पर्यटनाची सगळ्यांनाच आवड असते. जमेल तसे आणि तेव्हा सगळेच आपल्या दररोजच्या जीवनातून ब्रेक घ्यावा म्हणून बाहेर जातात. मात्र कधी कधी खूप लांब जाऊन प्रवासात वेळ घालवण्यापेक्षा किंवा वेळेअभावी जवळच कुठे चांगल्या ठिकाणी जाण्यास अनेकांची पसंती असते. आपल्या महाराष्ट्रात एक अतिशय सुंदर, खिशाला परवडेल असे एक हिल स्टेशन आहे. ते म्हणजे माथेरान. मुंबईपासून अगदी जवळ असलेले हे ठिकाण अनेकांना माहित असेल. या ठिकाणी देश विदेशातील अनेक पर्यटक भेट देत असतात. विकेंडसाठी तर हे ठिकाण अतिशय उत्तम पर्याय आहे. मात्र ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी हा लेख नक्कीच महत्वाचा ठरेल.
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आणि पुण्यापासून देखील जवळ असलेले हे माथेरान ठिकाण, रायगड जिल्ह्यातील मुख्य थंड हवेचे ठिकाण आहे. माथेरान हे महाराष्ट्रातील टॉपचे, प्रमुख आणि महत्वाचे पर्यटन स्थळ आणि हिल स्टेशन आहे. निसर्गाचे भरभरून वरदान लाभलेल्या या हिल स्टेशनला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या देखील अमाप आहे. साधारण ८०३ मी. उंचीच्या विस्तीर्ण पठारावर माथेरान वसलेले आहे. माथेरानचा संपूर्ण माथा घनदाट झाडी आणि लाल पायवाटा यांनी भरलेला आहे. माथेरान हे हिल स्टेशन इंग्रजांनी वसवले आहे.
इथला हिरवागार निसर्ग, वळणावळणाचे रस्ते, पावसाळ्यात इथे कोसळणारे धबधबे माथेरानच्या मूळ सौंदर्यात अजूनच भर घालतात आणि लोकांना आकर्षित करतात. त्यामुळे ऋतू कोणताही असला तरी पर्यटकांची पावले आपसुकच माथेरानच्या दिशेने वळतात. या माथेरान ठिकाणची अनेक वैशिष्ट्ये आहेत.
माथेरान हे संपूर्ण आशिया खंडामधील एकमेव असे हिट स्टेशन आहे, जिथे वाहनांना प्रवेश नाही. हीच माथेरानची खरी आणि मुख्य ओळख आहे. यामुळेच हे ठिकाण प्रदूषणमुक्त असून, येथली हवा देखील स्वच्छ आणि प्रदूषरहित आहे. माथेरानला येताना आपल्याला गावाच्या बाहेर गाड्या लावुन चालत किंवा घोड्यावर बसून माथेरान मधील विविध ठिकाणांपर्यंत पोहचावे लागते.
माथेरानमध्ये राहण्यासाठी अनेक सोयी आहेत. MTDC च्या रेसॉर्टपासून विविध प्रकारचे हॉटेल्स आणि होमस्टे इथे सहज उपलब्ध होतात. आपण आपल्या गरजेनुसार त्यांची निवड करू शकतो. शिवाय इथे विविध प्रकारच्या खानावळी आणि शाकाहारी/मांसाहारी हॉटेल्स देखील उपलब्ध आहेत. मात्र सुट्ट्या आणि सीझनच्या काळात आधीच बुकिंग केलेले केव्हाही चांगलेच ठरते.
माथेरान मधील प्रेक्षणीय स्थळे –
लुईसा पॉइंट, शार्लोट लेक, मंकी पॉइंट, शिवाजीज लॅडर, पॅनोरमा पॉइंट, वन ट्री हिल पॉइंट, इको पॉइंट, सनसेट पॉइंट, अलेक्झांडर पॉइंट, हनिमून हिल पॉइंट, माथेरान मार्केट, खंडाळा पॉइंट आणि किंग जॉर्ज पॉइंट ही पर्यटन स्थळे आहेत.
माथेरान हे हिल स्टेशन महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात आहे. प्रवासी मुंबईपासून 92 किमी आणि पुण्यापासून 121 किमी अंतरावर असलेल्या या हिल स्टेशनला रस्ते आणि रेल्वेने पोहोचू शकता येते. नेरळ ते माथेरान दरम्यान धावणाऱ्या टॉय ट्रेनचा पर्याय देखील उत्तम आहे.
रस्ते मार्गे-
बदलापूर-कर्जत रस्त्याने मुंबईहून नेरळला जा, इथून या सुंदर टेकडीवर जाण्याचा मार्ग आहे. पुण्याहून माथेरानला जाण्यासाठी ३ ते ४ तास लागतात. त्यासाठी मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग घेणे अधिक योग्य ठरेल.
======
हे देखील वाचा : महेश कोठारे आणि सचिन यांचे नाते कसे आहे..?
======
रेल्वे मार्गाने-
माथेरान हिल स्टेशनला ट्रेनने जाता येते. या हिल स्टेशनचे जवळचे रेल्वे स्टेशन नेरळ आहे. नेरळला जाण्यासाठी दोनच गाड्या आहेत, पहिली कर्जत आणि दुसरी खोपोली. नेरळ ते माथेरान हे अंतर अंदाजे 10 किमी आहे.
टॉय ट्रेन-
माथेरान हिल स्टेशनला जाण्यासाठी नेरळ येथून दोन फूट रुंद नॅरो गेज मार्गावर टॉय ट्रेन सुरू होते, हा सर्वोत्तम पर्याय आहे. टॉय ट्रेन प्रवाशांना वळणदार मार्ग आणि खंदकातून माथेरान मार्केटच्या मध्यभागी असलेल्या रेल्वे स्टेशनपर्यंत घेऊन जाते. ट्रेनचा प्रवास हा अतिशय रोमांचक अनुभव आहे.