Home » जाणून घ्या घटस्थापनेचा शुभमुहूर्त आणि पूजाविधी

जाणून घ्या घटस्थापनेचा शुभमुहूर्त आणि पूजाविधी

by Jyotsna Kulkarni
0 comment
Shardiy Navratra 2024
Share

अवघ्या काही दिवसांवर शारदीय नवरात्र सुरु होत आहे. गणेशोत्सवानंतर चाहूल लागते ती नवरात्राची. नऊ दिवस आदिमायेचा जागर करत सर्वत्र तिची पूजा, आराधना केली जाते. हिंदू धर्मामध्ये शारदीय नवरात्राला खूप महत्व आहे. या नऊ दिवसांमध्ये देवीच्या नऊ विविध रूपांची पूजा केली जाते. अश्विन शुक्ल पक्षात प्रतिपदेच्या तिथी पासून नवरात्र सुरु होते तर नवमी किंवा दशमी तिथीपर्यंत असते. शेवटच्या दिवशी विजयादशमी अर्थात दसरा साजरा केला जातो. शारदीय नवरात्र हे शाक्तपंथीय मानले जाते. या नवरात्राला शारदीय म्हणतात कारण की हे नवरात्र शरद ऋतूच्या सुरुवातीला सुरु होते.

नवरात्रामध्ये घटस्थापना करण्याची मोठी परंपरा आहे. या घटस्थापनेमध्ये घराघरात, मंदिरामध्ये घट बसवले जातात. घटस्थापना नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच प्रतिपदा तिथीला केली जाते. घटस्थापनेला अर्थात घटाला देवीचे रूप मानले आहे. देवी या कलशाच्या रूपात घरात आगमन करते अशी मान्यता असते.

यावर्षी अश्विन महिन्याची शुक्ल पक्ष प्रतिपदा तिथी २ ऑक्टोबर २०२४ रोजी मध्यरात्री १२ वाजून १८ मिनिटांनी सुरू होणार असून, ३ ऑक्टोबर २०२४ रोजी पहाटे २ वाजून ५८ मिनिटांनी समाप्त होईल. त्यामुळे उदया तिथीनुसार ३ ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे. या वर्षी देवीचे वाहन पालखी आहे. गुरुवार ३ ऑक्टोबर रोजी, अश्विन शुक्ल प्रतिपदा, शारदीय नवरात्री सुरू होत आहे. सकाळी ६ वाजून ७ मिनिटे ते ९ वाजून ३० मिनिटापर्यंत कलश स्थापनेचा, घटस्थापनेचा शुभ मुहूर्त आहे. त्यानंतर ११ वाजून ३७ मिनिटे ते १२ वाजून २३ मिनिटापर्यंत अभिजीत मुहूर्त अतिशय शुभ राहील. सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही घटस्थापना करता येईल.

पूजेचे साहित्य
हळद-कुंकू, नागलीची पाने, आंब्याची पाने, सुपारी, नारळ, दुर्वा, पाच फळे, कापसाची वात, चौरंग, तांदूळ, हळकुंड, देवीचे टाक किंवा मूर्ती किंवा फोटो. सप्तधान्य अर्थात सात वेगवेगळे धान्य (मूग, मसूर, गहू, बाजरी, ज्वारी, हरभरा, तांदूळ), देवीची ओटी, अखंड नंदादीप. निरांजन, कापूर, उदबत्ती, धूपबत्ती, नैवेद्य.

घटस्थापना करण्याची पद्धत
घटस्थापना शुभ मुहूर्तावर विधी विधानाने करावी. कलशाची स्थापना मंदिराच्या उत्तर-पूर्व दिशेला करावी. चौरंग ठेऊन कलशाची स्थापना करावी. सर्व प्रथम गंगाजल शिंपडून ते स्थान पवित्र करा. यानंतर पाट किंवा चौरंगावर कुंकुने स्वस्तिक बनवून कलश स्थापित करा. पाटाच्या किंवा चौरंगाच्या आजू बाजूला रांगोळी काढा.

त्यावर माती पसरून त्यात कलश ठेवा. कलशात आंब्याचे पान ठेवून त्यात पाणी किंवा गंगाजल भरावे. एक सुपारी, काही नाणी, तांदूळ, दुर्वा ,हळकुंड एकत्र करून कलशात टाकावे. कलशाचा आठ बाजूने कुंकवाची बोटे ओढा. कलशावर नारळ ठेवा. तांदळापासून अष्टदल बनवा आणि देवीचा टाक किंवा मूर्ती ताम्हण्यात ठेवा. (काही ठिकाणी कलशावर ताम्हण ठेऊन मग त्यात आडवे नारळ ठेवले जाते आणि शेजारी देवीचा टाक ठेवतात.)

