जगातील कुठल्याही देशाबरोबर संपर्क ठेवायचा नाही. दुस-या देशातील पुस्तक वाचायचे नाही. चित्रपट नाटक तर नाहीच नाही. आणि सर्व बंधने झुगारुन अन्य देशातील नाटक चित्रपट बघितले तर तर थेट गोळी घालून हत्या. तीही जाहीर, चार चौघांसमोर, म्हणजे, त्या बाकीच्या चौघांनाही वचक बसेल. ही कुठल्याही चित्रपटातीची कथा नसून उत्तर कोरियामधील घटना आहे. गेल्या आठवड्यात उत्तर कोरियातील ३० विद्यार्थ्यांना गोळ्या मारण्यात आल्या.
त्यांचा अपराध एवढाच होता की, त्यांनी चोरुन दक्षिण कोरियामधील प्रसिद्ध सिरिअल बघितली. या त्यांच्या गुन्ह्यामुळे या ३० मुलांना जाहीररित्या गोळ्या मारण्यात आल्या. या मुलांचे दुर्दैव असे की, मृत्यूनंतर ही बातमी जगभर १० दिवसानंतर समजली. शिवाय या मुलांच्या पालकांनाही त्यांच्या मुलांच्या निघनाबद्दल शोक करता आला नाही, अन्यथा त्यांनाही अशाच पद्धतीनं जाहीररित्या मारले गेले असते.
दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया या दोन देशांमध्ये कमालचे वैर आहे. उत्तर कोरियाचा सर्वसर्वा किम जोंग उन यन याने आपल्या देशातील नागरिकांवर अनेक बंधने टाकली आहेत. (Kim Jong Un)
या देशात मनोरंजन या नावानं नाटक अथवा चित्रपट बघण्याचे स्वातंत्र्यही नागरिकांना नाही. येथील टीव्ही चॅनेलवरही किम आणि त्यांच्याच परिवाराचा गोडवा गाणा-या मालिका चालवल्या जातात. अशावेळी उत्तर कोरियामधील तरुण दक्षिण कोरियातून येणा-या पेनड्राईव्हच्या भरोशावर असतात. दक्षिण कोरियातून फुग्यांच्या सहाय्यानं पेन ड्राईव्ह पाठवले जातात. या पेन ड्राईव्हमध्ये चित्रपट, नाटक, पुस्तकाचा ऑडिओ असते. अशाच पेनड्राईव्ह मधून आलेल्या मालिका बघितल्यामुळे उत्तर कोरियामध्ये ३० शालेय मुलांना गोळ्या मारण्यात आल्या आहेत. ही घटना जाहीररित्या झाली, यावेळी या मुलांचे पालकही उपस्थित होते. पण हे हताश पालक आपल्या मुलांना मरतांना पहाण्यापेक्षा अन्य काहीही करु शकले नाहीत.
उत्तर कोरियाचा सणकी हुकूमशहा किम जोंग उनच्या या दुष्टकृत्याची जगाला माहिती मिळाली तीही दहा दिवसानंतर. दक्षिण कोरियामधील के-ड्रामा मालिका जगभर प्रसिद्ध आहेत. याच मालिका चोरुन बघितल्यामुळे ३० शालेय विद्यार्थ्यांना मारण्यात आले आहे. या हत्याकांडाची माहिती प्रथम दक्षिण कोरियातील वृत्तपत्रांना मिळाली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार या विद्यार्थ्यांनी पेन ड्राईव्हमध्ये साठवून ठेवलेली अनेक दक्षिण कोरियाई नाटके पाहिली होती. (Kim Jong Un)
हे पेन ड्राईव्ह गेल्या महिन्यात सोलमधून फुग्यांद्वारे उत्तर कोरियाला पाठवण्यात आले होते. उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन याने कोरियन नाटकांवर बंदी घातली आहे. तिथे ‘जपानी, कोरियन आणि अमेरिकन नाटकांवरही बंदी आहे. फक्त तिथे रशियन सिनेमा किंवा सरकार योग्य मानते तोच सिनेमा तिथे दाखवला जातो. या दोघांतही किमच्या गुणाचे कौतुक केलेले असते. पण हे न करता अन्य देशातील चित्रपट बघितले तर त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात येतो, आणि त्यांना ठार मारण्यात येते.
यासंदर्भात उत्तर कोरियामध्ये एक कायदा लागू करण्यात आला आहे.
