दही आपल्या सर्वांच्या घरात अगदी सहज उपलब्ध असणारी गोष्ट. आपण या दह्यापासून अनेक पदार्थ बनवतो आणि अनेक पदार्थांमध्ये दह्याचा वापर देखील करतो. नुसते दही खायला देखील अनेकांना आवडते. एकूणच काय तर दही हा आपल्या भारतीय लोकांच्या जेवणातील अविभाज्य असा घटक आहे. दह्याशिवाय कोणतेही घरातील किचन अपूर्णच मानले जाते, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
दही हे फक्त आपल्या जिभेला आणि जेवणालाच चव देत नाही तर आपल्या आरोग्याच्या दृष्टीने देखील खूपच लाभदायक आहे. योग्य प्रमाणात दही खाल्ल्याने आपल्या आरोग्याला मोठे फायदे होतात. यातही दही अनेकांना आवडते मात्र बाहेरचे दही आवडत नाही. घरी लावलेले दही आवडते. तसेही बाहेरचे दही खाणे आरोग्याच्या दृष्टीने तितकेसे चांगले देखील नसते.
पण बऱ्याच महिलांचे घरी लावलेले दही चांगले लागत नाही. कधीकधी वातावरणातील बदलानुसार दही नीट बनत नाही, विशेषतः पावसाळ्यात, हिवाळ्यात दही पातळ होते किंवा ते नीट होतच नाही. अनेकदा दही आंबट होते, पातळ राहते किंवा त्यात पाणी जास्त तयार होते. अशा वेळेस दही लावण्यासाठी योग्य पद्धत कोणती? आणि दही लावताना कोणती काळजी घ्यायची? कोणत्या टिप्स फॉलो करायच्या? चला जाणून घेऊया.
घरी दही लावण्यासाठी काही टिप्स
ताजे दूध
दही लावताना नेहमी ताजेच दूध वापरावे. दही लावण्यासाठी घरातील शिळे दूध वापरले तर दही आंबट होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे दही बनवताना ताजे दूध वापरावे. एका मोठ्या भांड्यात दूध मध्यम आचेवर गरम करा. दही बनवण्यासाठी १० ते १५ मिनिटे दूध मंद आचेवर उकळू द्या, यामुळे दही घट्ट होण्यास मदत होईल.
मातीचे भांडे
दही बनवण्यासाठी मातीचे भांडे वापरावे, कारण त्यामध्ये थंडावा असतो. शिवाय या भांड्यामधे चांगले बनते आणि त्यात त्या भांड्याचे गुणधर्म देखील येतात.
कोमट दुध
अनेकजण उकळलेल्या दुधातच विरजण घालतात. असे केल्याने दही आंबट होऊ शकते. त्यामुळे नेहमी कोमट दुधात विरजण घालावे. दूध उकळून कोमट झाल्यानंतरच त्यात विरजण झाला. लक्षात ठेवा की दूध कोमट आणि पूर्णपणे थंड नसावे. यानंतर दुधाला फेस येईपर्यंत याला नीट फेटा. असे केल्याने दूध दही घट्ट होण्यास मदत करते.
उष्णता असणाऱ्या ठिकाणी दूध ठेवा
दही व्यवस्थित तयार होण्यासाठी विरजण लावलेल्या दुधाला योग्य प्रमाणात उष्णता मिळाली पाहिजे. जेणेकरून त्यात दही लागण्यासाठी योग्य प्रमाणात बॅक्टेरिया निर्माण होतील. यासाठी दही लावलेले भांडे उष्णता असणाऱ्या ठिकाणी ठेवा.
दही कसे लावावे
दही लावण्यासाठी तुमच्याकसे थोडे दही शिल्लक नसेल तर काहीही समस्या नसते. तुम्ही मिरचीचा वापर करू देखील चांगले दही लावू शकता. यासाठी ३ – ४ हिरव्या मिरच्या लागतील. दही बनवण्यासाठी दूध उकळवून कोमट होईपर्यंत थांबा. आता ज्या भांड्यात दही बनवायचे आहे त्या भांड्यात दूध ओतून घ्या आणि मग यात ३ – ४ हिरव्या मिरच्या घेऊन त्यावरील देठ तोडून दुधात टाका. हे भांडे रात्रभर रूमच्या तापमानावर झाकून ठेऊन द्या. सकाळी त्यात बाजारासारखे घट्ट आणि मलईदार दही जमल्याचे दिसेल.