभ प्रसूतीसाठी सूर्यनमस्कार घालावेत. सूर्यनमस्कारांनी तुमचा चेहरा सतेज तर राहतोच पण सुरकुत्या पडण्यास प्रतिबंध होऊन तुम्ही चिरतरुण व उत्साही राहता.
– सूर्यनमस्कार करताना श्वासोच्छवासावर विशेष लक्ष द्यावे लागते. प्रत्येक स्थितीत दीर्घ श्वास घ्यावा लागेल आणि हळूहळू श्वास सोडावा लागेल. यामुळे तुमची फुफ्फुस मजबूत होते आणि तुमच्या फुफ्फुसाची क्षमताही वाढते.