आपल्या हिंदू धर्मात ज्या देवी देवता आहेत, त्यांच्याबद्दल अनेक विशेष बाबी आणि खासियत प्रचलित आहे. त्यांना आवडणारे पदार्थ, त्यांचे अस्त्र – शस्त्र, त्याची वेशभूषा, रंग, त्यांची खूण, त्यांचे वाहन आदी अनेक बाबींचा यात समावेश होतो. आज आपण पाहिले तर या देवी देवतांच्या मंदिरामध्ये त्यांच्या या खास बाबींना सामील केले जाते. उदाहरण दयायचे झाले तर प्रत्येक मंदिरात आपल्याला त्या विशिष्ट देवाचे वाहन पाहायला मिळतेच मिळते. याशिवाय ते मंदिर अपूर्ण असते.
आता भगवान शंकराचेच घ्या त्यांच्या मूर्तीसमोर किंवा पिंडीसमोर नंदी हा असतोच असतो. नंदीशिवाय शिव शंकर अपूर्ण आहेत. नंदी नसलेले एकही शिवमंदिर आपल्याला शोधूनही सापडणार नाही. मात्र तुम्हाला एक गोष्ट ऐकून आश्चर्य वाटेल की, या संपूर्ण जगात एक असे शंकराचे मंदिर आहे, ज्यात नंदी नाही. जगातील हे एकमेव असे शिव मंदिर आहे, जिथे नंदी नाही. चला जाणून घेऊया या मंदिराबद्दल आणि त्यामागे असलेल्या आख्यायिकेबद्दल.
हे असे खास मंदिर आहे, धार्मिक महत्व प्राप्त असलेले आणि प्रसिद्ध, लोकप्रिय अशा नाशिक शहरामध्ये. नाशिक शहर हे पौराणिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या अतिशय महत्वाचे आहे. प्रभू रामचंद्राचे वास्तव्य असणाऱ्या या शहरात भगवान शंकराचे एक असे मंदिर आहे, ज्यात शंकर भगवानच्या पिंडीसमोर नंदी नाही. या मंदिराचे नाव आहे कपालेश्वर महादेव मंदिर हे जगातील एकमेव असे शिव मंदिर आहे.
नाशिक शहरात गोदावरी किनारी, रामकुंड परिसरात असलेले श्रीकपालेश्वर महादेव मंदिर हे नंदी नसलेले जगातील एकमेव मंदिर आहे. जगभरातील प्रत्येक मंदिरात महादेवाच्या पिंडीसमोर नंदीच स्थान आहे.700 वर्षांची परंपरा या मंदिराला आहे. या मंदिरात नंदी नसण्यामागे एक कथा सांगितली जाते. ती अशी,
पद्मपुराणात अशी कथा सांगितली जाते की,भगवान शंकरांना ब्रम्ह हत्येचं पातक झालं होत,ते त्रिखंडात फिरले,आणि त्याच प्रायश्चित त्यांना काही सापडेना,त्यावेळेस नंदीने भगवान शंकरांना सांगितलं की, नाशिकला अरुणा, वरूणा गोदावरी संगम आहे.तिथं आपण स्नान केल तर तुमचं ब्रह्म हत्येचं पातक नष्ट होईल. नंदीच्या सांगण्यावरून भगवान शंकरानी नाशिकमधील या संगमावर स्नान केले.
त्यानंतर त्यांचं ब्रह्म हत्येचं पातक नष्ट झाले, त्यामुळे एक आदर म्हणून भगवान शंकरांनी नंदीना सांगितल तुम्ही इथं माझ्या समोर नसावं, अन्यथा तुम्ही कायम माझ्या सोबत असतात. नंदींनी भगवान शंकराची ही विनंती मान्य केली. त्यामुळे इथे भगवान शंकरासमोर नंदी नाही. गोदावरी आणि अरुणा संगमात स्नान केल्यानंतर महादेवांचं पातक दूर झालं आणि ते ब्रम्हहत्येच्या दोषातुन मुक्त झाले. आपल्याला या पातकापासून नंदीनं मुक्ती दिली, यामुळेच या ठिकाणी महादेवांनी नंदीला आपला गुरु मानलंय.
=================
हे देखील वाचा : काळाराम मंदिरचा इतिहास आणि माहिती
================
कपालेश्वर मंदिराबद्दल सांगितले जाते की, “12 ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेतल्यानंतर जितके पुण्य मिळत, तितके पुण्य श्रीकपालेश्वर महादेवाचे दर्शन घेतल्यानंतर मिळते. हे मंदिर रामकुंड परिसरात असून, मंदिरात जाण्यासाठी ५२ पायऱ्या आहेत. नाशिकच्या या कपालेश्वर महादेव मंदिरात श्रावणातल्या सोमवारी, शनिवार आणि प्रदोषाच्या दिवशी महादेवांची पालखी काढली जाते. महादेवांच्या या कपालिक पिंडीचं दर्शन घेतल्यास सर्वपातकांचा नाश होतो, अशी मान्यता आहे
या मंदिरात साजरा होणारा आणखी एक मोठा उत्सव म्हणजे हरि-हर भेट. यावेळी कपालेश्वर मंदिरातून श्री शंकर, तर सुंदर नारायण मंदिरातून श्री विष्णूंचा मुखवटा गोदावरी नदीवर आणतात. त्यांच्यावर अभिषेक केला जातो. त्यावेळी मोठा उत्सव भरतो.