Home » बुद्धिबळाच्या पटावरचा राजा.

बुद्धिबळाच्या पटावरचा राजा.

by Correspondent
0 comment
Chess | K Facts
Share

रविवारी भारताच्या क्रीडा विश्वात एक गौरवाची गोष्ट झाली. अगदी पहिल्यांदा बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये आपला देश – भारत विजयी झाला. पहिल्यांदा भारताला सुवर्ण पदक मिळालं. बुद्धिबळात खरा दबदबा तो रशियाचा…गॅरी कॅस्पाराओ, अनाटोनी कारपोव, वाल्दीमिर करॅमनिक….अशा अनेक दादा लोकांनी रशियाचा बुद्धिबळात जगात दबदबा निर्माण केला. या सर्वांच्या जोरावर थोडीथोडकी नव्हे, तर तब्बल चोवीस वर्षे रशियानं बुद्धिबळ ऑलिंपियाडचं सुवर्ण पदक पटकावलं. पण गेली काही वर्ष भारतानं रशियाला आव्हान दिलं आहे.

विश्वनाथन आनंद हे त्यातलं प्रमुख नाव. आता या बुद्धिबळाच्या टिममध्ये काही तरुण चेहरेही आले आहेत. या सर्वांनी मिळून भारताला यंदा बुद्धिबळात सुवर्ण यश मिळवून दिले…पण या सर्वांबरोबर या यशाला अजूनही एक पैलू आहे. तो म्हणजे पहिल्यांदाच हा सामना ऑनलाईन झाला.

इंटरेनटच्या सहाय्याने खेळलेल्या या सामन्यात जेव्हा भारताची सरशी होत होती, नेमकं तेव्हाच भारतीय खेळाडूंना इंटरनेटच्या समस्येचा सामना करावा लागला. याशिवाय लॉकडाऊनमुळे सोशल मिडीयावरुन या सामन्यांना एवढे प्रेक्षक मिळाले की, त्यांनी सर्व विक्रम मोडून काढले.  त्याबरोबरच विजयी संघाचे कौतुक करणा-यांचीही सोशल मिडीयावर गर्दी झाली होती. बुद्धिबळाला जसं सुवर्णपदक पहिल्यांदा मिळालं…तसचं हा भरभरुन प्रतिसादही पहिल्यांदाच मिळला…त्यामुळे सुखवलेल्या बुद्धिबळपट्टूंनी आता पुरस्कार मिळतांनाही बुद्धिबळपट्टूंचा विचार होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. 

रविवारी झालेल्या फिडे जागतिक ऑनलाइन बुद्धिबळ ऑलिंपियाड स्पर्धेदरम्यान इंटरनेट आणि सर्व्हरमध्ये बिघाड झाल्याने भारत आणि रशियाला संयुक्त विजेता घोषित करण्यात आले. या स्पर्धेसाठी भारताकडून निहाल सरीन आणि दिव्या देशमुख यांनी भाग घेतला. मात्र भारतीय संघाला खराब इंटरनेटचा फटका बसला. त्यामुळे भारतातर्फे फिडेमध्ये अपील करण्यात आले.  यावर फिडेचे अध्यक्ष आर्केडी डवोरकोविच यांनी दोन्ही संघांना विभागून सुवर्ण पदक देण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या फेरीत जलद प्रकारातील जगज्जेती कोनेरू हम्पी, युवा बुद्धिबळपटू निहाल सरिन आणि दिव्या देशमुख यांनाही इंटरनेट कनेक्शनचा फटक बसला.

विश्वनाथन आनंद

रशियासारख्या प्रतिस्पर्ध्याबरोबर खेळताना भारताने पहिल्या फेरीत पाच वेळच्या जगज्जेत्या विश्वनाथन आनंदला विश्रांती दिली होती. भारतीय संघाचा कर्णधार म्हणून नाशिकचा विदित गुजराथी होता. त्यानं पहिल्या पटावर खेळताना जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी असलेल्या इयान नेपोमनियाचीला बरोबरीत रोखले. जलद प्रकारातील जगज्जेती कोनेरू हम्पी हिने कॅटेरिना लॅगनो हिच्याविरुद्ध दमदार सुरुवात केली होती, पण दोघींमधील डाव अखेर बरोबरीत सुटला. पेंटाल्या हरिकृष्णन, द्रोणावल्ली हरिका, युवा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंद, दिव्या देशमुख यांनी पहिल्या फेरीत भारताकडून चोख कामगिरी केली. 

