बेलपत्र नाव उच्चारले की, डोळ्यासमोर येते ती महादेवाची पिंड. महादेवाच्या पिंडीवर किंबहुना महादेवाला बेलपत्र प्रचंड आवडते. आपल्या अध्यात्मिक मान्यतेनुसार महादेवाची पूजा ही बेलपत्राशिवाय नेहमीच अपूर्ण असते. या बेलपत्राला आपल्या हिंदू धर्मामध्ये अध्यात्मिक दृष्ट्या अनन्यसाधारण महत्व आहे. बेलपत्र हे पूजेमध्ये जितके महत्वाची भूमिका बजावते तितकेच ते आपल्या आरोग्याच्या दृष्टीने देखील अतिशय लाभदायक आणि गुणकारी आहे.
त्रिदल अर्थात बेलपत्र हे नेहमी तीन पानांच्या गटामध्ये असते. या तीन पानांना ब्रह्मा, विष्णू आणि महेशाचे स्वरूप मानले जाते. बेल हा बाराही महिने मिळतो. या बेलाचे आपल्याला अनेक आजारांमध्ये फायदे होतात. काही आजार होऊ नये म्हणून देखील बेलपत्राचे सेवन केले जाते. आयुर्वेदामध्ये या बेलाला मोठे महत्व देण्यात आले आहे.
डोळ्यांच्या समस्या
डोळ्यांमध्ये लालसरपणा, अॅलर्जी, वेदना असल्यास बेलाच्या पानांवर तूप लावा आणि डोळ्यांना शेक द्या. त्यानंतर डोळ्यांवर पट्टी बांधा. यामुळे डोळ्यांच्या समस्यांतून खूप आराम मिळेल.
अतिसार विरोधी
उन्हाळ्याच्या दिवसात अतिसाराची समस्या बऱ्याच लोकांमध्ये दिसून येते. अशा वेळेस उलट्या, मळमळ वाटू लागते. बेलाच्या पाण्यात साखर मिसळून प्यायल्यास याचे लाभ दिसून येतात. कच्चे बेलफळ खाल्यास अतिसार नियंत्रणामध्ये येतो. अर्धे पिकलेली फळ हे सर्वोत्तम मानले जाते परंतु संपूर्ण पिकलेली फळे किंवा अगदी फळाचा चूर्ण परिणामकारक परिणाम दर्शवितो.
मधुमेहावर प्रभावी
मधुमेह असणाऱ्या रूग्णांनी बेलाची पाने बारीक करून, त्याचा रस काढून, दिवसातून दोन वेळा सेवन करावा. काही काळानंतर, याचा सकारात्मक परिणाम दिसू लागेल.
तापावर गुणकारी
ताप आल्यानंतर बेलाची पाने एका ग्लास पाण्यात उकळून पाणी अर्धे झाल्यावर ते गाळून चहाप्रमाणे प्यावे. जर, तोंडात फोड आले असतील, तर बेलाची पाने पाण्याने स्वच्छ धुवून घेऊन, चावून चघळत राहा. याने तुम्हाला लवकर आराम मिळेल.
सांधे दुखी
जर हिवाळ्यात सांधेदुखीची समस्या वाढत असेल, तर बेलाची पाने गरम करून वेदना असलेल्या ठिकाणी बांधा. या उपायामुळे काही दिवसांत वेदना कमी होण्यास मदत होईल.
हृदयरोग आणि दम्यामध्ये लाभदायी
बेलाच्या पानांचा काढा हृदयरोग आणि दम्याच्या रूग्णांसाठी खूप प्रभावी आहे. दररोज नियमितपणे सकाळी आणि संध्याकाळी या काढ्याचे सेवन केल्याने या समस्या कमी होण्यास मदत होईल.
रक्तवाढीसाठी गुणकारी
आजच्या काळात अनेकांना रक्ताच्या कमरतेची लक्षणे दिसून येतात. वाळलेल्या बेलाच्या गराची पावडर तयार करून गरम दुधात साखरेसोबत रोज एक चमचा घेतल्यास शरीरात नवीन रक्त तयार होण्यास सुरुवात होते. शिवाय मधमाशी आणि अन्य काही कीटक चावल्यास बेलपत्राचा रस जखमेवर लावल्यास आराम पडतो.
