Home » राजावर झाला चिखलाचा पाऊस !

राजावर झाला चिखलाचा पाऊस !

by Team Gajawaja
0 comment
King Philip And Queen Letizia
Share

सोशल मिडियामुळे जग जवळ आलं आहे. युरोपमधील राजेशाहीचा पुरस्कार करणारा स्पेन देश आणि त्यातील राजघराणंही या सोशल मिडियामुळे जगभर प्रसिद्ध झालं. स्पॅनिश किंग फिलीप सहावा, राणी लेटिझिया आणि त्यांच्या दोन मुली लिओनोरआणि इन्फंटा सोफिया यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. मात्र वारशानुसार मिळालेली राजेशाही आणि आत्ताच्या युगात सोशल मिडियामुळे मिळालेली प्रसिद्धी ही फसवी असते, याचाच प्रत्यय राजे फिलीप आणि त्यांच्या पत्नीला आला आहे. स्पेनमध्ये नुकताच गेल्या 50 वर्षातील भीषण पूर आला आहे. वर्षभराचा पाऊस एकाच दिवशी पडला आणि त्या पावसाच्या पाण्यात अवघं स्पेन वाहून गेल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. आज या देशाच्या प्रमुख शहरातील गल्लीबोळात चिखलाचे आणि मृतदेहांचे साम्राज्य आहे. करोडो रुपयांची मालमत्ता नष्ट झाली आहे, शिवाय 200 नागरिकांचा यात मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. (King Philip And Queen Letizia)

हा मृतांचा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता आहे. कारण स्पेनच्या शहरांमधील ज्या घरात पाणी शिरलं होते, तिथे अजून काही मृतदेह मिळत आहेत. ही परिस्थिती भीषण आहे. यासाठी स्पेनमध्ये 3 दिवसांचा राष्ट्रीय शोक जाहीर करण्यात आला आहे. मात्र या सगळ्यात स्पेनसारख्या प्रगत म्हटल्या जाणा-या देशामध्ये पावसाचा अंदाज व्यक्त करण्यासारखी प्रणाली उपलब्ध नव्हती का प्रश्न विचारण्यात येत आहे. शिवाय पावसाचे पाणी आल्यावर त्याचा निचरा होण्यासाठीही कुठलिही सक्षम ड्रेनेज व्यवस्था शहरात नसल्यानं पाऊस गेल्यावरही चार दिवस पाणी शहरात राहिले. यामुळे माणसांसह अनेक जनावरांचाही पाण्यात गुदमरुन मृत्यू झाला आहे. पावसानं भिजलेल्या आणि गाळानं भरलेल्या सामानाचे ढिग स्पेनच्या गल्लीबोळात दिसत आहेत. यातून शहरांवर रोगराईचे संकट आहे. (International News)

या सर्वांना सामोरे जाण्यासाठी कुठलिही व्यवस्था या शहरांमध्ये नसल्याचे आता निष्पन्न झाले आहे. या सर्वांचाच राग स्पेनच्या जनतेने तेथील राजावर काढला. स्पेन पुराच्या पाण्यात बुडालेले असतांना तिन दिवसांनंतर या जनतेची खबर घेण्यासाठी राजा आणि राणी रस्त्यावर उतरले. यावेळी या सगळ्या राजघराण्यावर जनतेचा राग उफाळून आला. त्यांनी चक्क राजे फिलीप यांच्यावर चिखल फेकला, अंडी फेकली. यामुळे राजा आणि राणी यांची चांगलीच तारांबळ झाली. जनतेनं किलर किलर अशा घोषणा देण्यास सुरुवात केल्यावर मात्र या राजाराणीनं आपला दौरा आवरला आणि परत आपल्या महालात जाणे पसंत केले. सोशल मिडियामध्ये स्पेनचे राजघराणे ब्रिटिश राजघराण्यानंतर सर्वाधिक लोकप्रिय घराणे आहे. पण या राजघराण्यानं गरजेच्यावेळी जनतेकडे पाठ फिरवली आणि आता त्यांच्यावर याच सोशल मिडियाच्या माध्यमातून चहुबाजुनं टिका होत आहे. (King Philip And Queen Letizia)

गेल्या आठवड्यात स्पेनमध्ये 50 वर्षात पडला नव्हता एवढा पाऊस एकाच दिवसात पडला, आणि या देशातील शहरांना नद्यांचे स्वरुप आले. हे पाणी एवढे वाढले की बहुतांश भागत इमारतींचे पहिले मजले पाण्याखाली होते. स्पेनच्या पूर्वेकडील शहर व्हॅलेन्सियामध्ये अवघ्या 8 तासांत एक वर्षाचा पाऊस पडला. यामुळे अचानक पूर आला, त्यामुळे अनेकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याची संधी मिळाली नाही. तीन ते चार दिवसांनी येथील स्थानिकांनी या पाण्याखाली असलेल्या घरातील दरवाजे फोडले आणि त्यातून एक-एक मृतदेह बाहेर यायला लागले आहेत. यामुळे स्पेनमध्ये प्रशासकीय व्यवस्थेबाबत संताप व्यक्त होत आहे. या पूरग्रस्त व्हॅलेन्सिया भागात भेट देण्यासाठी स्पेनचे राजे फिलिप आणि त्यांची पत्नी राणी लेटिजिया हे तीन दिवसांनंतर गेले. (International News)

======

हे देखील वाचा : अमेरिकेचा पुढील राष्ट्राध्यक्ष कोण?

====

त्यांना बघूनच या जनतेच्या मनातील राग उफाळून आला. आपल्या भागात एवढा पाऊस पडणार असल्याची साधी माहितीही देण्यात आली नव्हती असा येथील जनतेचा आक्षेप आहे. ही माहिती आधी मिळाली असती तर अनेकांचे जीव वाचले असते, शिवाय मोठी आर्थिक हानीही टाळता आली असती, असे जनतेचे म्हणणे आहे. या सर्वांसाठी राजेशाही जबाबदार असल्याचा आक्षेप जनतेनं घेतला आहे. हा निषेध एवढा वाढला की, स्पेनच्या राजाला जनतेच्या गराड्यातून बाहेर काढण्यासाठी चक्क पोलीसांची मदत घ्यावी लागली. स्पेनच्या पूर्वेकडील शहरांमध्ये अद्यापही परिस्थिती नियंत्रणात नाही. पुरामुळे रस्ते खराब झाले आहेत आणि दळणवळण आणि वीजवाहिन्यांचे नुकसान झाले आहे. शहरापासून हा भाग पूर्णपणे तुटला असून परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी किमान महिनाभर लागले अशी शक्यता आहे. (King Philip And Queen Letizia)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.