आपल्या समाजातील अतिशय महत्वाचा भाग म्हणजे स्त्री. जिच्याशिवाय घराचा गाडा ओढला जात नाही अशी ही स्त्री आजच्या आधुनिक काळातही स्वतःला शोधताना दिसते. आपण नेहमीच महिला सशक्तीकरणाबद्दल बोलताना दिसतो. महिलांच्या हक्कांबद्दल बोलतो, त्यांना समान न्याय हक्क मिळण्याबद्दल बोलतो. मात्र प्रत्यक्षात असे सर्वच महिलांच्या बाबतीत घडते का? हा प्रश्न जिथे निर्माण होतो तिथेच सर्व काही स्पष्ट होताना दिसत आहे. (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana)
आजच्या काळात महिलांना देखील त्यांचे हक्क मिळावे, त्यांना आर्थिक, सामाजिक स्वातंत्र मिळावे त्या सक्षम व्हाव्या यासाठी सर्वच प्रयत्न करताना दिसतात. असेच प्रयत्न सरकार देखील करत आहे. त्यासाठीच सरकार नेहमीच विविध योजना महिलांसाठी आणताना दिसते. या योजना राबवताना सरकारचा एकच उद्देश असतो की महिलांना समाजात मनाचे स्थान देत त्यांना समान दर्जा प्राप्त व्हावा.
सरकारने पुन्हा एकदा महिलांसाठी अशीच एक योजना आणली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात महिलांसाठी ही मोठी घोषणा केली आहे. सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरु केली आहे. या योजनेच्या अंतर्गत सर्व पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येणार आहेत. ही योजना एक जुलैपासून सुरु करण्यात आली आहे. चाल तर मग जाणून घेऊया या योजनेच्या पात्रता निकषांबद्दल.
काय आहे लाडकी बहीण योजना?
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ ही राज्यातील महिलांसाठी राबवली जाणारी योजना आहे. या ‘माझी लाडकी बहीण’ या योजनेंतर्गत वय वर्ष २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. विवाहित, विधवा, घटस्फोटित, परिक्तत्या, निराधार अशा सर्व स्तरातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार. यात महिलांना दर महिन्याला १५०० रुपये देण्यात येणार आहेत. या योजनेचा लाभ राज्यातील जवळपास एक कोटी महिलांना होणार असून एक जुलैपासून या योजनेची अंमलबजाणी करण्यात आली आहे. या योजनेमुळे राज्य सरकारवर वर्षाला ४६ हजार कोटी रुपयांचा आर्थिक भार पडणार आहे. १ जुलैपासून या योजनेसाठी अर्ज घेण्याची सुरुवात देखील झाली आहे.
या योजनेसाठी कोणत्या महिला पात्र आहेत ते जाणून घेऊया.
- या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील रहिवासी महिलांनाच घेता येणार आहे.
- वय वर्ष २१ ते ६० या वयोगटातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी पाहिजे.
- इन्कम टॅक्स भरणाऱ्या महिला आणि सरकारी नोकरी करणाऱ्या महिला या योजनेस पात्र नसतील.
- सरकारी योजनेतून मानधन घेणाऱ्या महिलांना देखील या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- मूळ निवासी प्रमाणपत्र किंवा मतदार ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला
- पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड
- उत्पन्नाचा दाखला किंवा पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड
- बँके पासबुक
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट साईज फोटो
माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज कुठे भरायचा ?
- ग्रामीण भागात राहणाऱ्या महिलांना ग्रामसेवक किंवा अंगणवाडी सेविकांकडे या योजनेसाठी नोंदणी करता येईल.
- शहरी भागात राहणाऱ्या महिलांनी वॉर्ड ऑफिसरकडे यासाठी नोंदणी करावी.
‘या’ महिलांना मिळणार नाही योजनेचा लाभ
- ज्याच्या कुटुंबातील सदस्य इन्कम टॅक्स भरत असेल
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य कायम किंवा कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी नोकरी करत असेल
- निवृत्तीनंतर निवृत्तीवेतन मिळत असलेल्या महिला
- ज्या महिलांनी शासनाच्या इतर विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेअंतर्गत १५०० रुपयांपेक्षा जास्त आर्थिक लाभ घेतला असेल
- ज्यांच्याकडे ट्रॅक्टर सोडून इतर कोणतेही चारचाकी वाहनअसेल
=================
हे देखील वाचा : ‘या’ मुलानं नुकताच भारताच्या शिरपेचात सोनेरी तुरा रोवला
=================
दरम्यान या योजनेसाठी १ जुलै २०२४ ते ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज जमा करण्यात येणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामपंचायत पातळीपर्यंत अर्जाचा एक नमुना उपलब्ध करून दिला आहे. प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यात दरमहा १५०० इतकी रक्कम दिली जाणार आहे.