Home » Karmanghat Hanuman Temple: चमत्कारी कर्मणघाट मंदिर

Karmanghat Hanuman Temple: चमत्कारी कर्मणघाट मंदिर

by Team Gajawaja
0 comment
Share

देशभरात भगवान हनुमानांना समर्पित अनेक जागृत आणि चमत्कारिक मंदिरे आहेत. प्राचीन वारसा लाभलेल्या या मंदिरांमध्ये हजारो भाविक दररोज आपल्या आराध्य भगवान हनुमानांच्या चरणी लीन होतात. अयोध्येतील हनुमान गढी, राजस्थानमधील सालासर बालाजी, मेहंदीपूर बालाजी, पटना येथील महावीर मंदिर आणि वाराणसीतील संकट मोचन मंदिर यांचा उल्लेख प्रामुख्याने केला जातो. मात्र त्याव्यतिरिक्तही अशी अनेक मंदिरे आहेत, ज्यांचा उल्लेख ऐतिहासिक घटनांमध्ये करण्यात येतो. अशा मंदिरांमध्ये हैदराबादमधील कर्मणघाट मंदिराचा समावेश होतो. क्रूरकर्मा औरंगजेबाने हिंदूंची अनेक मंदिरे उद्ध्वस्त केली. भगवान हनुमानांच्या या मंदिरालाही तोडण्याची त्याची इच्छा होती. मात्र या मंदिराच्या आवारात गेलेल्या औरंगजेबाला तिथे एक गूढ गर्जना ऐकू आली आणि तो तिथून घाबरून परत गेला, अशी कथा सांगितली जाते. या मंदिराशी संबंधित अनेक गूढ रहस्ये आजही सांगितली जातात. ( Karmanghat Hanuman Temple )

हैदराबादच्या चंपापेट येथील कर्मणघाट हनुमान मंदिरात दररोज अनेक भाविक दर्शनासाठी येतात. अनेक ऐतिहासिक कथांमध्ये या मंदिराचा उल्लेख आढळतो. हे मंदिर अंदाजे ८०० वर्षे जुने असून ते काकतीय राजवंशाशी संबंधित आहे. काकतीय राजवंशाचा राजा प्रोला दुसरा याने १२ व्या शतकात हे मंदिर बांधले, असे मानले जाते. याबाबत एक कथा सांगितली जाते. राजा प्रोला दुसरा एका झाडाखाली विश्रांती घेत असताना त्याला भगवान रामाच्या नावाचा जप ऐकू आला. घनदाट जंगलाच्या मध्यभागी रामनामाचा जप कोण करत आहे, हे पाहण्यासाठी त्याने शोध घेतला असता, त्याला बसलेल्या स्थितीत भगवान हनुमानाची दगडी मूर्ती आढळली. राजा ती मूर्ती राजधानीत घेऊन आला. त्यानंतर त्याच्या स्वप्नात हनुमान प्रकट झाले आणि मंदिर बांधण्याची सूचना दिली. कर्मणघाट मंदिरात ध्यानस्थ अवस्थेतील भगवान हनुमानांची जी प्रतिमा आहे, ती हीच मूर्ती असल्याचे मानले जाते. येथे अनेक भक्त शांतपणे ध्यानधारणा करतात.

पूर्वी या मंदिराला केवळ हनुमान मंदिर म्हणून ओळखले जात होते. मात्र औरंगजेबाने हे मंदिर पाडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा घडलेल्या कथित चमत्कारानंतर या मंदिराला ‘कर्मणघाट हनुमान मंदिर’ हे नाव प्राप्त झाले. ही कथा मुघल सम्राट औरंगजेबाच्या काळातील आहे. १७ व्या शतकात औरंगजेबाच्या सैन्याने गोलकोंडा किल्ला जिंकला. त्यानंतर दक्षिण भारतातील अनेक मंदिरे पाडण्यास सुरुवात झाली. औरंगजेबाला या हनुमान मंदिराबाबत माहिती मिळाल्यावर त्याने ते पाडण्याची आज्ञा दिली. मात्र मुघल सैन्यातील एकही सैनिक मंदिराभोवतीच्या भिंतीवर चढू शकला नाही. ही माहिती मिळाल्यावर औरंगजेब संतप्त झाला आणि मंदिराचा उंबरठा हातोड्याने तोडण्याची आज्ञा दिली. मुघल सैनिक हातोडे घेऊन उंबरठ्याजवळ पोहोचले, तेव्हा अचानक एक भयानक गर्जना झाली. त्या आवाजाने सैनिक घाबरले. स्थानिकांच्या कथेनुसार, त्या वेळी एक दैवी वाणीही झाली आणि औरंगजेबाला इशारा देण्यात आला. या सर्वामुळे औरंगजेब घाबरला आणि त्याचे सैन्यही मंदिरासमोरून परतले. औरंगजेब मंदिराच्या उंबरठ्यापासून मागे फिरला, त्यामुळे या घटनेनंतर मंदिराचे नाव कर्मणघाट हनुमान मंदिर असे पडले, असे सांगितले जाते. ( Karmanghat Hanuman Temple )

=======

हे देखील वाचा : Panchamukha Anjaneyar Temple: अलौकिक श्री पंचमुख अंजनेयर मंदिर

=======

औरंगजेबाच्या या कथेमुळे प्रसिद्ध असलेल्या कर्मणघाट मंदिरात आजही भाविक मोठ्या श्रद्धेने येतात. येथे प्रार्थना केल्यास आजारांपासून मुक्तता मिळते, असा भक्तांचा विश्वास आहे. येथे ४० दिवसांचा मंडळ विधी केल्याने आरोग्यात सुधारणा होते, असेही सांगितले जाते. दर मंगळवारी आणि शनिवारी होणाऱ्या विशेष आरतीला हजारो भक्त उपस्थित राहतात. या आरतीतून आध्यात्मिक शांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळते, असा भाविकांचा अनुभव आहे. कर्मणघाट मंदिर संकुलात भगवान राम, भगवान शिव, देवी सरस्वती, देवी दुर्गा, देवी संतोषी माता, भगवान वेणुगोपाल स्वामी आणि भगवान जगन्नाथ यांच्यासह इतर देवतांचीही मंदिरे आहेत. येथे रामनवमीपासून उत्सवांना सुरुवात होते आणि हनुमान जन्मोत्सवापर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. भारतभरातून हजारो भाविक या उत्सवात सहभागी होतात. ( Karmanghat Hanuman Temple )

– सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.