भारतामध्ये नानाविध देवांची असंख्य मंदिरं आहेत. आपल्या देशात मंदिरांची अजिबातच कमतरता नाही. देवांसोबतच काही लोकं झाडांची, प्राण्यांची देखील पूजा करणारे लोकं देखील आहेत. एवढेच काय तर आता कलाकारांची देखील मंदिरं बांधली गेली आहेत. एकूणच काय तर जितके लोकं तितक्या आस्था. आजपर्यंत आपण अनेक प्रकारची आश्चर्य कारक मंदिरं पाहिले असतील. अशा मंदिरांबद्दल ऐकले असेल, मात्र आज आम्ही तुम्हाला असे एक मंदिर सांगणार जे ऐकून आश्चर्याचे हास्य तुमच्या चेहऱ्यावर आल्याशिवाय राहणार नाही.
हे अनोखे मंदिर आहे बुलेटचे. हो तुम्ही नीटच वाचले बुलेटचेच मंदिर आहे. राजस्थानमध्ये चक्क एका बुलेट गाडीचे मंदिर असून, याची इतर मंदिरांप्रमाणे पूजा देखील केली जाते. या मंदिराला ओम बन्ना मंदिर म्हणून ओळखलं जातं. काही जण बुलेट बाबा असे देखील म्हणतात. भाविक देखील या मंदिरात दुरून दुरून दर्शनासाठी येत असतात. हे बुलेटचे मंदिर राजस्थान जिल्ह्यातील जोधपूरपासून ५० किमी दूर अंतरावर स्थितीत ओम बन्ना धाम (बुलेट बाबा मंदिर) म्हणून प्रचलित आहे.
या मंदिरात या मंदिरात रॉयल एनफिल्ड बुलेट 350 (Royal Enfield Bullet 350) ची पूजा केली जाते. या बाईकचा नंबर RNJ 7773 असा आहे. गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या बाईकमध्ये एक प्रकारची शक्ति आहे. त्यामुळे या भागातून जाणारे प्रवासी बुलेट बाबाचं दर्शन घेतल्याशिवाय पुढे जात नाहीत. हे मंदिर केवळ राजस्थानच नव्हे तर संपूर्ण उत्तर भारतात प्रसिद्ध आहे. भाविक येथे मोठ्या संख्येने येतात, पूजा करतात, आरती करतात आणि आपल्या इच्छा व्यक्त करतात. मुख्य म्हणजे या मंदिरात केलेले नवस पूर्ण होतात अशी मान्यता देखील आहे.
बुलेट मंदिरामागची आख्यायिका
बुलेट मंदीर राजस्थानमधील चोटीला गावात सुमारे ३० वर्षांपूर्वी रस्ता अपघातात मृत झालेल्या ठाकूर जोगसिंग राठोड यांचा मुलगा ओम सिंह राठोड यांच्या नावाने बांधण्यात आले आहे. १९८८ मध्ये पाली येथील रहिवासी ओम बन्ना त्यांच्या बुलेटवरुन जात असताना त्यांचा अपघात झाला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर ही दुचाकी पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आली. पण ही बुलेट पोलीस स्टेशनमधून गायब झाली आणि अपघातस्थळी सापडली. याच ठिकाणी ओम बन्नांचा अपघात झाला होता. त्यानंतर पुन्हा ती पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आली आणि पुन्हा ही बुलेट त्याच ठिकाणी परत आली. असे अनेकदा झाले.
अखेर पोलिसांनी बुलेटला साखळीने बांधून ठेवले, पण तरीही दुचाकी पोलीस स्टेशनमधून गायब झाली. मग मात्र हा एक चमत्कारच मानला गेला आणि त्याच ठिकाणी जिथे हा अपघात झाला आणि ओम बन्ना यांचे निधन झाले तिथेच ती बाइक स्थापित करण्यात आली. यानंतर लोकांनी त्या बुलेटची पूजा करण्यास सुरुवात केली आणि लोकांचा विश्वास हळू हळू वाढत गेला. पुढे या बुलेटची ख्याती सर्वदूर झाली आणि लोकं या मंदिरात येऊ लागले. लोकांची अशी मान्यता आहे की ओम बन्ना आणि दुचाकी त्यांचे संरक्षण करतात आणि त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. असे सांगितले जाते की, जेव्हापासून येथे हे बाईकचे मंदिर बांधले गेले, तेव्हापासून येथे अपघात झालेला नाही.