Home » History of Baloch : पाकिस्तानात राहणाऱ्या ‘या’ मराठ्यांबद्दल जाणून घ्या !

History of Baloch : पाकिस्तानात राहणाऱ्या ‘या’ मराठ्यांबद्दल जाणून घ्या !

by Team Gajawaja
0 comment
History of Baloch
Share

स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी करणाऱ्या बलुचिस्तान लिबरेशन आर्मी या संघटनेनं 11 मार्चला पाकिस्तानमधली जाफर एक्सप्रेस हायजॅक केली. आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी तसंच बलुचिस्तानचं पाकिस्तानकडून होणार शोषण थांबवण्यासाठी हा हल्ला केल्याचं या संघटनेकडून सांगितलंय. पण बलुचिस्तान हा बहुसंख्य मुस्लिम समाज असणारा भाग तरीही बलुचिस्तानमधले अनेक लोक आजही स्वतःला पाकिस्तानचा भाग मानत नाही त्यामुळे त्यांनी पाकिस्तानात राहून पाकिस्तानशीच हा संघर्ष सुरू केलाय. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण याच बलुचिस्तानमध्ये एक जमात आहे ती म्हणजे बुगटी मराठा ही जमात, फक्त नावाला मराठा नाही तर या जमातीतले लोक आजही मराठी संस्कृती आणि परंपरा जमेल तशी पाळतायत आणि जपतायत आणि हेच लोक नाना पाटेकरांच्या तिरंगा मधल्या मराठा मरता है या मारता है या डायलॉगवर थिएटरमध्ये अक्षरशः धुडगूस घालतात. पण लोकं नेमके पाकिस्तानात पोहचले कसे? आणि बलुचिस्तानातले मराठा नेमके आहेत तरी कोण ? एकंदरीतच त्यामागचा इतिहास काय जाणून घेऊ. (History of Baloch)

मंडळी, तूम्हाला रॉय या चित्रपटातलं जॅकलिन फर्नांडीसचं चिटिया कलाईया हे गाणं आठवत असेल किंवा सनी लिओनीचं बेबी डॉलम सोने दी हे तरी नक्कीच आठवत असेल ही दोन्ही गाणी प्रचंड गाजली होती, पण तुम्हाला माहितेय का ही दोन्ही गाणी एका मराठी माणसानं लिहिलेली आहेत. मराठी म्हणण्यापेक्षा एका मराठा माणसानं लिहिलेली आहेत आणि विशेष म्हणजे या मराठा माणसाचं नाव आहे सब्ज अली बुगटी (Sabz Ali Bugti) ! नाव ऐकून थोडसं आश्चर्य वाटेल पण हे सब्ज अली बुगटी हे बलुचिस्तानमधले मराठा आहेत जो बलुचिस्तान पाकिस्तानमध्ये आहे आणि गेल्या काही दिवसापासून चर्चेत आहे. पण आपली चर्चा बलुचिस्तानमधले मराठा ही आहे. तर हे मराठा तिथे पोहचले कसे?

तर अवघ्या हिंदुस्थानाला भगव्या झेंड्याखाली आणणाऱ्या मराठ्यांना पानिपतात मात्र हार मानावी लागली होती. पण ही हार पत्करावी लागली यापेक्षाही मोठी गोष्ट होती. ती म्हणजे सुमारे 22 हजार मराठ्यांना शत्रूची गुलामी पत्करावी लागली होती. यापैकीच काही मराठे म्हणजे बलोच मराठे ज्यांना पानिपतच्या युद्धानंतर अफगाणिस्तानात गुलाम म्हणून नेण्यात आलं. त्याच झालं असं की 10 जानेवारी 1761 ला पानिपतच्या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला आणि जवळजवळ 22 हजार मराठा युद्ध कैदी अहमद शाह अब्दालीच्या कैदेत सापडले. आता तेव्हा काही पाकिस्तानचा जन्म झाला नव्हता. तेव्हा भारतातून अफगाणिस्तानात जायचा सगळ्यात सोपा मार्ग दिल्ली पंजाब या मार्गानं अफगाणिस्तान. अब्दालीसुद्धा असाच जायला निघाला. सियार उल मुत्ताखिरींन या इतिहासकारानं या युद्ध कैद्यांचं वर्णन केलं आहे त्यात तो म्हणतो की “दुःखी युद्ध कैद्यांच्या लांबच लांब रांगा करण्यात आल्या आणि त्यांना थोडे बहुत अर्धे कच्चे अन्न व पाणी देण्यात आले युद्ध संपल्यानंतर जे काही स्त्री-पुरुष, स्त्रिया आणि लहान मुले वाचली त्यांना गुलाम म्हणून नेण्यात आले अंदाजे 22000. त्यातले बरेचसे लोक मोठ्या हुद्द्यावरचे होते” (History of Baloch)

दरम्यान अत्यंत हलाकीच्या परिस्थितीमध्ये दोन-तीन महिने राहिलेल्या या लोकांना पुढे बोलणखिंडीतून अफगाणिस्तानकडे जाणारा प्रवास झेपणार नाही हे अब्दालीच्या लक्षात आले. शिवाय पानिपतच्या युद्धात अब्दालीचंसुद्धा खूप नुकसान झालं होत त्यामुळे मग या कैद्यांचा बंदोबस्त करणं गरजेचं होत. अशातच पंजाब प्रांत पार केल्यानंतर बलुचिस्तानातल्या डेरा बुकटी क्षेत्रात अब्दाली पोहोचला. तेव्हा बलुचिस्तानचा तत्कालीन शासक होता मीर नासिर खान नुरी. याने अब्दालीला पानिपतच्या युद्धासाठी 15 हजार सैनिक पुरवले होते. त्याच्या बदल्यात नासिर खानाला पैसे द्यायला अब्दालीकडे पैसे उरलेच नव्हते. तेव्हा अब्दालीने त्या पैशांऐवजी हे 22 हजार युद्धकैदी नुरीकडे सोपवले आणि त्यानुसार मग हे 22 हजार मराठे बलुचिस्तानमध्ये पोहोचले आणि बलुचिस्तान हेच मग या मराठ्यांच आश्रयस्थान झालं.

