भारतामध्ये सर्वच गोष्टींमध्ये विविधता दिसून येते. भाषेपासून ते खाण्यापर्यंत, पेहराव, सण-समारंभ आदी सर्वच बाबतीमध्ये ही भिन्नता दिसून येते. आपल्या देशातील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे इथे साजरे होणारे सण. प्रत्येक ऋतू आणि वातावरणानुसार आपलीकडे सणांची आखणी केल्याचे दिसून येते. यात जर आपण पाहिले तर श्रावण महिना हा सणाचा राजा म्हणून ओळखला जातो. कारण श्रावणात रोजच कोणता ना कोणता सण साजरा केला जातो. (Shravan Importance)
हिंदू धर्मियांचा अतिशय पवित्र आणि सात्विक महिना म्हणून श्रावण महिना ओळखला जातो. श्रावण महिना हा पंचांगानानुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, म्हणूनच या महिन्याला श्रावण महिना म्हटले जाते.
श्रावण महिना शिव शंकराला समर्पित असतो. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी आणि इतरही काही महत्वाच्या दिवशी उपवास केला जातो. काही लोकं तर संपूर्ण श्रावणात एकवेळचा उपवास करताना दिसतात. या महिन्यात आपण शंकराची पूजा केली तर त्याचे शुभ फळ प्राप्त होते. शंकरावर या दिवशी जलाभिषेक, दुग्धाभिषेक, रुद्राभिषेक मोठ्या प्रमाणावर केला जातो. त्याचप्रमाणे प्रत्येक सोमवारी महादेवावर वाहिल्या जाणाऱ्या शिवामूठीचे महत्त्वही खूप आहे.
शिवशंकराला प्रसन्न करून घेण्यासाठी श्रावण महिना नेहमी साजरा करण्यात येतो आणि हा सर्वाधिक पवित्र महिना समजण्यात येतो. देवी पार्वती यांनी याच महिन्यात शंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी कठोर उपवास केला आणि त्यांच्या या कठोर तपस्येला याच महिन्यात शंकरांनी फळ दिले होते. या महिन्यात करण्यात आलेल्या व्रताचे सकारात्मक आणि चांगले फळ मिळते. या श्रावणात अनेक सण येतात. प्रत्येक सण आपले आपल्या आप्तेष्टांसोबतचे संबंध अधिकच दृढ करतो.
श्रावणात कोणते सण येतात पाहूया.
श्रावणी सोमवार
या महिन्याच्या सणाची सुरूवात होते ती म्हणजे श्रावणी सोमवारने. या महिन्यातील सोमवाराला अतिशय महत्व आहे. त्यामुळे अनेक शिवभक्त यादिवशी उपवास करतात. दर श्रावणी सोमवारी शंकराच्या पिंडीवर शिवामूठ वाहतात. नवीन लग्न झालेल्या महिला श्रावणी सोमवाराचे व्रत पहिले पाच वर्ष करतात तर काही महिला आयुष्यभर हे व्रत करतात.
श्रावणी मंगळवार, मंगळागौर
नवविवाहितांसाठीचा अतिशय महत्वाचा आणि खास सण असतो तो म्हणजे श्रावणातील मंगळवारी येणारी मंगळागौर. अखंड सौभाग्यासाठी आणि सौख्यासाठी हे मंगळागौरीचे व्रत करण्यात येते. लग्नानंतर पहिले पाच वर्ष सवाष्णींसोबत हे व्रत पूर्ण करण्याची पद्धत आहे. मंगळागौरीची पूजा, उखाणे, रात्री जागरण आणि मंगळागौरीचे पारंपरिक खेळ खेळत हा सण साजरा करण्यात येतो.
जिवती पूजन
श्रावण महिना चालू झाला की, प्रत्येक घरामध्ये जिवती देवीची प्रतिमा भिंतीवर लावली जाते. याच महिन्यात हे जिवती व्रत केले जाते. श्रावणा महिन्याच्या प्रत्येक शुक्रवारी हे व्रत असते. जिवत्यांना कापसाचे वस्त्र, दुर्वा वाहून, अघरडा वाहून किंवा माळ तयार करून वाहिली जाते. एका शुक्रवारी लहान बाळ असणाऱ्या एका सवाष्णीला जेवायला बोलावून तिची ओटी भरून हे व्रत केले जाते. यासोबतच दर शुक्रवारी संध्याकाळी दूध- फुटाण्याचा नैवेद्य दाखवून सवाष्णींना हळदीकूंकवाला बोलावले जाते. जिवतीची ही पूजा खासकरून मुलांच्या आरोग्यासाठी, सुखरूपतेसाठी आणि दिर्घायुष्यासाठी केली जाते.
