दिवाळी झाली की चाहूल लागते ती थंडीची. गुलाबी थंडी कोणाला आवडत नाही. थंडीचा ऋतू अर्थात हिवाळा म्हणजे अनेकांचा आवडता ऋतू. हा ऋतू तसे पाहिले तर आपल्या आरोग्यासाठी खूपच चांगला समजला जातो. कारण या ऋतूमध्ये सकाळी लवकर उठून केलेला व्यायाम कधीच व्यर्थ जात नाही. उत्तम शरीर कमवण्यासाठीचा हा अतिशय चांगला काळ समजला जातो. या दिवसात भाज्या देखील मुबलक येतात. विविध प्रकारच्या चांगली आणि आरोग्यदायी भाज्या येत असल्यामुळे आपल्या आरोग्याला देखील त्याचा सकारात्मक फायदा होतो.
मात्र या हिवाळ्याचे जसे अनेक फायदे आहेत, तसे काही तोटे देखील आहेत बर का. कारण आपल्या त्वचेच्या दृष्टीने हिवाळा तसा त्रासदायक ऋतू ठरतो. कारण हिवाळ्यामध्ये आपली त्वचा कोरडी पडते, त्वचेवर चट्टे पडणे, खाज उठणे तिला तडे देखील जातात. कधी कधी या तड्यांमधून रक्त देखील येते. त्यामुळेच या ऋतूमध्ये सर्वात जास्त आपल्याला आपल्या त्वचेची काळजी घेणे आवश्यक आहे. मग त्वचेची काळजी कशी घ्यायची? त्यासाठी कोणते उपाय करायचे चला जाणून घेऊया.
– हिवाळ्यामध्ये गरम पाण्याऐवजी कोमट पाण्याने आंघोळ करावी. जास्त गरम पाण्याने आंघोळ केल्याने आपली त्वचा कोरडी आणि निर्जीव दिसते. यामुळे त्वचेच्या संसर्गाचा धोका वाढतो. या दिवसात गरम पाणी आणि साबणाचा मर्यादित वापर करा. त्वचेला हिवाळ्यात खाज सुटली असेल तर, कोमट पाण्याने अंघोळ करा. त्यानंतर लगेच मॉइश्चरायझर क्रीम किंवा पेट्रोलियम जेली लावा. त्या आधी हळूवारपणे त्वचा स्वच्छ कोरडी करा.
– रोज सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम चेहरा कोमट पाण्याने धुवा. चेहरा धुताना फेसवॉशचा वापर करा. चेहरा धुताना नेहमी कोमट पाण्याचा वापर करा. थंड पाण्याने चेहरा धुतल्यास त्वचा कोरडी पडते.
– हिवाळ्यात सामान्य मॉइश्चरायजर वापरण्याऐवजी ऑइल बेस्ट मॉइश्चरायजरचा वापर करावा. त्वचेला अधिक चांगले बनवण्यासाठी तुम्ही खास रात्री लावण्यासाठी बनवलेले डीप मॉइश्चरायझर देखील वापरू शकता.
– हिवाळ्यात जेव्हा बाहेर पडाल तेव्हा मॉइश्चरायझर बरोबरच त्वचेला सनस्क्रीन लावायला विसरू नका. सनस्क्रीन तुमच्या त्वचेची अतिरिक्त सूर्य किरणांपासून सुरक्षा करून त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करते.
– त्वचा हायड्रेट करण्यासाठी इसेन्शिअल ऑईल नेहमीच मदत करतात. लव्हेंडर ऑईल, खोबरेल तेल, प्राईमरोज ऑईल सारख्या इसेन्शिअल ऑईलचा वापर करा.
– थंडीच्या दिवसांत ओठ मऊ ठेवण्यासाठी कोरफड, साखर आणि नारळाच तेल, हळद, दूध, आणि बदाम तेल आणि लिंबू यांपासून बनलेले स्क्रब ओठांसाठी उपयोगी ठरतात. यांमधील घटक ओठांमधील कोरडेपणा कमी करतात.
– त्वचेची काळजी येते तेव्हा क्लिनिंग ही सर्वात महत्वाची गोष्ट असते. त्वचा स्वच्छ करण्यासाठी एका भांड्यात हरबरा डाळीचे पीठ, एक चमचे हळद, 2 चमचे दही मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट त्वचेवर लावा तसे केल्यास तुमची त्वचा चमकदार होईल. याशिवाय चेहऱ्याचा ओलावा टिकवण्यासाठी बेसनाचा वापर केला जाऊ शकतो. यासाठी एक चमचा बेसन, चिमूटभर हळद, दूध आणि मलई नीट मिसळा. आणि हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. १० मिनिटांनी चेहरा धुवा, जेणेकरून तुमचा चेहरा मॉइश्चराइज राहील.
– थंडीच्या दिवसात दुधाची साय चेहऱ्यासाठी चांगली असते. त्यात आर्द्रतेचे प्रमाण जास्त असते. हे चेहऱ्यावर लावा आणि 10 मिनिटांनंतर कोमट पाण्याने धुवा. असे केल्याने चेहरा मॉइश्चरायझेशन राहतो.
========
हे देखील वाचा : तांदूळ धुतलेले पाणी फेकून देण्याआधी ‘हे’ वाचाच
========
– त्वचेतून काळे डाग काढून टाकण्यासाठी स्क्रबिंग करणे खूप महत्वाचे आहे. स्क्रबिंग आपली मृत त्वचा काढून टाकते. नैसर्गिक स्क्रब तयार करण्यासाठी आपण कॉफी, नारळ तेल आणि मध वापरू शकता. आठवड्यातून दोनदा हे स्क्रब लावल्याने मृत त्वचा दूर होईल.
– आंघोळीनंतर थोड्या ओलसर अंगाला खोबरेल तेल लावल्यास ओलावा टिकून राहण्यास मदत होते. त्यासोबतच तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने एखादे मॉश्चरायझर वापरू शकता. त्वचेचा प्रकार ओळखून मॉइश्चरायजर न वापरल्यास चेहऱ्यावर पिंपल्स येतात, त्वचा काळी पडते. त्यामुळे सर्व बाबी लक्षात घेऊनच मॉइश्चरायजरचा वापर करावा, असा सल्ला डॉक्टर देतात.
(टीप : कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या)