दरम्यान इथे एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की पानिपतमध्ये जे बलुची सैन्य लढलं होतं ते काही सगळं एका जातीचं नव्हतं, ते वेगवेगळ्या जमातींचं होतं. मग या युद्ध कैद्यांची विभागणीसुद्धा त्या वेगवेगळ्या जमातींमध्ये करण्यात आली. कारण या सगळ्या मराठ्यांना एकत्र ठेवणं तस बलुचिस्तानला परवडलच नसतं. मग बुगटी, मीर, मझारी, रायसानी, गुरचानी अशा वेगवेगळ्या जमातींमध्ये मराठा विभागले गेले. त्यामुळे मग या मराठ्यांनासुद्धा बुगटी मराठा, मझारी मराठा अशी वेगवेगळी उपनाव मिळाली. त्यापैकी बुगटी मराठ्यांची जास्त माहिती उपलब्ध आहे. (History of Baloch)

दरम्यान महाराष्ट्रातून बलुचिस्तानातल्या रखरखित प्रदेशात येऊन पडल्यानं या मराठ्यांचे खाण्यापिण्याचेही हाल होत होते पण त्यातही काहींनी आपल्या कौशल्यांना पाण्याचे स्त्रोत शोधून काढले आणि बलुचिस्तानच्या रेगिस्तानात शेती करायला सुरुवात केली. मातीतून मोती पिकवणाऱ्या मराठ्यांनी बलुचिस्तानच्या रेतीतून शेती पिकवली आणि आपला अस्सल मरहट्टापणा दाखवून दिला हळूहळू या मराठ्यांनी तिथल्या परिस्थितीशी जुळवून घेत आपलं नवं आयुष्य जगायला सुरुवात केली. पण तरीही पुढे जवळपास दीडशे वर्ष या मराठ्यांना हलाकीत काढावे लागले तसं पाहायला गेलं तर स्थानिक बलुची आणि युद्ध कैदी मराठे यांचे संबंध जिव्हाळ्याचे होते पण इथे जे बलुची कायदे होते ते मराठ्यांसाठी खूप जाचक होते. त्यांना जिरगा असं म्हणत. यामध्ये एखाद्या बलुच व्यक्तीने जर एखाद्या मराठा व्यक्तीचा खून केला तर त्याला गुन्हा समजण्यात येत नसे त्याला कोणती शिक्षा देखील होत नसे पण तेच जर का एखाद्या मराठा व्यक्तीचा खून झाला तर त्याला बदल घेण्यासाठी काहीच पर्याय नव्हता अशा प्रकारच्या जाचक गोष्टी सहन कराव्या लागत होत्या. अखेर 185 वर्षांनी म्हणजेच 1944 मध्ये बुगटी समाजाचे मुख्य सरदार नवाब अकबर खान बुकटी यांनी या मराठ्यांची गुलामगिरीतून मुक्तता केली. तोपर्यंत 1944 पर्यंत हे मराठे बलुचिस्तान मध्ये गुलामगिरीचे जीवन जगत होते. (History of Baloch)

===============

हे देखील वाचा : Bhangarh Fort : भुतांची ‘भानगड’ असलेला हॉन्टेड भानगढ किल्ला

===============

तरी आजही हे लोक बलुचिस्तानात राहतात. तिथे त्यांची काही शाखांमध्ये विभागणी केली जाते त्यात कल्पर मराठा नोथानी मराठा शांबानी मराठा या मुख्य शाखा तर उपशाखांमध्ये बुकटी मझारी रायसानी गुरशानी अशा शाखांचा समावेश होतो तसंच दरुरग मराठा आणि साहू मराठा अशाही दोन जमाती बुकटी मराठ्यांमध्ये आहेत यापैकी साहू मराठ्यांनी उत्तम प्रकारे शेती करून बलुचिस्तानात पहिल्यांदा शेतीच तंत्र आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. हे साहू मराठे धर्माने जरी मुस्लिम असले तरी त्यांच्या लग्नातील विधी अजून देखील मराठीच पद्धतीने केले जातात. उदाहरणार्थ घाणा भरणे हळद नवऱ्या मुलाची लग्ना अगोदरची आंघोळ या पद्धती आजही त्यांच्यात अस्तित्वात आहेत. इतकच काय तर 2017 मध्ये तिथल्या मराठी कौमी इतिहाद या संघटनेनं मराठा समाजाच्या आंदोलनाला आपला पाठिंबा जाहीर केला होता हे सगळं विश्वास बसणार नसलं तरी हे खरं आहे. काळानुरूम बलुचिस्तानातील या मराठ्यांचा धर्म भाषा बदलत गेली पण आजही इथली लोकं आपल्या आईला आई अशीच हाक मारतात. आज महाराष्ट्राच्या भूमीपासून त्यांचं अस्तित्व जरी लांब असलं तरी त्यांचं मायभूमीशी असलेलं नातं किती घट्ट आहे हे यावरून दिसून येत.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.