हिंदू धर्मामध्ये एकादशीला खूप महत्व आहे. त्यातही वारकरी संप्रदायाची एकादशी एक मोठे पर्व असते. एकादशीच्या दिवशी विष्णूची पूजा केली जाते. या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करून दुसऱ्या दिवशी द्वादशीला हा उपवास सोडला जातो. एकादशीचे व्रत वर्षातून २४ दिवस पाळले जाते. प्रत्येक महिन्यातील शुक्ल आणि कृष्ण पक्षातील अकराव्या तिथीला एकादशी साजरी केली जाते. श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षात येणारी एकादशी तिथी ही अजा एकादशी म्हणून ओळखली जाते. यंदा एकादशीच्या दिवशी शुभ संयोग जुळून आले आहेत.
श्रावणात येणारी एकादशी अजा एकादशी म्हणून ओळखली जाते. अजा एकादशीचे व्रत केल्याने मनुष्याला सुख, समृद्धी आणि पापांपासून मुक्ती मिळते. यावर्षी ऑगस्ट महिन्यात हे अजा एकादशीचे व्रत केले जाणार आहे.
अजा एकादशी कधी आहे?
अजा एकादशी तिथी २८ ऑगस्ट रोजी दुपारी १:१९ वाजता सुरू होईल आणि २९ ऑगस्ट रोजी पहाटे १:३७ वाजता समाप्त होईल. त्यामुळे अजा एकादशीचे व्रत २९ ऑगस्टलाच वैध असेल कारण धार्मिक शास्त्रात फक्त उदय तिथीच योग्य मानली गेली आहे. अजा एकादशीसोबतच २९ ऑगस्टला सर्वार्थ सिद्धी योगही असेल. त्यामुळे अजा एकादशीचा उपवास भक्तांसाठी अत्यंत शुभ आहे.
अजा एकादशीचे हे व्रत महत्त्वाचे मानले जाते. अशी मान्यता आहे की, एकादशीच्या दिवशी मनोभावे उपवास आणि व्रत केल्याने भगवान विष्णुची आपल्यावर कृपा राहाते. ही एकादशी जन्माष्टमीच्या चार दिवसानंतर आल्याने तिला एक वेगळेच महत्त्व प्राप्त होते. आज एकादशीचे व्रत केल्याने प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात सुख, समृद्धी आणि मोक्ष प्राप्त होतो. तसेच व्यक्तीला त्याच्या सर्व पापांपासून मुक्ती मिळते.
२९ ऑगस्टला गुरुवारी एकादशीच्या दिवशी २ शुभ संयोग तयार होत आहे. पहिला सिद्धी योग आणि दुसरा सर्वार्थ सिद्धी योग. हे दोन्ही योग ज्योतिषशास्त्रात शुभ मानले गेले आहे. या काळात कोणतेही शुभ कार्य केल्याने फलप्राप्ती होते. तसेच एकादशीच्या दिवशी दानधर्म केल्याने दुप्पट फल मिळते. या दिवशी उपवास सोडायचा असेल तर ३० ऑगस्टला लाभ चौघडीयामध्ये सकाळी ७ वाजून ३४ मिनिटांपासून ते ९ वाजून १० मिनिटांपर्यंत उपवास सोडू शकता.
आज एकादशीचा शुभ योग
२९ ऑगस्टला गुरुवारी एकादशीच्या दिवशी २ शुभ योग असणार आहेत. पहिला सिद्धी योग आणि दुसरा सर्वार्थ सिद्धी योग. हे दोन्ही योग अतिशय शुभ मानले जातात. या काळात शुभ कार्य केल्यास नक्कीच त्याची फलप्राप्ती होते.
आपल्या धर्मानुसार आणि पुराणांनुसार जो व्यक्ती अजा एकादशीचे व्रत करतो त्याला त्याचा पापांपासून मुक्ती मिळते. अजा एकादशीच्या व्रतामुळे माणसाची सर्व पापे नष्ट होतात. तसेच मनुष्याला मोक्षप्राप्ती होते असे म्हटले जाते. अश्वमेध यज्ञ, तीर्थक्षेत्रांतील दान, हजारो वर्षांची तपश्चर्या, कन्यादान इत्यादींपेक्षा या व्रताचे फल अधिक असते.
