तिरुपती बालाजीच्या प्रसादामधील लाडूमध्ये भेसळ आढळल्यावर देशभर तीव्र नाराजी पसरली आहे. हिंदू धर्मामधील अनेक भाविक कांदा आणि लसूणही व्यर्ज करतात. अशावेळी देवाच्या प्रसादामध्ये चरबीचा वापर करण्यात आला, यामुळे अनेकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. यामुळे आता काशी विद्वत परिषदेने काही उपाय सुचविले आहेत. देशभरातील मंदिर व्यवस्थेबाबत काशी विद्वत परिषद पुढच्या काही महिन्यातच बैठका घेणार असून मंदिरांची व्यवस्था बघण्यासाठी एक विशिष्ट कार्यप्रणाली असावी असा या परिषदेचा आग्रह आहे. यानुसार देशभरातील मंदिरांमध्ये नवीन प्रसाद प्रणाली लागू करण्यात येणार आहे. त्यातून प्रसादामध्ये पंचमेवा, फळे, बताशा आणि रामदानाचा प्रसाद दिला जाण्याची शिफारस कऱण्यात आली आहे. (Kashi Vidwat Parishad)
तिरुपती बालाजीच्या प्रसादातील लाडूंमधील तुपाची भेसळ ही लाखो हिंदूंच्या भावना दुखवणारी ठरली आहे. यामुळे साधु-संतांमध्येही नाराजीचे वातावरण आहे. यामुळे देशातील मंदिरांमध्ये नवीन प्रसाद प्रणाली लागू करण्याबाबत काशी विद्वत परिषदेने पुढाकार घेतला आहे. बालाजीच्या लाडवांमधील भेसळीचे प्रकरण पुढे आल्यावर देशभरातील मंदिरांमध्ये मिळणा-या प्रसादावर शंका उत्पन्न करण्यात आली. शिवाय मथुरा, वृंदावन येथीलही काही प्रसाद विक्रेत्यांवर धाड टाकण्यात आल्यावर प्रसाद सामुग्रीमध्ये भेसळ होत असल्याचे स्पष्ट झाले. अशा परिस्थितीत हिंदू मंदिरांच्या संदर्भात काम करणा-या काशी विद्वत परिषदेने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत याबाबत सुधारणा करण्यासाठी काही उपाय सुचवले आहेत. काशी विद्वत परिषदेने अखिल भारतीय संत समितीचे राष्ट्रीय सरचिटणीस स्वामी जितेंद्रनंद सरस्वती यांच्याबरोबर चर्चा करुन मंदिरांमधील प्रसाद वितरण व्यवस्थेत बदल करण्यास सांगितले आहे. (Kashi Vidwat Parishad)
याविषयात काशी विद्वत परिषद आणि अखिल भारतीय संत समिती देशातील सर्व मोठ्या मंदिरांच्या व्यवस्थापक आणि प्रशासकांसोबत बैठक घेणार आहे. या बैठकीनंतर नवीन प्रसाद प्रणाली लागू करण्यात येणार आहे. या बैठकीत झालेला निर्णय सरकारला कळवण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. काशी विद्वत परिषदेचे सरचिटणीस प्राध्यापक रामनारायण द्विवेदी यांनी या संदर्भात माहिती दिली. मंदिरामध्ये भाविक मोठ्या श्रद्धेने जातात. ते प्रसाद ग्रहण करतात, सोबतचा प्रसाद आपल्या आप्तमंडळींमध्येही श्रद्धेनं वाटतात. त्या प्रसादाची शुद्धता राखली जाणे हे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी पंचमेवा, बताशा, रामदाणे यापासून बनवलेल्या वस्तू मंदिरात प्रसाद म्हणून देण्याची शिफारस काशी विद्वत परिषदेने केली आहे. या वस्तूंमध्ये भेसळ नसेल याची खात्री मंदिर प्रशासनानं करणं गरजेचे असल्याचेही सांगण्यात आले आहे. यासाठी लवकरच काशी विद्वत परिषद एक नियमावलीही जाहीर करणार आहे. (Social News)
याशिवाय काशी विद्वत परिषदेने देशातील मोठ्या मंदिरांनाही काही सूचना दिल्या आहेत. या मंदिरांची जागा आहे, त्यांनी गायींची गोशाळा उभारावी. या गोशाळेतील दुधाचा आणि त्यापासून बनवण्यात येणा-या तुपाचा वापर प्रसादामध्ये करावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत. असे केल्यास गोरक्षणासोबतच सनातन धर्माची उन्नती करता होईल, असेही काशी विद्वत परिषदेने स्पष्ट केले आहे. श्री काशी विद्वत परिषद तिरुपती बालाजी मंदिरातील लाडूप्रकरण बाहेर आल्यापासून देशभरातील मंदिरांना एका सूत्रात बांधण्यासाठी पुढाकार घेत आहे. यामध्ये आखाडा परिषद, अखिल भारतीय संत समिती अन्य संस्थांचाही समावेश करण्यात येणार आहे. (Kashi Vidwat Parishad)
=================
हे देखील वाचा : नंदिनीचे तुप
================
तिरुपती बालाजी येथील घटनेने 30 कोटींहून अधिक हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. हिंदू धर्मियांवर झालेला हा मोठा आघात असल्याचे परिषदेने सांगितले आहे. त्यामुळेच संपूर्ण देशातील मंदिरांमधील प्रसाद वितरण कसे होते, हे महत्त्वाचे ठरणार आहे. तिरुपती बालाजी सारख्या मोठ्या मंदिरात प्रसादात भेसळ करत हिंदू धर्मियांच्या भावनांना पायदळी तुडवण्यात आल्या, तर अन्य लहान मंदिरात प्रसाद वितरणात घोटाळा असेल तर त्याला समोर असे आणायचे, हा प्रश्नही काशी विद्वत परिषदेला आहे. त्यासाठीच त्यांनी स्थानिक मंडळांनाही एकत्र येण्याच्या सूचना केल्या आहेत. काशी विद्वत परिषदेची स्थापना होऊन 100 वर्ष झाली आहेत. जवळपास 17 जिल्ह्यात या परिषदेचा विस्तार झाला आहे. आता या परिषदेने देशातील मंदिरांना एका सूत्रात बांधण्याचे काम सुरु केले आहे. (Social News)
सई बने