Shardiy Navratra 2024

 

कलशाच्या स्थापनेबरोबरच एक अखंड नंदादीप प्रज्वलित केला जातो. त्यानंतर माती मध्ये 7 प्रकारची धान्ये पेरा. कलशाची स्थापना करुन त्यावर पूर्णपात्र ठेवून त्यात श्रीदेवीची मूर्ती किंवा तदभावी नारळ ठेवून पूजा वगैरे करणे याला घटस्थापना असे म्हणतात. ही पूजा पहिल्या दिवशी करुन नऊ दिवस तो घट तसाच ठेवायचा असतो. पहिल्या दिवशी पूजा झाल्यानंतर उरलेल्या दिवसांमध्ये फक्त घाटावर फुलांची किंवा पानांची माळ लावणे, अखंड दिव्याची निगा राखणे आणि निर्माल्य काढून ताजी फुले वाहून देवीची आरती करायची असते.

नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठ आणि दुर्गा स्तुती करावी. शिवाय तुमच्या परंपरेनुसार देवीचा फुलोरा करावा. अष्टमीला कन्यापूजन करत उपवास करावा आणि देवीच्या मंदिराभोवती हळदीकुंकवाचा सडा मारावा. तर नवमीला होमहवन करावे आणि दशमीला पद्धतीनुसार पुरणाचा स्वयंपाक करत पारणे करावे. नवरात्रामध्ये कन्यापूजनाला खूप महत्व असते. शिवाय या दिवसांमध्ये घरी येणाऱ्या सवाष्ण स्त्रियांची हळदी कुंकू लावून ओटी भरली तरी शुभ मानले जातो.

======

हे देखील वाचा : जाणून घ्या शारदीय नवरात्राची आणि घटस्थापनेच्या संपूर्ण माहिती

======

नवरात्रीची आरती

आश्विनशुद्धपक्षीं अंबा बैसली सिंहासनी हो।
प्रतिपदेपासून घटस्थापना ती करूनि हो।
मूलमंत्रजप करूनी भोवतें रक्षक ठेऊनि हो।
ब्रह्माविष्णुरुद्र आईचे पूजन करिती हो।।1।।

उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो।
उदोकारे गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो ।।धृ।।

द्वितीयेचे दिवशी मिळती चौसष्ट योगिनि हो।
सकळांमध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी हो।।
कस्तुरीमळवट भांगी शेंदुर भरूनी हो।
उदोकारें गर्जती सकळ चामुंडा मिळुनि हो ।।उदो।।2।।

तृतीयेचे दिवशी अंबे शृंगार मांडिला हो।
मळकट पातळ चोळी कंठी हार मुक्ताफळा हो।।
कंठीची पदके कांसे पीतांबर पिवळा हो।
अष्टभुजा मिरविती अंबे सुंदर दिसे लीला हो। उदो।।3।।

चतुर्थीचे दिवशी विश्वव्यापक जननी हो।
उपासकां पाहसी अंबे प्रसन्न अंत:करणीं हो।।
पूर्ण कृपें पाहसी जगन्माते मनमोहिनी हो।
भक्तांच्या माऊली सुर ते येती लोटांगणी हो।।उदो।।4।।

पंचमीचे दिवशीं व्रत तें उपांगललिता हो।
अर्घ्यपाद्यपूजनें तुजला भवानी स्तविती हो।।
रात्रीचे समयी करिती जागरण हरिकथा हो।
आनंदे प्रेम तें आलें सद्भावे क्रिडता हो।।उदो।।5।।

षष्ठीचे दिवशी भक्तां आनंद वर्तला हो।
घेऊनि दिवट्या हस्ती हर्षे गोंधळ घातला हो।।
कवडी एक अर्पितां देसी हार मुक्तफलांचा हो।
जोगावा मागतां प्रसन्न झाली भक्तकुळा हो।।उदो।।6।।

सप्तमीचे दिवशी सप्तशृंगगडावरी हो।
तेथें तूं नांदसी भोवतें पुष्पें नानापरी हो।।
जाईजुई- शेवंती पूजा रेखियली बरवी हो।
भक्त संकटी पडतां झे‍लूनि घेसी वरचे वरी हो।।उदो।।7।।

अष्टमीचे दिवशी अष्टभुजां नारायणी हो।
सह्याद्रीपर्वती पाहिली उभी जगज्जननी हो।।
मन माझें मोहिलें शरण आलों तुजलागुनी हो।
स्तनपान देऊनि सुखी केली अंत:करणीं हो।।उदो।।8।।

नवमीचे दिवशी नवदिवसांचें पारणें हो।
सप्तशतीजप होम हवनें सद्गक्ती करूनी हो।।
षड्रसअन्ने नैवेद्यासी अर्पियेली भोजनी हो।
आचार्य ब्राह्मणा तृप्त केलें कृपेंवरूनी हो।।उदो।।9।।

दशमीच्या दिवशी अंबा निघे सीमोल्लंघनी हो।
सिंहारुढे दारुण शस्त्रें अंबे त्वां घेऊनी हो।।
शुंभनिशुंभादिक राक्षसा किती मारिसी रणी हो।
विप्रा रामदासा आश्रय दिधला तो चरणी हो।।उदा।।10


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.