Home » चीनच्या धर्तीवर किम पर्यटन क्षेत्राला चालना देणार

चीनच्या धर्तीवर किम पर्यटन क्षेत्राला चालना देणार

by Team Gajawaja
0 comment
North Korea
Share

जगात पर्यटनासाठी अनेक देश प्रसिद्ध आहेत.  मात्र असेही काही देश आहेत, जिथे जाण्याचा काय, पण त्या देशाचे नाव घेण्याचाही कोणी विचार करीत नाहीत.  यातील पहिल्या क्रमांकाचा देश म्हणजे, उत्तर कोरिया असेल.  उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन याच्या नावाची दहशतच एवढी आहे की, त्याच्या देशात फिरायला जाण्याचा विचारच कोणी करणार नाही.  कारण या किमनं त्याच्या नागरिकांवरच एवढी कठोर बंधने घातली आहेत की, तो त्याच्या देशात आलेल्या पर्टकांना किती त्रास देईल याचाच धसका अधिक आहे. (North Korea)

मात्र आता हा किम जोंग उन बदलतोय.  त्याच्या उत्तर कोरियामध्ये पर्यटकांनी यावे यासाठी किम प्रयत्न करतोय.  त्याचे मुख्य कारण म्हणजे, उत्तर कोरियाची डबघाईला आलेली आर्थिक अवस्था.  किमच्या या देशाची गंगाजळी पार सरातळाला गेली आहे.  त्यामुळे पैसे गोळा करण्यासाठी किमनं आपली पर्यटन धोरण अत्यंत शिथिल केले आहे.  आपल्या देशात पर्यटक यावेत यासाठी किम जोंग आता लक्झरी रिसॉर्टही उघणार आहे.  तसेच चीनमध्ये जशा पद्धतीनं टूरिस्ट व्हिसा देण्यात येतो, तसाच व्हिसा उत्तर कोरियातर्फे देण्यात येणार आहे.  

उत्तर कोरिया या देशाचा हुकूमशहा किम जोंग उन हा त्याच्या वादग्रस्त वर्तनामुळे प्रसिद्ध आहे.  किमनं त्याच्या देशात लावलेले नियमही प्रसिद्ध आहेत.  त्यामुळे उत्तर कोरियामध्ये कोणी जाण्याचा आणि तिथून बाहेर पडण्याचाही कोणी विचार करत नाही.  याच किमनं आता पर्यटकांना आपल्या देशाकडे आकर्षित करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. 

त्यासाठी हा हुकूमशहा काही दिवसांपूर्वी एका वॉटर पार्कमध्ये गेला.  त्या वॉटर पार्कमध्ये खेळत असलेल्या किमचे फोटो सर्वत्र व्हायरल झाले आहेत.  याद्वारे आपल्या देशात किम पर्यटकांना आमंत्रित करत आहे.  उत्तर कोरियाचा हा हुकूमशहा आपल्या देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न करत आहे.  त्यासाठी चीनच्या धर्तीवर किम पर्यटन क्षेत्राला चालना देणार आहे.  2024 च्या ख्रिसमसपर्यंत उत्तर कोरियातील पहिला बीच रिसऑर्ट चालू करण्यात येणार आहे.  (North Korea)

पर्यटक म्हणून किम ब्रिटनसह इतर अनेक देशांतील लोकांना टुरिस्ट व्हिसा देणार आहे.  किमचा उत्तर कोरिया हा जगासाठी रहस्यमय देश आहे.  या रहस्यमय देशाला  भेट देण्यासाठी अनेक देशातील नागरिक उत्सुक आहेत.  

किम यासाठी गेली काही वर्ष प्रयत्न करत आहेत.  किम जोंग उनची प्रतिमा जगभरात खलनायक म्हणून आहे.  आपली हिच प्रतिमा आपल्या देशाच्या आड येत असल्याची जाणीव झाल्यावर किमनं लोकमानसात आपली प्रतिमा सुधारण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.  किमने 2017 मध्ये वोंसन कलमा भागात पर्यटकांना आकर्षित करणारा प्रकल्प सुरू केला होता.  वोंसन कलमा हा उत्तर कोरियाचा पश्चिम सागरी किनारा आहे.  याच किना-यावर किम पर्यटकांसाठी लक्झरी हॉटेल आणि अन्य सुविधा उभारत आहे.  मात्र  कोरोनाचा या प्रकल्पाला फटका बसला आणि त्याचे बांधकाम थांबवावे लागले.  

मात्र किम पुन्हा आता या आपल्या महत्वपूर्ण प्रकल्पाकडे लक्ष देऊ लागला आहे.  किमने या हॉटेलचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.  या बीच रिसॉर्टबरोबरच वॉटर पार्क,  विमानतळ आदींवरही पर्यटकांना लक्झरी सुविधा मिळतील, यासाठी काम सुरु केले आहे.  (North Korea)

एवढे असले तरी किमच्या देशात पर्यटक जाण्यासाठी तयार होतील का ? हा प्रश्न आहे.  पण या सर्व कामाची माहिती मिळाल्यावर उत्तर कोरियाचे आकर्षण असलेल्या देशांनी तिथे जाण्यासाठी उत्सुकता दाखवली आहे. त्यात पहिल्या क्रमाकांवर ब्रिटनचा समावेश आहे. फारकाय ब्रिटनच्या नागरिकांनी उत्तर कोरियामधील या हॉटेल्समध्ये बुकींग करण्याचीही इच्छा व्यक्त केली आहे.  त्यासाठी ब्रिटनच्या पॅकेजींग टूर करण्या-या पर्यटन कंपन्या उत्तर कोरियाबरोबर बोलणी करीत आहेत.   ही परिस्थिती असतांना ब्रिटन सरकारनं मात्र या पर्यटन कंपन्यांना खडसावले आहे.  उत्तर कोरियाची (North Korea) राजधानी प्योंगयांग व्यतिरिक्त अन्य शहरांची कल्पना कोणालाही नाही.  तेथे  त्यांना छोट्या छोट्या गोष्टींसाठी अटक केली जाते.  पर्यटकांसोबतही किमचे सरकार असेच धोरण ठेवत असेल तर ते भविष्यात धोकादायक ठरु शकते, असा इशारा सरकारतर्फे देण्यात आला आहे.  

==============

हे देखील वाचा : रेल्वे स्थानकाच्या नावामागे ‘रोड’ शब्द लावण्यामागे ‘हे’ आहे कारण

==============

2018 मध्ये किम जोंग उनने पहिल्यांदा कबूल केले होते की,  जर उत्तर कोरियाला आपली अर्थव्यवस्था सुधारायची असेल तर काही मूलभूत पावले कोणत्याही परिस्थितीत उचलावी लागतील.  त्यातूनच त्यांनी पर्यटकांसाठी वोंसन कलमा येथे विविध योजना सुरु केल्या.  येथे एकूण 150 इमारती बांधण्यात आल्या आहेत. या प्रकल्पासाठी किमला चीन आणि रशियाकडून मदत मिळाल्याचे सांगण्यात येत आहे.  काही जाणकारांच्या मते, उत्तर कोरियाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे. चीन आणि रशिया नेहमीच मदत करू शकत नाहीत, याची जाणीव झाल्यानं किमनं पर्यटनावर आता आपली भीस्त ठेवली आहे.  

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.