आज पासून अर्थात २६ जुलै पासून पॅरिसमध्ये ऑलम्पिक खेळांना सुरुवात होत आहे. प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते की, आयुष्यात एकदा तरी ऑलम्पिक स्पर्धेत जावे आणि आपल्या खेळाचे प्रदर्शन करत देशाचे नाव उंचवावे.करावे. जिंकणे हा भागच दूर असतो, या स्पर्धांमध्ये सहभागी होता आले तरी अनेक जणं त्यातच धन्यता मानतात. दार चार वर्षांनी हा खेळांचा मोठा महोत्सव भरवला जातो. ऑलम्पिकबद्दल आपण अनेकदा ऐकतो, वाचतो, पाहतो मात्र ही स्पर्धा कधी सुरु झाली, कशी सुरु झाली याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? चला जाणून घेऊया या सर्व प्रश्नांची उत्तरं.
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात खेळांना खूपच महत्व आहे. खेळांमुळे माणसाचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य अतिशय सुदृढ राहते. आरोग्य ही संपत्ती आहे आणि शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी खेळ आवश्यक आहेत. मैदानी खेळ आणि बैठे खेळ हे दोन्ही माणसाच्या आरोग्यासाठी लाभदायक असतात. खेळांचे महत्व जाणून जुन्या लोकांनी विविध खेळांच्या स्पर्धा भरवण्यास सुरुवात केली. स्पर्धेतील विजय पराज्याला महत्व न देता त्यातून आरोग्य कसे उत्तम होईल ते उद्दिष्ट ठेवण्यात आले.
याच स्पर्धांमधून उगम झाला तो ऑलम्पिक स्पर्धांचा. या स्पर्धांचे जनक म्हणून फ्रेंच जहागीरदार पिएर द कुबेर्तान यांना ओळखले जाते. मात्र त्यांना या स्पर्धेची प्रेरणा मिळाली ती इंग्लंडंमधल्या वेनलॉक ऑलिंपिक गेम्समधून. ऑलिम्पिक स्पर्धेची सुरुवात ३००० वर्षांपूर्वी झाली. पूर्वी हे खेळ प्राचीन ग्रीसमध्ये खेळले जायचे. १९ व्या शतकाच्या शेवट शेवट या खेळांना पुनरुज्जीवन मिळाले आणि त्यानंतर हे ऑलम्पिक खेळ जगातील सर्वात महत्वाची आणि प्रमुख क्रीडा स्पर्धा ठरली. ऑलम्पिक स्पर्धा ही सर्वात जुनी आणि मोठी मानली जाते.
१८९४ मध्ये फ्रान्सच्या पियरे डी कौबर्टिन यांनी ऑलम्पिक खेळांचे पुनरुज्जीवन केले. पुढे १८९६ मध्ये ग्रीसची राजधानी अथेन्स येथे पहिल्यांदाच आधुनिक ऑलिम्पिकचे आयोजन करण्यात आले होते. पहिली ऑलिम्पिक स्पर्धा एप्रिल १८९६ मध्ये अथेन्समधील पॅनाथेनाइक स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये त्या काळात फक्त १४ राष्ट्रे आणि २४१ खेळाडू सहभागी झाले होते. या खेळाडूंनी ४३ खेळांमध्ये सहभाग घेतला होता.
पहिल्या ऑलिंपिक मध्ये टेनिस, ट्रॅक अँड फिल्ड, फेन्सिंग, वेटलिफ्टिंग, सायकलिंग, कुस्ती, नेमबाजी, जलतरण आणि जिमनॅस्टिक्स आदी खेळांचा समावेश करण्यात आला होता. क्रिकेट आणि फुटबॉल या खेळांना देखील ऑलम्पिकमध्ये स्थान मिळाले होते. मात्र अपुऱ्या खेळाडूंमुळे हे खेळ रद्द करण्यात आले होते.
प्राचीन काळी ग्रीसमधल्या ऑलिम्पिया शहरामध्ये दर 4 वर्षांनी हे ऑलम्पिकचे खेळ खेळले जायचे. पुढे हीच परंपरा कायम सुरू ठेवण्यात आली. दोन ऑलिंपिकदरम्यानच्या 4 वर्षांच्या काळाला ऑलिम्पियाड म्हटले जाते. हे पूर्वीच्या काळी कालगणनेचे एककही होते. त्या काळी वर्षांऐवजी ऑलिम्पियाडमध्ये कालगणना केली जायची.
1900 साली पॅरिसमध्ये झालेल्या ऑलम्पिक स्पर्धांमध्ये पहिल्यांदाच महिला सहभागी झाल्या होत्या. या ऑलम्पिकमध्ये सहभागी झालेल्या 997 अॅथलीट्सपैकी 22 महिला होत्या. या महिलांनी टेनिस, सेलिंग, क्रोके, इक्वेस्ट्रियानिझम, गोल्फ या खेळांमध्ये सहभाग नोंदवला होता.
2012मध्ये लंडन ऑलम्पिकमध्ये महिलांच्या बॉक्सिंगचाही समावेश करण्यात आला. तेव्हापासून ऑलिंपिकच्या सर्व क्रीडा प्रकारांत महिलांचा समावेश झाला. 1991पासून ऑलिंपिकमध्ये नवीन खेळाचा समावेश करण्यासाठी एक नियम करण्यात आला. हा नियम होता, महिला आणि पुरुष अशा दोन्ही अॅथलीट्सचा सहभाग ज्या खेळात असेल, तोच ऑलिंपिकमध्ये समाविष्ट केला जाऊ शकतो.
ऑलिंपिकचे बोधचिन्ह (लोगो)
पाचही रिंग एकाच आकाराच्या असून त्यात निळा, पिवळा, काळा, हिरवा आणि लाल रंगांचा समावेश आहे. हे 1913 मध्ये तयार करण्यात आले होते. सर्वात आधी पियर डी कौबर्टिन यांनी हे डिझाइन केले होते. त्यावेळी ध्वजाच्या पांढऱ्या पार्श्वभूमीत हे 5 रंग मिसळून सर्व देशांचे ध्वज एकत्र करण्यात आले होते. हे पाच रंग जगातील पाच खंड दर्शवतात. निळा युरोप, पिवळा आशिया, आफ्रिकेसाठी काळा, ऑस्ट्रेलिया-ओशनियासाठी हिरवा आणि अमेरिकेसाठी लाल रंग आहे.
======
हे देखील वाचा : ‘क्रिकेटचा आवाज’ हर्षा भोगले
======
१९०० मध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारताला पहिले ऑलिम्पिक मेडल मिळाले होते. हे मेडल नॉर्मन प्रिचर्ड या एकमेव खेळाडूने भारतासाठी दोन रौप्यपदके जिंकली होती. १९२८ मध्ये भारताला पहिले सुवर्ण पदक भारताच्या हॉकी संघाने मिळवून दिले होते. त्यानंतर वैयक्तिक २००८ मध्ये पहिले सुवर्णपदक जिंकणारा अभिनव बिंद्रा हे एकमेव खेळाडू होते.
यावर्षी ऑलम्पिक स्पर्धेला 26 जुलैपासून सुरुवात होणार असून ही स्पर्धा 11 ऑगस्टला संपणार आहे. त्यामुळे 16 दिवसात प्रेक्षकांना अतिशय अभूतपूर्व खेळांचे अनुभव घेता येणार आहे. 26 जुलैला ओपनिंग सेरेमनी असणार आहे. त्यामुळे हा सोहळा याची देहि याची डोळा पाहण्यासाठी क्रीडाप्रेमी सज्ज आहेत.