आज महाराष्ट्रातील अनेक मुली उठसूट स्वतःला शिवकन्या म्हणवून घेताना आपण ऐकतोय, पाहतोय. पण शिवरायांच्या शंभूराजे आणि रामराजे यांच्या व्यतिरिक्त ६ कन्या होत्या. याबद्दल कधीच कोणी बोलताना दिसून येत नाही. मुळात शिवरायांवर इतके चित्रपट आले, इतक्या सिरियल्स आल्या. अजूनही बरच काही आलं. पण त्यात कुठेही शिवरायांच्या कन्यांचा इतिहास आपल्याला दाखवला जात नाही, सांगितला जात नाही. त्यामुळे शंभू राजे, आणि राम राजे हे दोनच महाराजांचे पुत्र होते, असा अनेकांचा समज झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सहा कन्या होत्या, त्या म्हणजे सखुबाई, राणूबाई, अंबिकाबाई, दीपाबाई, राजकुंवरबाई आणि कमळाबाई ! पण या इतिहासात नेहमीच दुर्लक्षितच राहिल्या. या सहा कन्यांचा एकंदरीत इतिहास काय ? जाणून घेऊ. (Chatrapati Shivaji Maharaj)
छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chatrapati Shivaji Maharaj) इतिहास हा आपल्या सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय ! आपल्यापैकी प्रत्येकाने त्यांचा इतिहास थोडाबहुत ऐकलेला, वाचलेला असतोच. लहानपणी छत्रपती शिवाजी महाराज की जय… या घोषणेपासून चौथी, सातवीत शिकलेला इतिहास ते आतापर्यंत थोडा का होईना आपल्याला त्यांचा इतिहास माहितीच असतो. शिवराय हे नाव ऐकल्यावर आपल्या डोळ्यासमोर येतात ते पराक्रमी, रणधुरंधर, तत्वनिष्ठ, स्वराज्य संस्थापक आणि गोरगरीब अबालवृद्ध अश्या साऱ्या रयतेचे राजे ! पण या कठोर आणि स्वाभिमानी राजाच्या मनातसुद्धा एका बापाचं हळवं काळीज होत. त्यांची २ मुलं म्हणजे शंभू राजे आणि रामराजे यांची इतिहासाने आवर्जून दखल घेतली मात्र या सगळ्यात मागे राहिल्या त्या त्यांच्या ६ मुली ! अर्थात सखुबाई, राणूबाई, अंबिकाबाई, दीपाबाई, राजकुंवरबाई आणि कमळाबाई. या सहा जणी खऱ्या शिवकन्या आहेत ही गोष्टच मुळात आपल्या वाचनात फार कमी येते. त्यामुळे त्या मुलींचा इतिहास माहिती असणं तर दूरच. पण त्यांच्याबद्दलच एक एक करून थोडीफार माहिती देण्याचा प्रयत्न करते.
आता आपल्या सगळ्यांना माहितीच आहे कि शिवाजी महाराजांना ८ पत्नी होत्या. सईबाई निंबाळकर, सोयराबाई मोहिते, पुतळाबाई पालकर, लक्ष्मीबाई विचारे, काशीबाई जाधव, सगुणाबाई शिर्के, गुणवंतीबाई इंगळे, सकवारबाई गायकवाड. हे ८ विवाह करण्यामागे सुद्धा स्वराज्यविस्ताराच धोरण होतं. स्वराज्यविस्तार व्हावा यासाठी जिजाऊ माँ साहेबांनी अनेक जहागीरदारांना आणि अनेक संस्थानिकांना स्वराज्यात सामील होण्याची विनंती केली. पण शिवाजी महाराजांच्या घराण्याशी संबंध असेल तरच स्वराज्यात सामील होऊ असा अग्रह त्यावेळच्या काही घराण्यांनी धरला. त्यामुळे कोणतेही आढेवेढे न घेता जिजाऊंनी त्यांच्या अटी मान्य केल्या आणि हिंदवी स्वराज्य मजबूत करण्यासाठी शिवाजी महाराजांना हे विवाह करण्यास राजी केल. निंबाळकर, मोहिते, पालकर अशा प्रसिद्ध आणि बलवान मराठा योद्धे असलेल्या घराण्यांचा पाठिंबा मिळवणे हा या स्वराज्य विस्ताराच्या धोरणाचा एक भाग होता. यामुळेच अनेक भक्कम मराठा फौजदार स्वराज्याच्या कार्यात सामील झाले.(Chatrapati Shivaji Maharaj)
तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नी म्हणजेच सईबाई यांच्यापासून त्यांना ४ मुलं होती. त्यात सखूबाईंचा जन्म पहिला. त्यामुळे त्यांच्यावर शिवाजी महाराजांचं अधिक प्रेम होतं. पुढे त्यांचा विवाह महादजी निंबाळकर यांच्याशी झाला. हे निंबाळकर म्हणजे फलटणच मोठं घराणं होत. आणि विशेष म्हणजे याच फलटणच्या निंबाळकरांकडे सईबाईंचं माहेर होतं. त्यामुळे सखूबाईंच्या लग्नानंतर शिवाजी महाराज आणि निंबाळकरांचे संबंध अधिकच वाढले.
