अभिनेता सलमान खानला लॉरेन्स बिश्नोईंने जिवेमारण्याची धमकी दिली. १९९६ साली सलमान खानने राजस्थानमध्ये काळवीटाची शिकार केली. त्याचा बदला म्हणून लॉरेन्स बिश्नोईंने सलमान खानला माफी मागण्यास सांगितले अन्यथा त्याला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याच पार्श्वभूमीवर सलमान खानला आता Y+ सुरक्षा देण्यात आली आहे. त्याच्या जीवाला असलेला हा धोका पाहून सरकारने हा निर्णय घेतला आहे. मात्र Y+ सुरक्षा म्हणजे काय? अशा किती प्रकारच्या सुरक्षा असतात? या सुरक्षा कधी आणि कोणाला दिल्या जातात? चला जाणून घेऊया.
देशात अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना म्हणजे नेते, उद्योगपती, सेलिब्रेटींना सरकारतर्फे सुरक्षा पुरवली जाते. ज्या व्यक्ती देशासाठी अतिमहत्त्वाच्या आहेत किंवा ज्यांच्या जीवाला धोका असतो अशा व्यक्तींना ही सुरक्षा पुरवली जाते. वेगवेगळ्या प्रकारची सुरक्षा असते. भारतात पाच प्रकारच्या व्हीव्हीआयपी सुरक्षा आहे. यात Z+, Z, Y+, Y आणि X श्रेणीचा समावेश आहे. मात्र या सुरक्षा अशा कधीही, कोणाच्याही सांगण्यावरून देण्यात येत नाही. त्यासाठी अनेक नियम आहेत. त्यांची पूर्तता झाल्यानंतर सरकार या सुरक्षा देतात.
झेड प्लस किंवा कोणतीही सुरक्षा देण्याविषयी काही नियम आहेत. त्या नियमांना धरूनच या सुरक्षा देण्यात येतात. देशातील महत्वाच्या व्यक्तींना कोणत्याही कारणामुळे जीवाला धोका निर्माण झाला असेल तर तेव्हा ही सुरक्षा देण्यात येते. मात्र ही सुरक्षा देत असताना सदर व्यक्तीच्या जीवाला किती मोठा धोका आहे, याचा विचार करून, त्याचा अभ्यास करून त्याला नक्की कोणत्या स्वरूपाची सुरक्षा द्यायची हे ठरवले जाते. यासाठी एक यलो बुक ठेवले आहे. या बुकमध्ये सुरक्षेविषयी नियम आणि काही अटी, सूचना देण्यात आल्या आहेत.
देशातील व्यक्तीकडून अशा मोठ्या सुरक्षेची मागणी केल्यानंतर आपल्या सुरक्षा यंत्रणा कामाला लागतात आणि त्या व्यक्तीच्या जीवाला नक्की किती आणि कोणत्या प्रकारचा धोका आहे, यासोबतच इतर सर्व महत्वाच्या अनेक बाबींचा अभ्यास करतात. यावरून काही निकष काढले जातात आणि एक अहवाल तयार करून तो सरकारकडे पाठवला जातो. या समितीच्या अहवालानंतरच सुरक्षा पुरवण्यात येते. त्यावरून सदर व्यक्तीला कोणत्या प्रकारची सुरक्षा द्यायची हे ठरवले जाते.
कोणाला दिली जाते सुरक्षा?
देशातील कोणत्याही व्यक्तीला अथवा नागरिकाला ही सुरक्षा मिळत नाही. ही मोठी सुरक्षा केंद्रीय मंत्री, राज्यांचे मुख्यमंत्री, सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांनाच पुरवली जाते. कारण या व्यक्ती देशातील मोठ्या पदावर असतात आणि त्या नेहमीच अनेक महत्त्वाचे निर्णय घेत असतात.
१) Z+ सुरक्षा
Z+ सुरक्षा ही भारतातील सर्वोच्च श्रेणीची सुरक्षा मानली जाते. Z+ सुरक्षेमध्ये १० पेक्षा जास्त NSG कमांडो आणि पोलिस कर्मचाऱ्यांसह ५५ प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचे रिंगण असते. हे सर्व कमांडो २४ तास त्या व्यक्तीभोवती बारीक नजर ठेवतात. सुरक्षेमध्ये गुंतलेला प्रत्येक कमांडो मार्शल आर्टमध्ये तज्ज्ञ असतो. यासोबतच या कमांडोजकडे आधुनिक शस्त्रेही असतात. भारतात ज्यांना Z+ सुरक्षा आहे त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्यासह अनेक अतिमहत्वाच्या व्यक्तींचा समावेश आहे. याशिवाय Z+ सुरक्षा ही देशातील आणि राज्यातील अत्यंत अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना दिली जाते. यात राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचा समावेश असतो.