यात अन्य देशातील कुठल्याही सांस्कृतिक घडामोडी पाहिल्यास वा ऐकल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल करता येतो. यात पुस्तके, गाणी आणि छायाचित्रांचाही समावेश आहे. या कायद्याचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्तीस मारण्यात येते किंवा त्याला १५ वर्षाची शिक्षा सुनावण्यात येते. अर्थातच उत्तर कोरियाच्या तुरुंगात जाण्यापेक्षा तेथील जनता मृत्युला अधिक चांगले समजतात, एवढी भयानक अवस्था तेथील तरुंगांची आहे. (Kim Jong Un)
उत्तर कोरियाच्या या कायद्याच्या कचाट्यात तरुण मुलंच अधिक अडकत आहेत. गेल्या महिन्यात ३० शालेय मुलांकडे दक्षिण कोरियातील नाटकं आणि साहित्य मिळाले. त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. पण उत्तर कोरियामध्ये या घटना वारंवार घडत असून नागरिकांवर वचक बसवण्यासाठी या ३० विद्यार्थ्यांना जाहीररित्या मारण्यात आले. येथे काही महिन्यापूर्वीच दोन शालेय विद्यार्थ्यांना दक्षिण कोरियाचे व्हिडिओ बघितल्यामुळे अटक करण्यात आली.
त्यांना १२ वर्षाची सक्तमुजुरीची शिक्षा झाली आहे. त्यानंतर २२ वर्षाच्या मुलाकडे ७० हून अधिक दक्षिण कोरियाची गाणी मिळाली. त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. पण हा तरुण तरुंगातून पळून गेला. अर्थातच दुस-याच दिवशी त्याचा मृतदेह मिळाला. जबर मारहाण झाल्याच्या खुणा त्याच्या सर्व शरीरावर होत्या. (Kim Jong Un)
दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरियामधील कट्टर वैरामुळे अशा अनेक तरुणांना आपला जीव गमवावा लागला आहे. उत्तर कोरियामध्ये सर्वच साहित्यावर कडक बंदी असल्यामुळे दक्षिण कोरियातून फुग्याच्या माध्यमातून पेनड्राईव्ह पाठवण्यात येतात. या कामातही प्रचंड काळजी घ्यावी लागते. कारण एखाद्याच्या घरी चुकून जरी या पेनड्राईव्ह आणि फुग्याचे सामान मिळाले, तर त्याचे कोणतेही कारण न ऐकता, अटक होऊ शकते. या अटकेला विरोध केला तर संबंधिताला मारण्यातही येऊ शकते.
या दोन देशातील हे फुग्याच्या गुप्त वाहतुकीचे साधन एवढे वादात आहे की उत्तर कोरियानं दक्षिण कोरियात फुग्यांद्वारे कचरा पाठवण्यास सुरुवात केली आहे. दक्षिण कोरियाने आपल्या देशात कुठलेही साहित्य वा सामान पाठवले तर आम्ही त्यांना कचरा पाठवू असा इशारा किमतर्फे देण्यात आला होता. त्याची लगेच अंमलबजाबणी करीत दक्षिण कोरियमध्ये फुग्यांमार्फत कचरा पाठवण्यास सुरुवात झाली होती. यातून दक्षिण कोरियामध्ये पहाटेच्यावेळी हजारो किला कचरा टाकण्यात आला होता. (Kim Jong Un)
====================
हे देखील वाचा : जपानमध्येही नसबंदीची काळीबाजू
====================
त्यानंतर या दोन देशातील फुग्यांमधून होणारी वाहतूक कमी झाली होती. मात्र ही वाहतूक पुन्हा सुरू झाली आणि त्यातून दक्षिण कोरियातील मालिकांचे भाग पेनड्राईव्हवरुन यायला लागल्यावर किम जोंग उनने थेट ३० मुलांना त्यांच्या पालकांसमोरच गोळ्या घातल्या आहेत. दक्षिण कोरियातील के-ड्रामा या टेलिव्हीजन शो ला १९६० च्या दशकात सुरुवात झाली. कालानुरुप या शोमध्ये बदल झाले. आता जगभर के-ड्रामाचे चाहते आहेत. बहुतांशी प्रेमकथा यात असतात. आता याच लोकप्रिय प्रेमकथांनी उत्तर कोरियामधील ३० अल्पवयीन विद्यार्थ्यंचा बळी घेतला आहे.
सई बने