यांच्याबद्दल एक गोष्ट म्हणजे या महादजी निंबाळकरांना १६८९ साली औरंगजेबाने संभाजी महाराजांसोबतच पकडलं होत आणि कैदेत ठेवलं होतं. त्यानंतर महादजी आणि सखुबाई यांना ग्वाल्हेरच्या किल्ल्यात बंदी ठेवण्यात आलं. पुढे महादजीच्या मृत्यूंनंतर त्या सती गेल्या होत्या. यानंतर शिवाजी महाराजांच्या दुसऱ्या कन्या राणूबाई ! यादेखील सईबाई यांच्याच कन्या ! यांचा विवाह लखुजी जाधवांच्या पणतूशी अचलोजी जाधव यांच्याशी झाला आणि पुन्हा एकदा माँ जिजाऊंच्या घराण्याशी त्या पुन्हा जोडली गेल्या. त्यांचं शंभू राजेंवर जीवापाड प्रेम होत. राणूबाईंना शंभू राजेंना आईची उणीव कधीच भासू दिली नाही. अचलोजी यांची साताऱ्यातील भुईंज इथे जहागीरी होती त्यामुळे राणूबाई शेवटपर्यंत तिकडेच राहिल्या.(Chatrapati Shivaji Maharaj)
शिवाजी महाराजांची तिसरी मुलगी अंबिकाबाई. त्यासुद्धा सईबाई यांच्याच कन्या ! त्यांचा विवाह साताऱ्याजवळील तरळे गावचे हरजीराजे महाडिक यांच्याशी झाला. पुढे कर्नाटकात राहून हरजींनी स्वराज्याची सेवा केली. जिंजीचा किल्ला याच हरजींकडे होता जो नंतर त्यांनी राजाराम महाराज यांच्याकडे सोपवला. तर या तीन म्हणजेच सखुबाई राणूबाई आणि अंबिकाबाई या सईबाई आणि शिवाजी महाराज यांच्या मुली… आणि या संभाजीमहाराजांच्या सक्ख्या बहिणी होत्या.
=================
हे देखील वाचा : Shivjayanti : शिवरायांच्या सैन्यातील मुस्लिमांची संख्या ऐकून हैराण व्हाल
=================
शिवाजी महाराजांना त्यांच्या पत्नी सोयराबाई यांच्यापासून दीपाबाई नावाची मुलगी होती. ही राजाराम महाराजांची सक्खी बहीण होती. यांचं लग्न महाराजांचे सरदार विसाजी उर्फ विश्वासराव यांच्यासोबत झालं. त्याचबरोबर महाराजांना सगुणाबाई यांच्यापासून राजकुवर नावाची मुलगी होती. गणोजी शिर्क्यांसोबत राजकुवर बाईंचं लग्न झालं. हे गणोजी शिर्के कोकणातले होते. गणोजींची सख्खी बहीण येसूबाई ह्या संभाजी महाराजांच्या पत्नी होत्या. याच गणोजी शिर्के यांचा संभाजी महाराजांना पकडून देण्यात हात होता, हे तर आपल्याला माहीतच असेल. शिवाजी महाराजांना त्यांच्या आठव्या आणि शेवटच्या पत्नी सकवारबाई यांच्यापासून कमलाबाई नावाची मुलगी होती. त्यांचं लग्न नेतोजी पालकर यांच्या मुलासोबत झालं. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांना 2 मुलं होती. महाराणी सईबाई यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज हे शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र होते, तर महाराणी सोयराबाई यांचे पुत्र छत्रपती राजाराम महाराज हे शिवाजीराजांचे दुसरे पुत्र होते. शिवाजी महाराजांनंतर संभाजी महाराजांनी स्वराज्याचा कारभार पाहिला आणि संभाजी महाराजांनंतर राजाराम महाराज स्वराज्याचे छत्रपती झाले. (Chatrapati Shivaji Maharaj)
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. रयतेचं राज्य निर्माण केल. ते खूप पराक्रमी होते ह्याबद्दल आपल्याला माहिती असतेच पण या सगळ्यात त्यांना ज्यांची साथ लाभली त्या त्यांच्या ८ पत्नी आणि त्यांच्या मुलींबद्दल इतिहासात फार कमी माहिती असते. तीच माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून केला आहे इतकच !