महाराष्ट्र विधानसभेतील अधिवेशन नेहमीच अनेक घटनांमुळे चर्चेत असते. अधिवेशनात ज्याप्रमाणे महत्वाच्या प्रश्नांबाबत चर्चा होते. त्याप्रमाणेच अनेक वेळा अनावश्यक राजकीय वाद देखील नक्कीच बघायला मिळतात. ज्या ठिकाणी सकारात्मक चर्चेतून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सुटणे अपेक्षित असतं, अशा ठिकाणी राजकीय वाद होणे ही दुर्दैवी गोष्ट आहे. यावेळी अधिवेशनामध्ये सावळा गोंधळ का आणि कसा झाला. त्या घटना कुठल्या, चला तर मग, याबद्दल जाणून घेऊया.
१. भास्कर जाधवांनी मागितली माफी
अधिवेशनाचा पहिला दिवस प्रश्नोत्तराचे सत्र चालू होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला केंद्र सरकार प्रमाणे इंधनातील दरवाढ नियंत्रणात आणण्यासाठी काही प्रमाणात कर कपात करण्याविषयी प्रश्न विचारला असता, सदस्य भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केली.
खरं पाहता विधानसभेच कामकाज सुरु असताना अशाप्रकारे देशाच्या पंतप्रधानांवर टीका करण्याची काहीच आवश्यकता नव्हती कारण पंतप्रधान विधानसभेचे सदस्य नाहीत आणि दुसरी गोष्ट सभागृहात त्यांच्याबद्दल चर्चाही सुरु नव्हती. तरीही सरकारमधील काही मंत्र्यांना पंतप्रधानांची नक्कल करण्याचा मोह आवरता आला नाही.
झालं, या घटनेमुळे विरोधी पक्षातील सदस्य आक्रमक झाले, त्यांनी भास्कर जाधव यांच्या वक्तव्यावर आणि अंगवीक्षेपावर हरकत घेतली. त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी मोठ्या प्रमाणात गदारोळ सुरु झाला.
हा गोंधळ थांबवण्यासाठी सरकारमधील मंत्र्यांनी मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घटनेबद्दल नाराजी व्यक्त केली. कुठल्याही पक्षाच्या नेत्यांचा अपमान केला जाऊ नये, असे आव्हान देखील सर्व सदस्यांना केले.
परंतु विरोधक आक्रमक होते. विरोधकांचा आक्रमकपणा पाहून शेवटी भास्कर जाधव यांनी केलेल्या हातवाऱ्यांसाठी आणि नकलेसाठी बिनशर्त माफी मागितली. ही माफी मागितल्यानंतरच विरोधक शांत झाले आणि त्यांनी सभागृहाचे कामकाज चालू दिले.
२. म्याव म्याव, म्याव म्याव
गेल्या काही दिवसांपासून राजकीय पटलावर ‘म्याव म्याव’ हा आवाज प्रचंड प्रसिद्ध झाला आहे. महाराष्ट्रामध्ये हा आवाज सगळीकडे सोशल मिडीयाच्या माध्यमातून ऐकायला मिळाला आणि या आवाजाने अधिवेशनातही मोठा गोंधळ घातला. विधानसभेचा आणि अधिवेशनातील कामकाजाचा या आवाजाशी काय संबंध? कोणी काढला होता हा आवाज ?
अगदीच काही सेकंदाच्या ‘त्या’ आवाजाच्या व्हीडीओने महराष्ट्रात खळबळ माजवली. भाजपचे काही आमदार विधान सभेच्या प्रवेशद्वारात पायऱ्यांवर विविध मागण्यासाठी धरणे आंदोलन करत होते. या आंदोलनादरम्यान सरकारचा निषेध व्यक्त करणाऱ्या अनेक घोषणा देण्यात आल्या.
हे सर्व आंदोलन चालू असताना ‘आदित्य ठाकरे’ यांचा प्रवेश झाला. ते इमारतीतीत जात असताना आंदोलनात उपस्थित भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ‘म्याव म्याव’ असा आवाज काढत त्यांची खिल्ली उडवली. याही पुढे नितेश राणेंनी आपण असा आवाज काढला नाही असे म्हटले नाही. त्यांनी अशा प्रकारे महाराष्ट्राच्या मंत्र्यांची खिल्ली उडवणे चुकीचे आहे.
हे ही सांगा: विधानसभा अध्यक्ष निवडीचा गुंता
विधानसभेतील मार्गदर्शक तत्वांची पायमल्ली करणारी त्यांची कृती आहे. अशा प्रकारचा युक्तिवाद करत सुरेश प्रभू यांनी नितेश राणे यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी केली. देवेंद्र फडणवीस यांनी देखील नितेश राणे यांना सभागृहात समज दिली आणि या संपूर्ण प्रकरणावर पडदा पडला.
हे देखील वाचा: विनायक पाटीलांनी दाखवलेल्या ‘त्या’ प्रसंगावधनामुळे शरद पवारांचा तो कार्यक्रम यशस्वी झाला होता (Sharad Pawar)
परंतु, या घटनेमागील काही पार्श्वभूमी समजून घेतलीच पाहिजे, नितेश राणे आणि त्यांचे वडील नारायण राणे यांची राजकीय सुरुवात ही शिवसेना या पक्षातीलच आहे. त्यांना खऱ्या अर्थाने ओळख देखील याच पक्षातून प्राप्त झाली आहे हे देखील विसरून चालणार नाही. या आधीदेखील अनेक राजकीय व्यक्तींनी आदित्य ठाकरे यांची नक्कल केली होती, अमोल मिटकरी यांच्या नकलेच भाषण, तर सोशल मिडीयावर प्रसिद्ध आहे.
– रोहित लांडगे