फिल्मी सण म्हणून ज्याच्यावर शिक्का बसला आहे, असा करवा चौथचा सण रविवार 20 ऑक्टोबर रोजी साजरा होणार आहे. हिंदू धर्मात करवा चौथ या सणाला विशेष महत्त्व आहे. उत्तरभारतात हा सण मोठ्या प्रमाणत साजरा होतो. मात्र हिंदी चित्रपटांनी या सणाला संपूर्ण देशभर लोकप्रिय केलं. या दिवशी महिला निर्जला व्रत करतात आणि करवा देवीची पूजा करुन पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. चंद्र बघितल्यावर भगवान शंकर, माता पार्वती, भगवान गणेश आणि कार्तिकेयची पूजा केली जाते आणि रात्री चंद्राला अर्घ्य दिल्यावर उपवास सोडला जातो. करवा चौथ हा सण कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थी तिथीला साजरा केला जातो. उद्या 20 रोजी हा सण असल्यानं बाजारात या सणासाठी लागणा-या वस्तुंची गर्दी झाली आहे. याच सणाला एक शब्द प्रचलीत झाला आहे, तो म्हणजे सरगी. ही सरगी सासू आपल्या सुनेला देते. (Karva Chauth)
महिला व्रत सुरू करण्यापूर्वी सरगीचे सेवन करतात आणि मग दिवसभरचा उपवास करतात. ही सरगी म्हणजे, नेमकं काय हे आपण जाणून घेऊया. कभी खुशी कभी गम या 2001 मध्ये आलेल्या बॉलिवडूचित्रपटात सरगी म्हणजे काय, हे सांगतांनाचे एक दृश्य आहे. अर्थात त्याआधीही सरगी हा शब्द होता. पण करवा चौथ हा सण एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकप्रिय करण्याचे सर्व श्रेय हिंदी चित्रपटांना आहे. बहुधा बहुतेक चित्रपटांमध्ये करवा चौथ सण साजरा करतांना दाखवले आहे. मात्र महिलांच्या आरोग्यासाठी तसेच कुटुंबाला एक करणारा सण म्हणूनही करवा चौथचे महत्त्व आहे. करवा चौथ व्रत सुरू होण्यापूर्वी सासू आपल्या सुनेला काही खाद्यपदार्थ भरुन एक थाळी देते. त्यालाच सरगी म्हटले जाते. या सरगीमध्ये उपवास करण्यासाठी दिवसभरची उर्जा मिळेल, असे खाद्यपदार्थ असतात. सुकामेवा असते. याच सरगीतील खाद्यपदार्थ सकाळा खाल्ले जातात. (Social News)
त्यानंतर मग घरातील महिला निर्जला उपवास पकडतात. सरगीची थाळी कधी द्यायची, आणि कशी द्यायची याचाही मुहूर्त असतो. साधारण सरगीची थाळी, उपवासाच्या दिवशी भल्या पहाटे दिली जाते. पहाटे 4 ते 5 दरम्यान सरगी दिली जाते. ज्या महिलांना सासून नसते, त्यांना सरगीची थाळी, त्यांच्या घरातील सर्वात मोठी महिला देते. ही सरगीची थाळी अनेकविध सामुग्रीने सजवली जाते. त्यात खाद्यपदार्थ असतातच, सोबत महिलांना सजण्यासाठीच्या वस्तूही असतात. अर्थात सरगी काय असावी, आणि कशी असावी हे प्रत्येकाच्या आर्थिक स्थितीप्रमाणे ठरते. पण सरगीच्या थाळीमध्ये गोड पदार्थ आवर्जून असतो. त्यात विशेषतः ड्रायफ्रुट्स आणि खीर सारख्या गोष्टींचा समावेश होतो. याशिवाय गोड शेवया, सफरचंद, संत्रा, डाळिंब आणि केळी यासारखी फळे, सोबत नारळ आणि काकडी. (Karva Chauth)
कारण यात पाण्याचा समावेश असतो. सुका मेवा आणि पराठा, ज्युस, मिठाई या सर्वांचा सरगीमध्ये समावेश असतो. पौराणिक कथेनुसार, सरगी हे आशीर्वादाचे एक रूप आहे जे सासू आपल्या सुनेला चांगल्या आरोग्याच्या इच्छेने देते. त्याप्रमाणेच ही सरगी सजवली जाते. सरगीमध्ये फळे, मिठाई, साडी, मेहंदी, मेकअपच्या वस्तू, दागिने असणे शुभ मानले जाते. आपल्या घरातील सुनेला आरोग्याचे वरदान म्हणून या सरगीकडे बघितले जाते. सध्या बाजारात अशाच सरगीच्या अनेक थाळ्या सजलेल्या दिसून येत आहेत. ही सरगी देण्यासाठी पहाटेचा मुहूर्त असतो. भल्या पहाटे अभ्यंगस्नान केल्यावर सासू सुनेला सरगी देते. मग त्यातील पदार्थांचे सेवन करुन ती महिला उपवास पकडते. (Social News)
======
हे देखील वाचा : करवा चौथ उपवासाची संपूर्ण माहिती आणि कथा
======
20 ऑक्टोबर रोजी होणा-या करवा चौथसाठी सरगीचा मुहूर्त पहाटे 4 ते 5 दरम्यानचा आहे. तर सायंकाळी पुजेसाठी 7.40 पर्यंतचा मुहूर्त देण्यात आला आहे. संध्याकाळी 7.40 नंतर महिला चंद्राला अर्घ्य अर्पण करुन उपवास सोडणार आहेत. बाजारात या करवा चौथसणानिमित्तानं मोठी आर्थिक उलाढाल होतांना दिसत आहेत. अगदी मेहंदी काढण्यापासून ते लाखो रुपयांच्या कपडे खरेदीपर्यंत ही उलाढाल आहे. दिवाळी आधी करवा चौथचा सण येत असल्यामुळे त्या दिवशी मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात येते. विशेषतः कपड्यांच्या बाजारात या सणामुळे मोठी मागणी वाढते. (Karva Chauth)
सई बने