मधल्या काही काळापासून मखाणा हा शब्द आपल्यासाठी खूपच सामान्य झाला आहे. अनेक लोकांच्या तोंडून, कलाकारांच्या तोंडून आपण मखाणाबद्दल ऐकले आहे. मात्र नक्की मखाणा आहे काय आणि ते खाल्ल्याने कोणते फायदे होतात चला पाहूया. अतिशय सोप्या भाषेत सांगायचे तर मखाणा म्हणजे कमळाचे बीज. मात्र संपूर्ण जग त्याला मखाणा म्हणूनच ओळखते.
गोल पांढऱ्या रंगाचे काळे डाग असलेले मखाणे खायला अगदी पॉपकॉर्न सारखेच लागतात. अतिशय हलके आणि चविष्ट असलेले हे लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांचेच आवडीचे आहे. बाजारात तर आता मखाणे वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये देखील मिळायला लागले आहेत. मधल्या वेळेतल्या भुकेसाठी स्नॅक्स म्हणून मखाणे खाणे अतिशय उत्तम पर्याय आहे. मखाणा हे पोषक तत्वांचे भांडार मानले जाते. कारण यामध्ये प्रथिने, फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि लोह मोठ्या प्रमाणात असते. मखाणे आपल्या शरीराच्या आणि आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उत्तम आहे. जाणून घेऊया मखाणे खाण्याचे फायदे.
वजन कमी करण्यासाठी
वजन कमी करायचे असेल तर आहारात मखाण्याचा समावेश फायदेशीर ठरू शकतो. वजनावर नियंत्रण ठेवायचे असेल तर रोज सकाळी रिकाम्या पोटी मखणा खावा. यामध्ये फॅट आणि कॅलरीज कमी असतात. या शिवाय फायबर भरपूर असते. त्यामुळे पोट जास्त काळ भरलेले राहण्यास मदत होते. यामुळे भूक लागत नाही.
हाडे मजबूत होतात
मखाणामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते. जे हाडे मजबूत करण्याचे काम करते. सकाळी रिकाम्या पोटी मखना खाल्ल्याने हाडांच्या संबधित समस्या दूर होऊ शकतात.
रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी
सकाळी रिकाम्या पोटी मखाणा खाल्ल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढू शकते. मखाणामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. ज्या रोगप्रतिकारशक्ती वाढवतात. शरीराला अनेक प्रकारच्या आजारांपासून वाचवण्याचे काम मखाणा करते.
रक्तातील साखरेवर नियंत्रण
सकाळी जर तुम्ही रिकाम्या पोटी मखाणा खाल्ला तर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी मखाणा खूप गुणकारी मानला जातो.
पचनक्रिया सुधारते
सकाळी रिकाम्या पोटी जर तुम्ही मखाणा खाल्ला तर पचनक्रिया देखील चांगली राहते. मखाणामध्ये मुबलक प्रमाणात फायबर आढळते, जे पचनक्रिया मजबूत करण्याचे काम करते. सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन केल्याने बद्धकोष्ठता, अपचन आणि ऍसिडिटी सारख्या समस्या सहज दूर होतात.
निद्रानाश होतो दूर
मखाणा नियमित खाल्ल्यामुळे निद्रानाशाचा त्रास दूर होतो. झोप न येण्याने शरीरामध्ये वातदोष निर्माण होते. मखाणा खाण्याने वाताचा नाश होतो आणि निद्रानाशाची समस्या दूर होण्यास मदत होते आणि व्यवस्थित झोप लागते.
अंगातील उष्णता कमी करण्यासाठी
अंगातील उष्णता सतत वाढण्याचा त्रास होत असेल तर मखाणा आहारात घ्यावा. शरीराला आणि पोटाला थंडावा देण्याचे काम मखाणा करते. अँटीऑक्सिडंट्स गुणधर्म असल्याने मखाणा शरीरातील उष्णता कमी करण्यास फायदेशीर ठरते.
अंगात येते ताकद
आजारी माणसाणे नियमितपणे मखाणा खाल्ल्यास अंगात ताकद येते. अशक्तपणा दूर करण्यासाठी मखाणा अतिशय पौष्टिक आहे. मखाण्याच्या बी मुळे शरीरातील कमकुवतपणा कमी होतो आणि ताकद वाढते.
पोषक तत्वांनी समृद्ध
मखाणामध्ये पोषक घटक मुबलक प्रमाणात आढळतात. यात केवळ प्रथिने आणि फायबरच नाही तर कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह आणि फॉस्फरस देखील भरपूर प्रमाणात आहे. त्यामुळे हाडे निरोगी राहण्यास, रक्तदाब नियंत्रित करण्यास आणि कोलेस्टेरॉलची पातळी राखण्यास देखील मदत करते. मज्जातंतूंच्या कार्यामध्ये आणि स्नायूंच्या आकुंचनासाठी देखील हे खूप फायदेशीर आहे.
हृदयासाठी फायदेशीर
मखाणामध्ये मुबलक प्रमाणात अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात, जे हृदयासाठी फायदेशीर मानले जातात. नाश्त्यामध्ये मखाणाचा समावेश केला तर हृदयाशी संबंधित समस्यांमध्ये ते फायदेशीर ठरेल. त्यामुळे हृदय निरोगी राहाते.