विनोदी कलाकार असं म्हटल्यावर कुठलं नाव पटकन ओठावर येत असेल तर ते म्हणजे जॉनी लिव्हर. भारतीय चित्रपटातील नावाजलेल्या विनोदवीरांपैकी एक असलेले जॉनी लिव्हर म्हणजे इंडस्ट्रीला लाभलेला हिराच. विनोदाचं टाइमिंग आणि चेहऱ्यावरचे हाव भाव ही त्यांची खासियत. कॉमेडी किंग होण्याचा त्यांचा प्रवास अतिशय संघर्षमय होता. आज जॉनी लिव्हर यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊ त्यांची प्रेरणादायी वाटचाल.
जॉनी लिव्हर यांचं खरं नाव जॉन प्रकाश राव जनुमाला. मुळचे तेलगू असलेले जॉनी मुंबईत लहानाचे मोठे झाले. घरची आर्थिक परिस्थिति बिकट असल्या कारणाने त्यांना सातवीतच शाळेचा निरोप घ्यावा लागला. त्यानंतर त्यांनी रस्त्यावर पेन विकायचे काम केले. नंतर ते वडिलांसोबत हिंदुस्तान युनिलीव्हर मध्ये कमाला लागले.
तिथे ते कधी बॉलीवूड स्टार्सची तर कधी आपल्या वरिष्ठांची नक्कल करून सहकाऱ्यांचं मनोरंजन करायचे. तेव्हापासून तिथले कामगार त्यांना तुम्ही जॉनी राव नसून जॉनी लिव्हर आहात असं म्हणायला लागले. पुढे चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यानंतरसुद्धा त्यांनी हेच नाव वापरायचं ठरवलं.
नंतर जॉनी तबस्सुम आणि कल्याणजी – आनंदजी यांच्या स्टेज शो मध्ये स्टँड अप कॉमेडी करायला लागले. याच स्टेज शोज् मधून त्यांनी नाव कामावलं, बरेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दौरे केले, मोठमोठ्या कलाकारांना भेटले. अशाच एका शो मध्ये सुनील दत्तनी त्यांना हेरलं. त्यांच्यातलं कौशल्य दत्त साहेबांनी ओळखलं आणि जॉनींना त्यांचा पहिला पिक्चर मिळाला – ‘दर्द का रिश्ता’. आणि मग सुरू झाली एक यशोगाथा.१९९३ मध्ये आलेला बाजीगर हा त्यांचा पहिला सुपर हिट चित्रपट. त्यातला बाबूलाल प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरला. त्यानंतर ९०च्या दशकात जवळ जवळ प्रत्येक चित्रपटात खास त्यांच्यासाठी विनोदी भूमिका लिहिली जायची.
आज पर्यंतच्या कारकिर्दीत जॉनी यांनी ३५०हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं. हिंदीसोबतचं त्यांनी तुलू, तमिळ, कन्नड, गुजराती आणि मराठी भाषेमध्ये सुद्धा काम केलंय. त्यांच्या कोमेडीची स्टाईल निराळीच आहे. आपल्या निखळ विनोदाच्या माध्यमातून जॉनी लिव्हरनी कायमचं रसिकांच्या मनावर राज्य केलंय. बॉलीवूडच्या या कॉमेडी किंगला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
– रसिका कुळकर्णी