आपल्या भारतीय लोकांमध्ये जेवणाला अनन्यसाधारण महत्व आहे. प्रत्येकालाच अतिशय चविष्ट आणि चमचमीत जेवण लागते. भारतीय मसाल्यांचा पुरेपूर वापर करून केलेले जेवण जेवल्याशिवाय कोणाचीच भूक शांत होत नाही. मग असे चमचमीत जेवण झाल्यानंतर प्रत्येकालाच हवा असतो मुखवास. जेवल्यानंतर मुखवास म्हणून बडीशेप खाल्ली तरच जेवण पूर्णत्वास जाते असा समज असतो. कदाचित म्हणूनच हॉटेलमध्ये देखील बिलासोबत बडीशेप दिली जाते.
आपल्या देशात बडीशेपचे प्रेमी असंख्य लोकं आहेत. अनेकांना साधी, भाजलेली, मसाला घातलेली आदी विविध प्रकारची बडीशेप आवडीने खाल्ली जाते. ऑफिसमध्ये देखील ही बडीशेप अनेक लोकं छोट्या डब्यात घालून घेऊन जातात. एवढेच नाही तर मसाल्यांमध्ये देखील बडीशेपचे एक वेगळे स्थान आहे. बडीशेपमुळे पदार्थांची चव देखील वाढते. मात्र तुम्हाला माहित आहे का? ही बडीशेप आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. चला जाणून घेऊया या बडीशेपचे आरोग्यासाठी असणारे फायदे.
बीपी कंट्रोल राहते
तुम्हाला जर उच्च रक्तदाब अर्थात हाय बीपीची समस्या असेल तर दररोज न चुकता बडीशेप खाणे नक्कीच लाभदायक ठरेल. बडीशेप चघळल्याने लाळेतील नायट्रेटची पातळी वाढते. हा नैसर्गिक घटक रक्तदाबाची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतो. बडीशेपमध्ये असलेले पोटॅशियम रक्तदाब आणि हृदयाचे ठोके कंट्रोल करतात.
हृदयासाठी फायदेशीर
बडीशेपमध्ये भरपूर फायबर, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि कॅल्शियम असते, हे सर्व घटक हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात. यामध्ये आढळणारे फायबर हृदयरोगाचा धोका कमी करते.
प्रसूतीनंतर उपयुक्त
बडीशेपमध्ये लॅक्टोजेनिक गुणधर्म असतात, जे आईचे दूध वाढवण्यास मदत करतात. बडीशेप रक्तातील प्रोलॅक्टिनची पातळी वाढवण्यासाठी देखील उपयुक्त आहे. यामुळेच प्रसूतीनंतर मातांना बडीशेप खाण्याचा सल्ला दिला जातो.
रोगप्रतिकारशक्ती वाढवते
बडीशेप ही व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्सचा मोठा स्रोत आहे. हे दोन घटक यात भरपूर प्रमाणात असतात. याच्या सेवनाने रोगप्रतिकारशक्ती वाढते. यामुळे शरीराला आजारांशी लढण्याची ऊर्जा मिळते.
वजन कमी करण्यास उपयुक्त
बडीशेपचे पाणी पिऊन वाढलेले वजन कमी केले जाऊ शकते.. बडीशेपमध्ये भरपूर फायबर असते, त्यामुळे त्याचे सेवन केल्याने पोट दीर्घकाळ भरलेले वाटते आणि जास्त खाण्याची शक्यता कमी असते. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. बडीशेप चयापचय सुधारण्यासाठी देखील उपयुक्त आहे.
पोटाच्या समस्यांमध्ये लाभदायक
बडीशेप बद्धकोष्ठता, अपचन आणि सूज यासारख्या पोटाच्या समस्या कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. बडीशेप खाल्ल्याने शरीरात गॅस्ट्रिक एन्झाईम्स वाढतात जे पचन सुधारण्यासाठी फार लाभदायक असतात. पोटात जेव्हा जेव्हा अस्वस्थता जाणवते तेव्हा लगेच बडीशेपचा चहा बनवून प्या. बडीशेपचा चहा जलद प्रभाव दर्शवते.
======
हे देखील वाचा : मेंदूला हेल्दी ठेण्यासाठी महत्वाचे असतात हे 3 व्हिटॅमिन्स
======
त्वचाही चमकते
बडीशेपचे पाणी शरीरातील घाणेरडे विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते. शरीरातून विषारी पदार्थ बाहेर गेल्याने त्याचा प्रभाव शरीराच्या अंतर्गत भागावरच नाही तर बाहेर देखील दिसून येतो. त्यामुळेच आपली त्वचा स्वच्छ आणि चमकदार दिसते.
शरीरास थंड ठेवण्यात लाभदायक
बडीशेपचे सेवन केल्यास शरीर थंड होते. त्यामुळे जर तुम्हाला पोटात उष्णतेचा त्रास होत असेल तर बडीशेपचे सेवन सुरू करा. त्याचबरोबर दररोज बडीशेपचे सेवन केल्यास शरीर डिटॉक्स होते आणि रक्त स्वच्छ राहते.