आपल्या देशाला अनेक औषधी वनस्पतींचे वरदान लाभले आहे. भारतामध्ये अगणित अशा वनस्पती आहेत, ज्यांचे आपल्या शरीरासाठी आणि विविध आजारांसाठी उपयुक्त फायदे आहेत. भारतातील सर्वात मोठा ग्रंथ असलेल्या आयुर्वेदामध्ये देखील याच वनस्पतींचा वापर करून विविध औषध तयार केली जातात. मात्र आपण या पूर्व वनस्पती आणि त्यांच्या गुणधर्मापासून अनभिज्ञ असतो. त्यामुळेच आपण आपले देशी औषध न घेता विदेशी महागडी आणि जास्त परिणामकारक नसलेली औषधं घेतो.
जर आपण आपल्या निसर्गाने आपल्याला दिलेल्या या वनस्पतींचा वापर औषधं म्हणून करण्यास सुरुवात केली तर हे आपल्या निसर्गासोबतच आपल्या शरीरासाठी देखील फायदेशीर ठरेल. अशीच एक अतिशय लाभदायक आणि गुणकारी वनस्पती म्हणजे शतावरी. शतावरी हे नाव ऐकताच अनेकांना वाटेल की ही वनस्पती फक्त बाळंतीण बाई साठीच किंवा महिलांसाठीच उपयुक्त असते. मात्र असे अजिबातच नाही. शतावरी ही सगळ्यांसाठी अनेक आजारांवर अतिशय लाभदायी इलाज आहे. चला जाणून घेऊया याच शतावरीचे विविध फायदे.
१) शतावरी स्त्रियांमध्ये हार्मोनल संतुलन राखण्यास मदत करते. मासिक पाळी दरम्यान पोटात उठणारे पेटके आणि वेदना कमी करण्यासाठी देखील ते प्रभावी आहे. तसंच रजोनिवृत्तीची लक्षणं देखील ते कमी करते.
२) शतावरी खाल्ल्याने स्तनपान देणाऱ्या महिलांमध्ये दूध उत्पादन सुधारते.
३) शतावरी पुरुष आणि स्त्रिया दोघांचे पुनरुत्पादक आरोग्य सुधारते. स्त्रियांमध्ये अंड्याची गुणवत्ता सुधारते आणि पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या आणि गतिशीलता वाढवते.
४) शतावरीच्या सेवनाने शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. शतावरीमध्ये आढळणारे अँटिऑक्सिडंट्स आणि इतर पोषक आणि औषधी गुणधर्म शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतात.
५) शतावरी पचनसंस्थेसाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये असलेल्या फायबरमुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतासारख्या समस्या दूर होण्यास मदत होते.
६) मानसिक आरोग्यासाठीही ते फायदेशीर आहे. शतावरीचं सेवन केल्याने मन शांत होते, तणाव आणि चिंता कमी होते.
७) जे लोक रक्तदाबाची औषधं घेतात त्यांनी शतावरी वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, कारण शतावरी रक्तदाबावर प्रभावित करू शकते.
८) गर्भवती महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय शतावरी सेवन करू नये, कारण गर्भधारणेदरम्यान काही प्रकरणांमध्ये ते हानिकारक असू शकते.
९) काही लोकांना शतावरीची ऍलर्जी असते. अशा लोकांनी शतावरीचे सेवन करू नये.
१०) बाळंतपणातील अशक्तपणा दूर करण्यासाठी, दूध वृध्दीसाठी व प्रजोत्पादनासाठी होतो.
११) शतावरीच्या कंदामध्ये सँपोनीन, ग्लायकोसाईडस, फॉस्फरस, रायबोफलेवीन, थायमीन, पोटँशियम, व इतरही रासायनिक द्रव्ये आहेत. तर शतावरीमध्ये व्हिटॅमिन –ए, व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-बी-कॉम्पलेक्स जास्त प्रमाणात आढळतात. याचा उपयोग करून कॅन्सर, क्षयरोग, कुष्ठरोग, आम्लपित्त, एडस इत्यादी आजारांवर उपचार करण्यासाठी होतो.
१२) शतावरीचा अजून उपयोग पोटाचा अल्सर, ज्वर, शरिरपुष्टता, वात, पित्त, जुलाब यासाठीतर होतोच, शिवाय ब्रॉन्कायटिस, मुदतीचा ताप आणि मुख्य म्हणजे शरिरातील द्रव्याचा समतोल राखण्यासाठीही होतो.
१३) शतावरीमध्ये अँटी ऑक्सिडेंट गुण असतात. त्यामुळं हृदय, किडनी आणि डोळ्यांचे आरोग्य सुधारते.
=========
हे देखील वाचा : कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्याचे महत्व
=========
शतावरीचे सेवन कसे करावे?
शतावरीचे सेवन करायचे झाल्यास, त्याची पावडर पाण्यात मिसळून पिऊ शकता. किंवा रात्री दूधात एक चमचा पावडर टाकूनही घेऊ शकता. शतावरीची चव थोडी कडवट असू शकते मात्र दूधासोबत घेत असताना तुम्ही त्यात थोडे मध टाकूनही पिऊ शकता. याशिवाय आता बाजारात शतावरीच्या गोळ्या देखील सहज उपलब्ध होतात. डॉक्टरांच्या सल्ल्याने त्या तुम्ही घेऊ शकतात.
(ही माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. गाजावाजा या माहितीच्या मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसीठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)