अनेकांना असे वाटते की दिवाळी संपली की आपले सण संपतात. मग थेट मकर संक्रांत हाच सण येतो. मात्र असे अजिबातच नसते. दिवाळी झाल्यानंतर देखील अनेक महत्वाचे सण येत असतात. हे सण जरी खूप मोठ्या स्तरावर साजरे केले जात नसले तरी त्यांना धार्मिकदृष्ट्या मोठे महत्व आहे. या सणांचा इतिहास देखील जाज्वल्य आहे. नुकतीच कार्तिक एकादशी अर्थात देवउठनी एकादशी झाली. या दिवसापासून तुळशी विवाहाची देखील सुरुवात होते.
कार्तिक एकादशीपासून चातुर्मासाच्या चार महिन्यात बंद असलेली सर्वच शुभ कामं देखील चालू होतात. तुळशी विवाह कार्तिक एकादशीला सुरु होतो आणि त्रिपुरारी पौर्णिमेला समाप्त होतो. कार्तिक पूर्णिमा अर्थात त्रिपुरारी पौर्णिमा या दिवसाला देखील अनन्यसाधारण महत्व आहे. याचा देखील संबंध आपल्या पुराणांशी आणि देवी देवतांशी आहे. त्रिपुरारी पौर्णिमा का साजरी करतात? काय आहे या दिवसाचे महत्व? चला तर मग जाणून घेऊया या त्रिपुरारी पौर्णिमेबद्दल.
त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे दिवाळी सणाचा उत्तरार्धच असतो. याच दिवशी देवदिवाळी देखील मोठ्या आनंदाने साजरी केली जाते. या दिवशी पणत्या लावल्या जातात, रांगोळया काढल्या जातात, फटाके फोडले जातात. कार्तिक पौर्णिमेला मुख्यत्वे करून कार्तिकेय देवाचे पूजन केले जाते. त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी ‘हरिहर भेट’ म्हणजे विष्णू आणि शंकराची भेट होते, असे मानले जाते. यादिवशी विष्णूला बेल आणि शंकराला तुळस वाहून त्यांची पूजा करतात.
यासोबतच त्रिपुरारी पौर्णिमा हा भगवान शंकराला समर्पित असलेला दिवस आहे. या दिवशी शिव शंकराचा विजय साजरा केला जातो. या दिवशी, भगवान शिवांनी त्रिपुरासुराचा वध केला होता. यामुळे, या दिवशी त्रिपुरा राक्षसाचे प्रतीक म्हणून साडेसातशे त्रिपुरवाती जाळल्या जातात. त्रिपुरारी पौर्णिमेला भगवान शिवाची पूजा केल्याने जीवनातील अंधकार दूर होतो आणि सर्व समस्यांचे निवारण होते अशी मान्यता आहे.
त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी कार्तिकेयाचे दर्शन घ्यावे, गंगास्नान करावे, ब्राह्मणांना दीपदान द्यावे असे शास्त्रात सांगितले आहे. बौद्ध धर्मात तर असे मानले जाते की, कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तथागत बुद्धांचा एक पट्टशिष्य धम्म सेनापती सारिपुत्रचे परिनिर्वाण झाले होते. या पौर्णिमेला बौद्ध धर्मीय स्त्री-पुरुष आठ शीलांचे पालन आणि उपोसथ व्रत करतात. सर्व लहान-थोर उपासक-उपासिका एकत्र जमून बुद्ध वंदना घेऊन धम्म उपदेश ग्रहण करतात.
हिंदू पंचांगानुसार, यंदा कार्तिक शुक्ल पौर्णिमा तिथी शुक्रवार, १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ६.१९ वाजता सुरू होत आहे. ही तारीख शनिवार, १६ नोव्हेंबर रोजी पहाटे २:५८ वाजता समाप्त होईल. अशा स्थितीत उदयतिथीच्या निमित्ताने कार्तिक पौर्णिमा शुक्रवार, १५ नोव्हेंबर रोजी आहे.