२) Z सिक्योरिटी
Z+ नंतर, Z सुरक्षा ही सर्वात सुरक्षित मानली जाते. यामध्ये ६ ते ७ NSG कमांडोसह २२ सैनिक आणि पोलिस कर्मचारी संबंधित व्यक्तीभोवती तैनात असतात. ही सुरक्षा पोलिस, आयटीबीपी किंवा सीआरपीएफचे जवान पुरवतात. भारतातील अनेक नेते आणि सेलिब्रेटिंना ही सुरक्षा आहे.
३) Y+ सिक्युरिटी
Z सुरक्षेनंतर Y+ सुरक्षा येते. यात ११ सुरक्षा कर्मचाऱ्यांचा समावेश असतो. त्यात १ किंवा २ कमांडो आणि २ PSO असतात. यासोबतच पोलिसांचाही यात समावेश असतो. राज्यातील मंत्री, माजी मुख्यमंत्री यांच्यासह ज्यांच्या जीवाला जास्त धोका आहे त्यांना ही सुरक्षा देण्यात येते.
४) Y सिक्युरिटी
Y श्रेणीच्या सुरक्षेत १ किंवा २ कमांडो आणि पोलिस कर्मचाऱ्यांसह ८ जवान तैनात असतात. यामध्ये दोन पर्सनल सिक्युरिटी ऑफिसर (पीएसओ) देखील सुरक्षा म्हणून दिले जातात. भारतात या श्रेणीची सुरक्षा मिळवणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. खासदार, आमदार, नगरसेवक आणि विविध राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींना एक्स आणि वाय सुरक्षा देण्यात येते.
५) X सिक्युरिटी
X श्रेणीच्या सुरक्षेत संबंधित व्यक्तीसोबत २ सशस्त्र पोलीस कर्मचारी तैनात असतात. ही सुरक्षा वैयक्तिक सुरक्षा संस्थांद्वारे प्रदान केली जाते. भारतातील मोठ्या संख्येने लोकांना या श्रेणीची सुरक्षा मिळते.
========
हे देखील वाचा : कोण आहेत संजय वर्मा ?
========
VIP सुरक्षा कोण पुरवते?
भारतात व्हीव्हीआयपींना अनेक संस्थांद्वारे सुरक्षा पुरवली जाते. यात एसपीजी (SPG), एनएसजी (NSG), आईटीबीपी (ITBP) आणि सीआरपीएफ (CRPF) सारख्या सुरक्षा यंत्रणांचा समावेश आहे. ही सुरक्षा मिळवण्यासाठी सरकारला अर्ज द्यावा लागतो. त्यानंतर सर्व अभ्यास करून संबंधित व्यक्तीला सुरक्षा पुरवली जाते. गृहसचिव आणि महासंचालक आणि मुख्य सचिवांची समिती कोणत्या व्यक्तीला कोणती सुरक्षा द्यायची याचा निर्णय घेते.
SPG घेते पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी
भारताच्या पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी विशेष संरक्षण ग्रुपकडे म्हणजेच SPG कडे असते. पंतप्रधानांच्या चारही बाजूला असणारे सुरक्षेतील जवान SPG चे असतात. या जवानांना अमेरिकेच्या गुप्तसेवेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार खास आणि जटिल प्रशिक्षण दिले जाते. या जवानांजवळ MNF-2000 असॉल्ट राइफल, ऑटोमेटिक गन आणि १७ एम रिवॉल्वर आदी आधुनिक हत्यारे असतात. एसपीजी गार्ड्सच्या पदासाठी भारतीय सैन्यदलातील अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येते. एसपीजी गार्ड्स भारतीय सैन्यदलाबरोबर बीएसएफ, आयटीबीपी, एनएसजीमधूल देखील निवडण्यात येतात. पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी दररोजचा खर्च जवळपास १ कोटी ६२ लक्ष रुपयांचा येत असल्याचे सांगितले जाते.