बद्धकोष्ठता आणि अॅसिडिटीपासून सुटका
बेलाच्या पानाचे सेवन केल्याने बद्धकोष्ठता, अॅसिडिटी आणि गॅससारख्या समस्येपासून सुटका मिळते. बेलाच्या पानात असणारे फायबर पोट स्वच्छ करून अॅसिडिटीपासून सुटका मिळवून देते. सोबतच या पानाच्या सेवनामुळे पचनाशी संबंधित विकार देखील दूर होतात.
प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी
बेलाच्या पानातील असणारे विटामिन सी हे प्रतिकारशक्ती अधिक बळकट करण्यासाठी मदत करते. रोज सकाळी उपाशीपोटी बेलाची २-३ पाने चावून खाल्ली तर नक्कीच प्रतिकारशक्ती वाढून सर्दी आणि खोकल्यासारख्या आजारांही दूर राहण्यास मदत होईल.
शरीराला थंडावा देण्यासाठी
बेलाच्या पानामध्ये थंडावा असतो, याचे सेवन केल्याने पोटात थंडावा राहातो. उन्हाळ्याच्या दिवसातही याचे सेवन केल्याने लू च्या त्रासापासून बचाव होऊ शकतो. उष्णतेमुळे तोंड येत असेल तर त्यावर बेलाचे पान हा उत्तम उपाय ठरू शकतो.
शुगर नियंत्रणात राहते
बेलाची पाने रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त मानली जातात. यामध्ये रेचक गुणधर्म मोठ्या प्रमाणात आढळतात. हे गुणधर्म इन्सुलिन तयार करण्यात मदत करतात. त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहते.
गर्भवती महिलांसाठी उपयोगी
गर्भवती महिलांना उलट्यांचा त्रास सर्वसामान्य मानला जातो. हा त्रास अनेकदा एवढा वाढतो की त्या महिला जेवण देखील बंद करतात. त्याचा परिणाम बाळावर होऊन पुढच्या त्रास वाढतो. मात्र असे होऊ नाही म्हणून बेल वापरू शकता. बेल फळाचा गर कुटून तांदळाच्या पाण्यासोबत घ्या. नंतर त्याची छाननी करून प्या. यामुळे गर्भवती महिलांना आराम मिळतो.
ऊन लागल्यास
दरवर्षी उन्हाळ्यात तापमानचा पारा नेहमीच वर वर वाढत असतो. त्यामुळे अनेकांना ऊन लागते. हा त्रास सुरू झाल्यास बेलाच्या ताज्या पानांना कुटून मेहंदीप्रमाणे तळपायावर लावावे. अशा वेळी बेलाचे सरबत प्यायल्यास तत्काळ आराम मिळतो.
==========
हे देखील वाचा : हिरवी वेलची खाण्याचे आरोग्यदायी फायदे
==========
बेल फळाचे पौष्टिक मूल्य
बेल फळाच्या लगद्यामध्ये स्टिरॉइड्स, कूमारिन्स, फ्लॅनोनोयड्स, टेरपेनॉईड, फिनोलॉलिक संयुगे, लिग्निन, इनुलीन, आणि अन्य एंटिऑक्सिडेंट जी आपल्याला जुनाट रोगांपासून वाचवू शकतात. याव्यतिरिक्त, त्यात प्रथिने, कर्बोदके, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, लोह आणि व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी आणि रिबोफॅव्हिन यांचा समावेश आहे. अॅल्कॉइड, कार्डियाक ग्लायकोसाइड आणि फ्लॅनोनोयड्स इत्यादीचा उत्तम स्त्रोत आहे.
कसे करावे बेलपानाचे सेवन?
उपाशीपोटी बेलाच्या पानाचे सेवन करण्यासाठी त्याचा काढा तुम्ही तयार करून घेऊ शकता. यासाठी पाण्यात बेलाची पाने उकळवा आणि मग गाळून ते पाणी प्या. सकाळी उपाशीपोटी तुम्ही बेलाची पाने चावून खाऊ शकता. शिवाय मध आणि बेलाची पाने एकत्र खाल्ल्याने प्रतिकारशक्ती वाढते
(टीप – हा लेख केवळ माहितीसाठी असून कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्या नुसारच सेवन करा.)