Home » ड्रायवर ते ‘किंग ऑफ़ कॉमेडी’ मेहमूद यांचा प्रवास

ड्रायवर ते ‘किंग ऑफ़ कॉमेडी’ मेहमूद यांचा प्रवास

by Jyotsna Kulkarni
0 comment
Mahmood Journey
Share

हिंदी सिनेसृष्टीतील अतिशय दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक म्हणजे ‘मेहमूद’. विनोदी अभिनेता म्हणून त्यांनी मोठ्या प्रमाणावर नावलौकिक कमावला. मेहमूद यांनी हिंदी सिनेसृष्टीमधे जे योगदान दिले आहे त्याला तोड नाही. त्यांनी अनेक उत्तम सिनेमे तयार केले. आपल्या प्रभावी अभिनयाने त्यांनी प्रत्येक भूमिका पडद्यावर अक्षरशः जिवंत केली. मेहमूद यांच्या नावाशिवाय कायमच हिंदी सिनेसृष्टी अपौर्ण राहील. असे मोठे आणि बहारदार काम त्यांनी करून ठेवले आहे. (Mahmood Journey )

एक उत्तम विनोदी अभिनेता कसा असावा?, टायमिंग, चेहऱ्यावरील एक्सप्रेशन, डायलॉग डिलिव्हरी आदी सर्वच बाबींनी त्यांनी प्रेक्षकांना प्रभावित केले, त्यांचे काम आजही नवीन कलाकारांसाठी एक चांगले विद्यापीठ समजले जाते. अशा या ‘किंग ऑफ़ कॉमेडी’ असलेल्या मेहमूद यांच्याबद्दल थोडी माहिती जाणून घेऊया.

मेहमूद यांचा जन्म २९ सप्टेंबर १९३२ रोजी मुंबईमध्ये झाला. त्यांचे वडील प्रसिद्ध नर्तक मुमताज अली होते, जे बॉम्बे टॉकीजमध्ये काम करायचे. मेहमूद हे लहान असताना त्यांची आर्थिक परिस्थिती अजिबातच चांगली नव्हती. घराला थोडा हातभार लावण्यासाठी ते लहान असताना लोकल ट्रेनमध्ये चॉकलेट विकायचे. लहानपणापासूनच मेहमूद यांना अभिनयाची भारी हौस होती. त्यांना अभिनेताच व्हायचे होते. आपल्या वडिलांनी शब्द टाकल्यामुळे मेहमूद यांना १९४३ साली आलेल्या ‘किस्मत’ सिनेमात अशोक कुमार यांच्या बालपणाची भूमिका करण्याची संधी मिळाली.

Mahmood Journey

पुढे मेहमूद हे कार चालवायला शिकले आणि त्यांनी निर्माता ज्ञान मुखर्जी यांच्याकडे ड्रायव्हर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. या निमित्ताने ते रोज फिल्मसिटीमध्ये जाऊ लागले आणि कलाकारांना जवळून बघत त्यांचे त्यांच्या कामाचे निरीक्षण करू लागले. पुढे मेहमूद यांनी गीतकार भरत व्यास, राजा मेंहदी अली ख़ान आणि निर्माता पी.एल.संतोषी यांचेकडे देखील ड्रायव्हर म्हणून काम केले.

मेहमूद यांनी अभिनयात येण्याआधी अनेक लहान मोठी कामं केली. त्यांनी अभिनेत्री मीनाकुमारी यांना टेबल टेनिस शिकवण्याचे देखील काम केले. अशातच त्यांचे मीनाकुमारी यांची लहान बहीण असलेल्या मधु यांच्याशी त्यांचे सूर जुळले आणि त्यांनी लग्न केले. लग्नानंतर घराची जबाबदारी उचलण्यासाठी त्यांनी पुन्हा त्यांचा मोर्चा चित्रपटांकडे वळवला. सुरुवातीच्या काळात त्यांनी गुरुदत्त, बिमल रॉय यांच्या चित्रपटांमध्ये लहान लहान भूमिका केल्या.