पूजेचा विधी
सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून व्रताचा संकल्प घ्यावा. सकाळी स्नान करून शुचिर्भूत व्हावे. भगवान श्री विष्णुची माता लक्ष्मीसह पूजा चंदन, तांदूळ, पिवळी फुले, हंगामी फळे, तीळ आणि तुळशी वाहून मनोभावे पूजा करावी. दिवसभर उपवास करून संध्याकाळी फळे खावी. एकादशीला विष्णु सहस्त्रनामाचे पठण करावे. जर हे व्रत करता येत नसेल तर या दिवशी भगवान विष्णुचे ध्यान करावे. एकादशीच्या दिवशी भात खाऊ नये.
या दिवशी घरामध्ये कांदा लसणाचा स्वयंपाक करू नये. एकादशीच्या दिवशी उपवास ठेवा आणि शक्यतो भगवान विष्णूचे ध्यान करा. याशिवाय तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करू शकता. या दिवशी वादापासून दूर राहा. अजा एकादशीच्या दिवशी, “उपेंद्राय नमः, ओम नमो नारायणाय मंगलम् भगवान विष्णू, मंगलम गरुध्वज. मंगलम् पुंडरीकाक्ष, मंगलय तनोहरिः।” या मंत्राचा जप करावा.
प्रत्येक एकादशीचे व्रत द्वादशी तिथीला सोडणे योग्य मानले जाते. पारणापूर्वी तुम्ही भगवान विष्णूची पूजा करावी. एकादशीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी ब्राह्मणांना भोजनदान करून आणि गरजू व्यक्तीला दान देऊन त्यानंतर आवळा, खीर वगैरे खाऊन उपवास सोडू शकता.
कथा
हरिश्चंद्र नावाचा एक प्रतापी आणि सत्यवादी चक्रवर्ती राजा राज्य करत होता. देवाच्या इच्छेने, त्याने स्वप्नात आपले राज्य एका ऋषीला दान केले आणि परिस्थितीमुळे त्याला आपली पत्नी आणि मुलगा देखील विकावा लागला. तो स्वत: चांडाळचा गुलाम झाला.त्या चांडाळासाठी कफन गोळा करण्याचे काम राजाने केले, परंतु या कठीण कामातही त्याने सत्य बोलणे सोडले नाही. अशीच बरीच वर्षे निघून गेल्यावर त्याला आपल्या कर्माचे त्यांना खूप वाईट वाटले आणि त्यातून मुक्त होण्याचा मार्ग शोधू लागला.ते नेहमी विचारात असायचे की मी काय करू? मला या नीच कर्मापासून मुक्ती कशी मिळेल? एकदा गौतम ऋषी त्यांच्याकडे गेले. राजा हरिश्चंद्राने त्यांना नमस्कार केला आणि घडलेले सर्व सांगितले.
======
हे देखील वाचा : केसांना आठवड्यातून किती वेळा तेल लावावे? घ्या जाणून
======
राजा हरिश्चंद्राची दु:खद कथा ऐकून महर्षी गौतमही खूप दुःखी झाले आणि ते राजाला म्हणाले – हे राजा ! कृष्ण पक्षातील एकादशीचे नाव अजा आहे. तुम्ही त्या एकादशीला विधीप्रमाणे व्रत करा आणि रात्री जागरण करा. याने तुमची सर्व पापे नष्ट होतील. असे सांगून महर्षि गौतम निघून गेले. जेव्हा अजा नावाची एकादशी आली तेव्हा राजा हरिश्चंद्राने महर्षींच्या सल्ल्यानुसार विधी व्रत आणि रात्रीचे जागरण केले.
या व्रताच्या प्रभावाने राजाची सर्व पापे नष्ट झाली .त्यांच्यावर फुलांचा वर्षाव सुरू झाला. त्याला ब्रह्मा, विष्णू, महेश आणि देवेंद्र सारखे देव आपल्या समोर उभे असलेले दिसले आणि आपला मृत मुलगा जिवंत आणि त्याची पत्नी चांगले वस्त्र परिधान केलेली आणि दागिन्यांनी परिपूर्ण असल्याचे पाहिले. व्रताच्या प्रभावामुळे राजाला त्याचे राज्य परत मिळाले. खरे तर एका ऋषीने हे सर्व राजाची परीक्षा घेण्यासाठी केले होते.अजा एकादशीचा व्रत आणि पूजा केल्याने राजा हरिश्चंद्राला त्याचे गेलेले सर्व वैभव परत मिळाले. शेवटी राजा हरिशचंद्र आपल्या कुटुंबासह स्वर्गात गेले.