महाराष्ट्रातील राजकारणाची पातळी वरचेवर इतक्या खालच्या स्तराला जात आहे की , विवेकबुद्धीने काम करणाऱ्यांना अक्षरशः त्याची शिसारी यावी. एकीकडे सामान्य जनता महागाई आणि इतर प्रश्नांमुळे मेटाकुटीस आलेली असताना राजकीय नेते मात्र रोजच्या रोज आज ‘धुळवड’ कशी रंगवायची यामध्येच मश्गुल असल्याचे चित्र दिसत आहे.
महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यापासून ते पाडण्याचा सतत प्रयत्न करणारे विरोधक आणि सत्तारूढ आघाडीचे नेते यांच्यात एकही दिवस असा गेला नाही की, ज्यादिवशी त्यांच्या आरोप-प्रत्यारोपाचा ‘कलगी-तुरा’ रंगला नाही. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्या नेत्यांनी आणि सत्त्तारुढ पक्षाच्या आघाडीतील नेत्यांनी एकमेकांना तुरुंगात डांबण्याचा जणू विडाच उचलला असून त्यासाठी उभय बाजूंनी केंद्र आणि राज्य सरकारच्या यंत्रणेचा सोयीस्कर वापर करून घेण्याचे ठरविलेले दिसते. (Ketaki Chitale Controversy)
परस्परांवर दररोज केल्या जाणाऱ्या खालच्या पातळीवरील आरोपांमुळे राजकारणाने हीन पातळी केव्हाच गाठली आहे. त्यातच सोशल मेडिया नावाच्या नव्या ब्रह्मराक्षचाचा यासाठी वापर करण्यात येत असल्यामुळे महाराष्ट्रात झपाट्याने राजकीय विद्वेषाचे आणि विखाराचे गडद वातावरण निर्माण झालेआहे. मात्र दुर्देवाने उभय बाजूंतर्फे कोणीही या प्रश्नाचा सारासार विचार करताना दिसत नाही.
पुण्यात राहणाऱ्या कोण्या केतकी चितळे या अभिनेत्रीने महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री शरद पवार यांच्याबद्दल सोशल मीडियावर अशीच एक अत्यंत आक्षेपार्ह पोस्ट करून राजकीय विद्वेषाचे वातावरण आणखी तापविण्याचा प्रयत्न केला आहे. वास्तविक कोणत्याही माणसाच्या आजारावर अथवा व्यंगावर बोट ठेवून त्याची क्रूर थट्टा करणे किंवा कोणत्याही माणसाच्या मरणाची इच्छा व्यक्त करणे हे कोणत्याच संस्कृतीत बसत नाही. (Ketaki Chitale Controversy)
शरद पवार हे जेष्ठ नेते आहेत. त्यांनी राजकारणाबरोबरच साहित्य, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. मात्र केतकी चितळे हिने, शरद पवार यांच्या वयाचा, त्यांच्या अनुभवाचा, त्यांनी केलेल्या महाराष्ट्राच्या विकासाचा कसलाही सारासार विचार न करता नितीन भावे नामक एका वकिलाची आक्षेपार्ह भाषेतील शरद पवार यांच्यावरील एक कविता रिपोस्ट केली आणि आपल्या मानसिक विकृतीचे दर्शन घडविले.
”केतकीने दाखविली मानसिक विकृती
‘चितळे’ असूनही विसरली संस्कृती
‘केतकी’च्या बनी हे ‘जहर’ आणले कोणी ?
असेच तिच्या या विकृत पोस्टबाबत म्हणावे लागेल. पुण्यातील ब्राम्हण महासंघाने देखील केतकीच्या या ‘पोस्ट’चा निषेध केला यावरून केतकीची ‘ती पोस्ट’ किती खालच्या दर्जाची आणि हीन पातळीची असेल याची कल्पना येते. (Ketaki Chitale Controversy)
केतकीच्या या पोस्टचे महाराष्ट्रात लगेचच तीव्र पडसाद उमटले नसते तरच नवल. अनेक ठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने करून केतकी चितळे हिचा निषेध केला. पुणे, कळवा आदी ठिकाणी तिच्याविरुद्ध गुन्हेही दाखल करण्यात आले. एवढेच नव्हे तर पोलिसांनी तातडीची कारवाई म्हणून तिला अटकही केली आणि न्यायालयाने तिची पोलीस कोठडीत रवानगीही केली.
कळवा पोलीस ठाण्यात केतकीला आणले जात असताना राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी तिच्यावर शाई आणि अंडीफेकही केली. तर पुण्यात विनायक आंबेकर नावाच्या भाजपच्या प्रवक्त्याला मारहाणही करण्यात आली. या प्रकरणाला आता उघडपणे जातीयवादाचे स्वरूप प्राप्त झाल्यामुळे हे प्रकरण नजीकच्या काळात आणखी चिघळण्याची दाट शक्यता आहे.
त्यामुळे यानिमित्ताने माननीय शरद पवार साहेबांना एकच विनंती करावीशी वाटते की, पोलीस त्यांच्यापद्धतीने केतकीविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करतीलच मात्र त्यांनी तिला उदार अंत:करणाने माफ करावे. तिला माफ करणे ही केवळ तिलाच नव्हे तर राजकीय विद्वेषाचे वातावरण निर्माण करू पाहणाऱ्या अनेकांना मारलेली सणसणीत चपराक असेल. कारण शस्त्राला शस्त्रानेच उत्तर दिल्यास खणखणाट आणखी वाढतो, राजकीय विद्वेषाला विद्वेषानेच उत्तर दिल्यास विद्वेष आणखीनच वाढणार आणि महाराष्ट्रातील वातावरण आणखी गढूळ होणार.
====
हे देखील वाचा: एका देशात एकच भाषा आवश्यक, हिंदीचा अपमान योग्य नाही – संजय राऊत
====
राजकीय विचारांबाबत विरोध असू शकतो पण अशा स्वरूपाच्या विकृतीला वेळीच आवर घालणे गरजेचे आहे. विलासराव, गोपीनाथराव, प्रमोद महाजन, सुशीलकुमार शिंदे, देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, नितीन गडकरी आणि शरद पवार… ह्यांच्यात वैचारिक, राजकीय मतभेद कितीही असोत पण आजसुद्धा ही मंडळी प्रसंगी एकत्र व्यासपीठ शेअर करतात आणि एकमेकांच्या चांगल्या कामाचे कौतुकही करतात. आणि हीच महाराष्ट्राची खरी संस्कृती आहे. केतकी चितळे / वकील नितीन भावे प्रकरणावरून नक्कीच म्हणावं लागेल की नुसतं सुशिक्षित होऊन उपयोग नाही तर सुसंस्कृत होणं फार गरजेचे आहे.
– श्रीकांत नारायण
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)
टीप : या लेखातील माहिती आणि मते ही सर्वस्वी लेखकाची आहेत. क फॅक्टस टीम याची पुष्टी करत नाही. तसेच लेखकाच्या मतांशी आम्ही सहमत असूच असेही नाही.