मेहमूद यांच्या मेहनतीला आणि प्रयत्नांना यश मिळाले आणि त्यांना सर्वात मोठा ब्रेक मिळाला. १९५८ साली आलेय ‘परवरिश’ सिनेमात राज कपूर यांच्या भावाची भूमिका करण्याची संधी मिळाली. या संधीचे त्यांनी सोने केले. १९६१ साली आलेल्या ‘ससुराल’ सिनेमा त्यांच्यासाठी मोठा ठरला. हा सिनेमात त्यांना विनोदी कलाकार ही ओळख मिळवण्यासाठी महत्वाचा होता. त्यांना आता चित्रपटांमध्ये महत्वाच्या आणि विनोदी भूमिका मिळू लागल्या. पुढे ‘प्यार किए जा’, ‘पडोसन’ या चित्रपटांनी तर त्यांना लोकांच्या मनात स्थान मिळवून दिले.

पुढे १९६५ साली आलेल्या ‘गुमनाम’ सिनेमात मेहमूद यांनी त्यांच्यात असणारे विनोदाचे सर्वच कौशल्य प्रेक्षकांसमोर मांडले. याच सिनेमातील ‘हम काले है तो क्या हुआ’ या गाण्याने त्यांना एका रात्रीत स्टार केले. हे गाणे तर आजही लोकप्रिय आणि प्रसिद्ध आहे. त्यांनी अनेक हिट आणि लोकप्रिय चित्रपटांमध्ये काम केले. मेहमूद यांना मोठ्या कष्टाने नावलौकिक आणि यश मिळाले होते. मात्र त्यांना अभिनयसोबतच दिग्दर्शनात देखील हात अजमावायचा होता.

यासाठीच मेहमूद यांनी आपले स्वतःचे प्रोडक्शन हाऊस देखील सुरु केले. या प्रोडक्शन हाऊसमध्ये त्यांनी अनेक सुपर हिट अशा चित्रपटांची निर्मिती केली. १९६१ साली त्यांच्या होम प्रोडक्शनचा पहिला ‘छोटे नवाब’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमाच्या निमित्ताने त्यांनी पहिल्यांदाच आर. डी. बर्मन यांना संगीतकार म्हणून संधी दिली. पुढे आर डी बर्मन हे लोकप्रिय आणि प्रसिद्ध संगीतकार बनले. पुढे त्यांनी सस्पेन्स आणि कॉमेडी अशी ‘भूत बंगला’ सिनेमा बनवला. हा तुफान गाजला. त्यानंतर ‘पडोसन’ सिनेमा आला. हा तर हिंदी सिने जगतातील सर्वश्रेष्ठ सिनेमांच्या यादीत आजही गणला जातो.

======

 हे देखील वाचा :   शाहरुख खानसाठी लिहिलेला सिनेमा हृतिक रोशनसाठी ठरला Lucky

======

अमिताभ बच्चन यांचे करियर सावरण्यासाठी मेहमूद यांनी पुढाकार घेतला आणि त्यांनी १९७२ साली त्यांनी ‘बॉम्बे टू गोवा’ हा सिनेमा तयार केला. यात त्यांनी अमिताभसोबत स्वतःच देखील अभिनय केला. सिनेमा जगतातील अनेक नामचीन विनोदी कलाकारांना घेऊन बनवलेला हा सिनेमा तुफान गाजला. राजेश खन्ना यांना घेऊन मेहमूद यांनी ‘जनता हवालदार’ हा सिनेमा केला. या सिनेमाच्या शुटिंगवेळी त्यांनी सुपरस्टार राजेश खन्ना यांना उशिरा येण्यावरून फटकारले देखील होते.

मेहमूद यांना त्यांच्या हिंदी सिनेमातील योगदानासाठी फिल्मफेयरसोबत विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले होते. मेहमूद यांच्या चित्रपटांमध्ये पड़ोसन, गुमनाम, प्यार किए जा, भूत बंगला, बॉम्बे टू गोवा, पत्थर के सनम, अनोखी अदा, नीला आकाश, नील कमल, कुंवारा बाप आदी सुपरहिट चित्रपटांचा समावेश आहे. दरम्यान मेहमूद यांना वयानुरूप काही आजारांनी जखडले होते. उपचारासाठी ते अमेरिकेमध्ये असताना २३ जुलै २००४ रोजी त्यांचे निधन झाले.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.