Home » Kim Jong Un : किमची झुकझुकगाडी !

Kim Jong Un : किमची झुकझुकगाडी !

by Team Gajawaja
0 comment
Kim Jong Un
Share

दुसऱ्या महायुद्धात जपानच्या पराभवाच्या 80 व्या वर्षाच्या निमित्ताने चीनमध्ये विजय दिन परेड साजरी करण्यात आली. राजधानी बीजिंगमधील तियानमेन स्क्वेअरवर राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी परेडची सलामी घेतली. या परेडमधील चीनच्या शस्त्रांनी जगाचे लक्ष वेधून घेतले. पण त्यासोबत या परेडसाठी उपस्थित असलेल्या उत्तर कोरियाच्या अध्यक्षांकडेही जगाचे लक्ष होते. या परेडमध्य़े सहभागी होण्यासाठी उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन हे सहपरिवार आले होते. किम शक्यतो कुठल्याही देशाच्या दौ-यावर जात नाही. पण चीनमधील या विजयी दिनासाठी किम उपस्थित होते, शिवाय त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबही होते. किमची बारा वर्षाची मुलगीही त्याच्यासोबत चीनमध्ये आली असून तिचाही पहिलाच परदेश दौरा आहे. (Kim Jong Un)

या सर्व कुटुंबाला घेऊन किम आपल्या झुकझुकगाडीतून आला आहे. होय, जशी किमला उत्तर कोरियाची सत्ता त्याच्या वडिलांकडून मिळाली आहे, तशीच या कुटुंबाला आलिशान अशी ट्रेनही मिळाली आहे. यात अगणित सुविधा आणि सुरक्षेच्या सर्व साधनांनी युक्त असलेली ही ट्रेनही किमच्या चीन दौ-यामुळे चर्चेत आली आहे. किम जोंग उनच्या या बुलेटप्रूफ ट्रेनचा फोटो घेण्यासाठी मोठी गर्दी झाली आहे. उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते आणि हुकूमशहा किम जोंग उन हे त्यांच्या सणकी स्वभावामुळे जगभर ओळखले जातात. आता हे किम जोंग उन त्यांचा मित्र देश असलेल्या चीनच्या दौ-यावर आहेत. कुठल्याही देशाचा नेता, अन्य देशात जातो, तेव्हा विमानांचा वापर करण्यात येतो. पण हा किम जोंग यालाही अपवाद आहे. (International News)

एकतर किम चीन किंवा रशिया सोडून दुस-या कुठल्याही देशात जात नाही. यापूर्वी 2023 मध्ये रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना भेटण्यासाठी याच ट्रेनने किमने मॉस्कोपर्यंत प्रवास केला होता. किमचा विमान नाही तर या बुलेटप्रुफ ट्रेनवर प्रचंड विश्वास आहे. आताही आपल्या मुलीसह चीनच्या दौ-यावर असलेल्या किमनं प्रवासासाठी हिच ट्रेन वापरली आहे. उत्तर कोरियाच्या राजधानीपासून तब्बल 20 तासांच्या प्रवासानंतर किम चीनची राजधानी बीजिंग येथे पोहचला. तेव्हा त्याच्या स्वागताची मोठी तयारी करण्यात आली होती. किमला आणि त्याच्या या बुलेटप्रुफ ट्रेनला पाहण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती. किम जोंग उनही ही ट्रेन एक अजूबाच आहे. किमच्या आजोबांपासून या ट्रेनचा वापर होत आहे. ही खास ट्रेन राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षतेसाठी डिझाइन करण्यात आली आहे. किम जोंग-उनचे वडिली किम जोंग-इल आणि आजोबा किम इल-सुंग यांनीही याच ट्रेनचा वापर केला आहे. (Kim Jong Un)

किमच्या या ट्रेनचा रंग हिरवा आहे. एखाद्या भक्कम किल्ल्यासारख्या असलेल्या या ट्रेनमध्ये राजवाड्यामध्ये असलेल्या शाही सुविधा उपलब्ध आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव, ही ट्रेन फक्त अशा देशांमध्ये जाते जिथे थेट रेल्वे कनेक्शन आहे. किमची ही ट्रेन मंगोलियापर्यंत देखील जाऊ शकते, अशी माहिती आहे. मात्र अद्याप किम या देशाच्या दौ-यावर गेलेला नाही. या बुलेटप्रूफ ट्रेनच्या प्रत्येक डब्याला स्टीलच्या जाड थराने मजबूत केले आहे. ट्रेनमध्ये आधुनिक तंत्रज्ञान, सॅटेलाइट फोन, मोठे मीटिंग हॉल, डायनिंग कार आणि वाइन-बार देखील आहेत. किमची ट्रेन ही ताशी 60 किमी वेगाने धावते. ट्रेनचा वेग सुरक्षेसाठी ठेवण्यात आला आहे. त्यामुळेच जगातील धीम्या गतीच्या काही ट्रेनमध्ये या किमच्या ट्रेनचा समावेश आहे. चीनमध्ये पोहोचताना ट्रेनचा वेग 80 किमी प्रति तास होतो. त्यामुळेच उत्तर कोरियाची राजधानी प्योंगयांगहून बीजिंगला पोहोचण्यासाठी 20 तास लागले. (International News)

=======

North Korea : जन्मलेलं मुलं देशद्रोही, या देशाचे नियम म्हणजे…

=======

20 पेक्षा जास्त डबे असलेल्या या ट्रेननं या प्रवासात 177 रेल्वे पूल आणि सुमारे 5 बोगदे पार केले. उत्तर कोरियाचा सर्वात लांब रेल्वे पूल देखील या रेल्वे मार्गावर आहे. त्याची लांबी 1200 मीटरपेक्षा जास्त आहे. या ट्रेनमध्ये एक रेस्टॉरंट कोच आहे जिथे खास जेवण दिले जाते. शिवाय ट्रेनमध्ये खास सिगारेट बॉक्स आणि अनेक फोन किमच्या दिमतीला आहेत. या ट्रेनचे नाव तायेंगो आहे ज्याचा अर्थ सूर्य आहे. हे नाव देशाचे संस्थापक किम इल सुंग यांच्या चिन्हाशी संबंधित आहे. अर्थात या ट्रेनमध्ये फक्त किम आणि त्याचे कुटुंब यांच्यासह त्याचे खास सुरक्षा रक्षकच असतात. किमच्या अन्य रक्षकांसाठी दुस-या दोन ट्रेन या ट्रेन पाठोपाठ असतात. त्याही अशाचप्रकारे सुरक्षित करण्यात आलेल्या आहेत. या ट्रेनमध्ये किमच्या वापरायच्या वस्तू, जेवणाचे साहित्य आणि अन्य गोष्टींचा समावेश असतो. (Kim Jong Un)

सई बने

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.