दुसऱ्या फेरीत भारताने आनंदला मैदानात उतरवले. त्यांना विदित गुजराथीनं साथ दिली. मात्र या दुस-या फेरीत इंटरनेटचा फटका भारतीय खेळाडूंना बसला. दिव्या देशमुख, तसेच निहाल सरीन यांचे इंटरनेट कनेक्शन खंडीत झाले. त्यामुळे त्यांचा पराभव झाला. परिणामी भारत दुस-या फेरीत पराभूत झाला. पण लगेच भारतीय संघाने यासंदर्भात फिडेकडे दाद मागितली…भारतीय संघातील खेळाडू हे विजयाच्या स्थानी होते. त्यामुळे फिडेनं विजेतेपदाची विभागणी केली आणि भारतालाही सुवर्ण पदक मिळाले.

यावर्षी कोवीडच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बुद्धिबळ ऑलिम्पियाड पहिल्यांदाच ऑनलाइन झाली. त्यामुळे खुला गट, महिला गट अशी विभागणी झाली नाही. भारतीय बुद्धिबळ संघाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे युवा खेळाडू…या युवा खेळाडूंनी रशियाच्या मुरलेल्या खेळाडूंना चांगली लढत दिली. त्यातून या स्पर्धेला सोशल मिडीयावरुन लाखो भारतीयांना लाईव्ह बघितले. आपल्या या पाठिराख्यांमुळे भारतीय संघ जोशात होता. त्या सर्वांचा फायदा भारतीय संघाला झाला. या विजयामुळे बुद्धिबळपट्टूमध्ये आनंदाचे वातावरण आहे. बुद्धिबळपट्टूंना २०१३ पासून कुठलाही पुरस्कार मिळालेला नाही. या सुवर्ण यशामुळे हा दुष्काळ संपेल, अशी आशाही विजेत्यांनी व्यक्त केली आहे. 

कोरोनाच्या काळात इंटरनेटचा वापर वाढला आणि सोशल मिडीयाला लोकांनी पसंती दिली. चित्रपट, नाटक, पुस्तकं सगळं नेटवरुन पसंतीस येऊ लागलं… तसंच खेळाच्या बाबतीत झालं. एरवी बुद्धीबळ कोण खेळतं असा प्रश्न पडला असेल तर तोही या बुद्धीबळाच्या मॅचने खोडून टाकला. कारण नेटवर दोन देशांमध्ये रंगलेला हा बुद्धीबळाचा सामना तब्बल सत्तर हजारावर लोकांनी लाईव्ह बघितला…वानखडे स्टेडीअमपेक्षा ही संख्या दुप्पट होती…एरवी बुद्धीबळामध्ये विश्वनाथन आनंद एवढंच नाव भारतीयांना माहीत होतं.

पण आता या खेळातील नव्या पिढीनंही आपला ठसा उमटवला आहे. लॉकडाऊन आणि क्वारंटाईनच्या काळात मनशांती गरजेची आहे. ही मनाची शांती बुद्धीबळासारखा सक्षम खेळ देऊ शकतो हे नक्की. हा सामना संपल्या संपल्या सोशल मिडीयावर भारताच्या अभिनंदनाच्या पोस्ट येऊ लागल्या…त्यामध्ये आपल्या राष्ट्रपतीच्या शुभेच्छांचाही समावेश आहे.  

कोरोनाचा अनेकांना फटका बसला. मात्र बुद्धिबळाला या कोरोनाचा फायदाच झाल्याचे लक्षात येते. एकतर बुद्धिबळ खेळणा-यांची संख्या वाढली आहे. आपल्या भारतीय संघाचा कर्णधार विदिथ गुजराथी याचे तर स्वतःचे बुद्धिबळाबाबत माहिती देणारे चॅनल आहे. एकूण काय आता भारताची युवा पिढी मोबाईल गेमपेक्षा बुद्धिबळासारख्या खेळाला जास्त महत्त्व देईल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही.   

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.