नागपंचमी
श्रावणातल्या पंचमीला साजरा होणार सण असतो नागपंचमी. शेतकऱ्यांचा मित्र म्हणून या दिवशी ते नागाची पूजा करतात. नागपंचमी साजरी करण्याचे देखील काही नियम आहेत. या दिवशी नागाला कोणतीही इजा होऊ नये म्हणून जमीन खणली जात नाही, नांगरली जात नाही, चिरले जात नाही, तळले जात नाही आदी अनेक नियम आहेत. शिवाय जिथे वारूळ असेल तिथे जाऊन नागाची पूजा केली जाते.
नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन
कोळी समाजाचा महत्त्वाचा सण म्हणून नारळी पौर्णिमा ओळखली जाते. हा कोळी लोकांसोबतच सर्वच मोठ्या आनंदाने साजरा करतात. या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करून नव्या हंगामासाठी होड्या पुन्हा समुद्रात सोडल्या जातात आणि मासेमारीला पुन्हा सुरूवात होते. या दिवशी दुसरा सण साजरा होतो रक्षाबंधन. भावाबहिणीचे नाते अधोरेखित करणारा हा सण सर्वच भावाबहिणींसाठी खास असतो. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि भाऊ तिला तिचे रक्षण करण्याचे वचन देतो.
कृष्ण जन्माष्टमी आणि गोपाळकाला
श्रीकृष्णाचा जन्मदिन म्हणून याच महिन्यात कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते. यादिवशी कृष्ण मंदिरांमध्ये आणि घरी देखील मोठ्या उत्साहाने कृष्णाचा जन्मोत्सव केला जातो. तर दुसऱ्या दिवशी गोपाळकालाही मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येतो.
पिठोरी अमावास्या, पोळा
श्रावणाची सांगता करणारा सण म्हणजे पिठोरी अमावास्या अर्थात पोळा. पिठोरी अमावस्याचे देखील व्रत केले जाते. यादिवशी दुसरा सण साजरा होतो पोळा. शेतकऱ्याचा उजवा हात आणि जीवाभावाचा मित्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैलाची या दिवशी पूजा करण्यात येते. त्यांना सजवून त्या दिवशी गोडधोड खाऊ घालून शेतीच्या कामातून विश्रांती दिली जाते. हा सण खेडे गावांमध्ये मोठ्या आनंदाने साजरा करण्यात येतो.
======
हे देखील वाचा : जाणून घ्या मंगळसूत्राबद्दलची खास माहिती
======
या श्रावण महिन्याला धार्मिक महत्व तर आहेच सोबतच वैज्ञानिक महत्व देखील आहे. श्रावणात ऋतूतील बदलामुळे माणसाच्या शरीराची पचनक्रिया मंद झालेली असते. या महिन्यात सतत सण असल्याने केल्या जाणाऱ्या उपवासांमुळे आपल्या पचनसंस्थेला थोडी विश्रांती मिळते आणि शरीरातील सर्व दूषित पदार्थ बाहेर पडतात.
श्रावण महिन्यात काय खावे आणि खाऊ नये हे देखील महत्वाचे असते. या महिन्यात पालक, मेथी, लाल भाजी, चाकवत, कोबी, पत्ताकोबी, पालेभाज्या खाणे चांगले नसते. या ऋतूमध्ये त्यांच्यामध्ये बॅक्टेरिया आणि कीटकांचे प्रमाण वाढते. श्रावणात पाऊसाचे देखील वेगळेच रूप पाहायला मिळते. या पावसाचे वर्णन करण्याचा बालकवी यांना देखील मोह आवरला नाही. म्हणूनच त्यांनी लिहून ठेवले, (Shravan Importance)
“श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे; क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे.”