थंडीची चाहूल लागली की, हळू हळू कपाटामध्ये असणारे थंडीच्या दिवसात वापरायचे लोकरीचे कपडे बाहेर येऊ लागतात. थंडीच्या दिवसात लोकरीचे कपडे सर्वात जास्त वापरले जातात. लोकरीच्या कपड्यांमुळे आपल्या शरीराचे थंडीपासून संरक्षण होते. थंडीच्या दिवसात आपण याच कपड्यांचा सर्वात जास्त वापर करत असतो. मात्र हे लोकरीचे कपडे आपल्या दररोज वापरल्या जाणाऱ्या कपड्यांपेक्षा खूपच वेगळे असतात.
लोकरीच्या कपड्यांमधून आपल्या शरीराला सतत उब मिळत असते आणि आपले शरीर गरम राहते. लोकरीचे कपडे आपण विशिष्ट काळासाठीच वापरत असतो. हे कपडे बऱ्यापैकी महाग असतात. त्यामुळे आणि इतर कपड्यांपेक्षा खूपच वेगळे असल्याने त्यांची विशेष काळजी घेणे आवश्यक असते. लोकरीचे कपडे अधिक काळ चांगले राहण्यासाठी आणि टिकण्यासाठी आपण घरीच कोणते उपाय करू शकतो ते जाणून घेऊया.
लोकरीच्या कपड्यांची स्वच्छता
लोकरीचे कपडे हे मशीनपेक्षा हाताने धुणे कधीही सर्वोत्तम पर्याय आहे. हाताने कपडे धुतल्यामुळे ते अतिशय सावकाश आणि चांगल्या पद्धतीने धुतले जातील. हे कपडे जास्त ताणले जाणार नाही आणि अधिकच जोर लावून पिळले देखील जाणार नाही. हे लोकरीचे कपडे धुताना तुम्ही लोकरीच्या कपड्यांसाठी साजेशी पावडेराठवा लिक्विड वापरा. खूप हार्ड डिटर्जंटने हे कपडे धुतल्यास ते खराब होण्याची भीती असते. त्यासाठी आता बाजारात वेगळे लिक्विड, पावडर देखील उपलब्ध आहेत.
लोकरीचे कपडे वाळवणे
लोकरीचे कपडे सुकण्यासाठी ते इतर कपड्यांप्रमाणे कधीही दोरीवर टाकून लटकवू नका. कारण, लोकरचे कपडे धुताना ते भरपूर पाणी शोषून घेत असतात. त्यामुळे या कपड्यांचे वजन बऱ्यापैकी वाढते. कपड्यांच्या वाढलेल्या वजनामुळे हे फॅब्रिक ताणले जाते आणि लोकरीच्या कपड्यांचा आकार देखील बदलतो. त्यामुळे, लोकरीचे कपडे नेहमी सपाट पृष्ठभागावर वाळायला ठेवा. शिवाय ते कडक उन्हात वळत घालण्यापेक्षा खोलीच्या सामान्य तापमानात वाळवा. या कपड्याने सूर्यप्रकाश आणि उष्णतेपासून दूर ठेवा. हे कपडे पूर्णपणे वाळल्याची खात्री केल्यानंतर मगच कपाटात ठेवा. कारण जर तुम्ही कपाटात थोडे ओलसर लोकरीचे कपडे कपाटात ठेवल्यास त्या कपड्यांवर जंतू तयार होऊ शकतात.
इस्त्री करणे
लोकरीचे कपडे कोरडे असताना तुम्ही कधीही ते इस्त्री करू नये. इस्त्री करताना नेहमी स्टीम हीटचा वापर करा. तसेच, तुमच्या स्वेटरला आतून-बाहेरून चांगल्या प्रकारे इस्त्री केली जाईल याची खात्री करा. हे कपडे इस्त्री करण्यापूर्वी नेहमी तुमच्या इस्त्रीवरील सेटिंग्ज WOOL वर सेट करायला विसरू नका.
कपड्यांचे स्टोरिंग
लोकरीचे कपडे साठवण्याची पद्धत देखील या कपड्यांचे आयुष्य वाढवण्यास उपयुक्त ठरते. त्यामुळेच हे कपडे साठवणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच ते स्वच्छ करणेही महत्त्वाचे आहे. लोकरीचे कपडे हँगर्सवर टांगण्याऐवजी व्यवस्थित घडी करून ठेवा. तसेच, ते एकत्रपणे गुंडाळले जाणार नाहीत याची खात्री करा, कारण यामुळे त्यांच्यावर सुरकुत्या पडतील.