तीळ आपल्या भारतीय लोकांच्या जेवणात सर्रास वापरली जाणारी वस्तु. गोड असो किंवा तिखट दोन्ही पदार्थांमध्ये तिळीचा वापर सगळेच नेहमी करतात. अख्खी तीळ, तीळाचा कूट, तीळ भाजून, कच्ची आदी अनेक पद्धतीने ही तीळ स्वयंपाकासाठी वापरली जाते. भाज्या, चटणी, बेकरी पदार्थ, तीळ पोळी, तीळ लाडू आदी अनेक पदार्थ या तिळीपासून तयार केले जातात. तीळ ही उष्ण गुणधर्म असलेला पदार्थ आहे. तीळ जितकी स्वयंपाकाला चव देते तितकीच ती आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूपच गुणकारी आहे.
तीळ खाण्याचे आपल्या आरोग्याच्या आणि शरीराच्या दृष्टीने अनेक लाभ आहेत. तिळामध्ये पॉलिसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड्स, ओमेगा-6, फायबर, आयर्न, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरससारखे घटक शरीरासाठी पोषक घटक असतात. तिळाचे दोन प्रकार आहेत, काळे आणि पांढरे तीळ. दोन्ही प्रकारचे तीळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. झिंक, कॅल्शियम आणि फॉस्फरस मुबलक प्रमाणात असलेल्या तीळाचे सेवन केल्याने हिवाळ्यात सांधेदुखीपासून आराम मिळतो, स्मरणशक्ती सुधारते आणि शरीर निरोगी राहते. जाणून घेऊया तीळ खाण्याचे फायदे.
– भाजलेले तीळ सकाळी चघळल्याने दात मजबूत होतात आणि हिरड्या निरोगी राहतात. तिळामध्ये कॅल्शियमचे प्रमाण चांगले असते, जे दात आणि हिरड्यांसाठी वरदान आहे.
– तीळ शरीराचे मेटॅबॉलिझम वाढवते. तीळ खाल्ल्याने चयापचय क्रिया वाढते. चयापचय वाढवण्याचे अनेक मार्ग आहेत, परंतु भाजलेले तीळ चघळणे हा एक प्रभावी उपाय आहे. तिळीच्या सेवनामुळे केवळ पचन सुधारत नाही तर पोटाशी संबंधित आजार देखील बरे होतात.
– भाजलेले पांढरे तीळ सकाळी खाल्ल्याने यकृत आणि पोटाला चालना मिळते आणि जठराग्नी सुधारतो. तीळ हाडे, दात आणि केस मजबूत करण्याचे काम करतात. तीळ बद्धकोष्ठतेवर प्रभावी उपाय आहे. कोरड्या खोकल्यापासूनही तीळ चघळल्याने आराम मिळतो.
– तिळातील कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरससारखे घटक हाडांसाठी पोषक असतात. थंडीच्या दिवसात तीळ खाण्याची सवय ठेवल्यास हाडं किंवा सांधेदुखीचा त्रास जाणवत नाही. तिळात फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स उच्च प्रमाणात असल्यामुळे रोग प्रतिकारशक्तीही वाढते.
– तिळात सेसमीन नावाचे अँटीऑक्सिडंट असते. त्यामुळे कर्करोगाच्या पेशी वाढण्यास अवरोध होतो. त्यामुळे फुफ्फुस, पोट, गर्भाशय, स्तन, रक्त यांचे कॅन्सर होण्याची शक्यता कमी होते.
– त्वचा मुलायम राहण्यासाठीही तिळ उपयुक्त आहे. तिळात तेल असल्याने त्वचेची कांती सुधारते. त्यामुळे त्वचा कोरडी पडू नये यासाठी थंडीच्या सुरुवातीपासूनच तीळ खाल्ल्यास त्वचा कोरडी पडण्याचे प्रमाण कमी होते.
– तीळ पचायला जड असल्याने थंडीमध्ये भूक शमवण्यासाठी भाकरीला तीळ लावून खाण्याची पद्धत आहे.
– ज्यांना युरीन स्वच्छ होत नाही त्यांनी तीळ, दूध आणि खडीसाखर खाल्ल्यास मूत्राशय मोकळे होण्यास मदत होते.
– जर सांध्यांमध्ये भरपूर वेदना होत असतील तर तीळाचे सेवन करावे. तिळाच्या तेलाने वेदनादायक भागाची मालिश केल्याने आराम मिळतो. तिळाच्या बियांमध्ये पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड असते, जे इस्ट्रोजेन हार्मोनच्या कमतरतेमुळे होणारी ऑस्टिओपोरोसिसची समस्या दूर होते. कॅल्शियम युक्त तीळ हाडांच्या दुखण्यापासून आराम देते.
– तीळ खाल्ल्याने मधुमेह नियंत्रणात राहतो. तिळामध्ये कार्बोहायड्रेट्स कमी असतात, तसेच प्रथिने आणि हेल्दी फॅट देखील त्यात आढळतात, जे डायबिटीजमध्ये फायदेशीर ठरतात. मधुमेहाच्या रुग्णांनी तीळाचे सेवन करावे, याने शरीर निरोगी राहते आणि अशक्तपणा दूर होतो.
– एका अभ्यासानुसार तिळामध्ये ४१ टक्के पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट आढळते, जे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी प्रभावी आहे. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो. ज्या लोकांना हृदयाशी संबंधित आजार आहेत ते तिळाचे सेवन करू शकतात.
==========
हे देखील वाचा : महादेवाला प्रिय असलेल्या बेलपत्राचे आरोग्यदायी फायदे
==========
– ज्या महिलांना मासिक पाळी दरम्यान वेदना आणि अस्वस्थता जाणवते त्यांनी तीळाचे सेवन करावे. मासिक पाळीच्या ४ ते ५ दिवस आधी तिळाचे सेवन केल्याने मासिक पाळीच्या वेदनापासून आराम मिळेल.
– तिळाचे सेवन केल्यामुळे ॲनिमियापासून मुक्त होण्यास मदत होते. भाजलेल्या तिळात प्रथिनांचे प्रमाण सर्वाधिक असते. याशिवाय, तिळात मेथिओनिन आणि सिस्टीन नावाची दोन अमीनो अॅसिडदेखील असतात.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)