आपल्या हिंदू धर्मामध्ये पौर्णिमेला खूपच महत्व आहे. प्रत्येक महिन्यात पौर्णिमा येतच असते. मात्र दिवाळीनंतर येणारी कार्तिक महिन्यातील पौर्णिमा ही अत्यंत शुभ आणि लाभदायक मानली जाते. कार्तिकी पौर्णिमेला धार्मिक महत्व मोठ्या प्रमाणावर आहे. या दिवशी देव दिवाळीचा सण देखील मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. कार्तिकी पौर्णिमेला भगवान विष्णू, माता लक्ष्मी, चंद्र देव, भगवान शिव आणि माता पार्वती यांचीही पूजा केली जाते.
कार्तिक पौर्णिमा शुक्रवार १५ नोव्हेंबर रोजी साजरी केली जाणार आहे. एकादशीपासून सुरू झालेले तुळशी विवाह करण्याचा हा शेवटचा दिवस असतो. यासोबतच कार्तिक पौर्णिमेला चंद्राला अर्घ्यही दिले जाते. सोबतच, यादिवशी कार्तिक स्नान करणे देखील शुभ समजले जाते. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये पूजा आणि स्नानकरण्याबरोबरच दानदेखील करावे. असे मानले जाते की या दिवशी काही गोष्टींचे दान केल्याने व्यक्तीच्या जीवनात सुख-समृद्धी राहते.
धार्मिक मान्यतेनुसार कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकराने त्रिपुरासुराचा वध केला आणि देवांना त्याच्या अत्याचारांपासून मुक्त केले. या आनंदात देवांनी दिवे लावले होते. यामुळे या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असेही म्हणतात. यादिवशी शिव मंदिरात त्रिपुर वात लावली जाते. कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी घरात, घराबाहेर, मंदिरांमध्ये दिव्याची अतिशय सुंदर आरास पाहायला मिळते. या दिवशी नदीत दीपदान करायला देखील मोठे महत्व आहे.
कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी-नारायण आणि महादेवाच्या पूजेबरोबरच काही खास गोष्टींची काळजी घेणे महत्वाचे मानले जाते. जाणून घेऊया कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये?
कार्तिक पौर्णिमेच्या कोणत्या वस्तूंचे दान करतात
अन्नदान
कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी गरीब आणि गरजूंना अन्नदान करणे अत्यंत शुभ असते.
दुधाचे दान
कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी दुधाचे दान करणे अत्यंत शुभ आणि लाभदायक मानले जाते. दूध दान केल्याने कुटुंबातील लोकांच्या व्यवसायात प्रगती होते आणि पैशाची कमतरता कधीही भासत नाही.
वस्त्रदान
कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी वस्त्रदान देखील खूप शुभ मानले जाते. वस्त्रदान केल्याने व्यक्तीची आर्थिक स्थिती मजबूत होते.
गूळ
कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी गुळाचे दान शुभ मानले जाते. गुळाचे दान केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात. गुळाच्या दानाने दारिद्रय दूर होते आणि घरात सुख-समृद्धी राहते.
तीळ
कार्तिक पौर्णिमेला तिळाचे दान करावे. कारण तिळाचा संबंध भगवान शिव आणि शनिदेव यांच्याशी आहे. या दिवशी तिळाचे दान केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात.
याशिवाय कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी दही, तुप, साखर आणि तांदूळ दान केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते. तसेच चंद्राच्या स्थितीत तुम्हाला लाभही होतो. तुमची प्रगती आणि आर्थिक स्थितील समस्या देवी लक्ष्मीच्या कृपेने दूर होतात.
कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी काय करावे
कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली लक्ष्मीचा वास असतो अशी मान्यता आहे. त्यामुळे या दिवशी देवी लक्ष्मीचे ध्यान करुन पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावावा. तसेच घरात देवाजवळ तुपाचा दिवा लावून श्रीसुक्ताचे पठण करावे.
कार्तिक पौर्णिमेला गाईला हिरवा चारा खाऊ घालावा. तसेच गाईची सेवा करावी. गाईमध्ये सर्व देवी-देवतांचा वास असतो. त्यामुळे या दिवशी गाईची सेवा केल्याने सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद मिळतो.