बॉलीवूडमध्ये एका रात्रीत कलाकारांचे नशीब चमकवणारा आणि बिघडवणारा गॅाडफादर जर कोणी असेल, तर करण जोहरचं (Karan Johar)नाव आठवल्यावाचून राहत नाही. त्याने सध्याच्या काळात अनेकांना पुढे आणलं… ज्यानंतर ‘नेपोटीझम’ हा शब्द सर्वज्ञात झाला. पण कधी आणि कोणते स्टारकिड्स सिनेसृष्टीत निव्वळ ‘करणमुळे’ आले हे तुम्हाला माहीत आहे काय ?
हिंदी चित्रपटसृष्टीत दिग्गज कलाकारांची मुले आपल्या आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत सिनेमात आपलं नशीब आजमावतात. गेल्या अनेक वर्षांपासून चित्रपटसृष्टीत ही परंपरा सुरु आहे. सध्या बॉलीवुडमध्ये अनेक दिग्गज कलाकारांच्या मुलांनी इंडस्ट्रीत पदार्पण केले आहे. पण करणच्या मदतीने….
अशी अनेक उदाहरणं आहेत ज्यात करण जोहरने त्याच्या सिनेमात आऊटसाईडर्सना संधी न देता फेमस सेलिब्रिटींच्या मुलांना संधी दिली आहे. करण जोहरने स्टारकिड्सना संधी दिली नसती तर कदाचित त्यांनाही स्ट्रगल करावे लागले असते. मात्र यात आघाडीवर आहे आलिया भट्ट. (Alia Bhatt) आलियाला करणने आपली मुलगीच मानले आहे. त्यामुळे ‘स्टुंटंड आफ द इयर’ सिनेमात तिला संधी मिळाली. आलिया भट्टच्या पहिल्या चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. आलियानेही मिळालेल्या संधीचे सोनं करत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. सिद्धार्थ मल्होत्रालाही करण जोहरनेच मदत केली.
करण जोहरच्या ‘माय नेम इज खान’ या चित्रपटात वरुण धवनने (Varun Dhawan) सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. यानंतर २०१२ मध्ये रिलीज झालेल्या ‘स्टुडंट ऑफ द इयर’ चित्रपटातून त्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. वरुण धवनने ‘बदलापूर’, ‘एबीसीडी’ 2, ‘दिलवाले’ यांसारख्या हिट चित्रपटात काम केले आहे. अनन्या पांडेने करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द ईयर 2’ या चित्रपटाद्वारे डेब्यू केला होता. या चित्रपटात तारा सुतारिया आणि टायगर श्रॉफ यांनी देखील काम केले होते. तारा सुतारियाने देखील हा चित्रपटाद्वारे डेब्यू केला होता. चित्रपटाला समीक्षक व प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता.
बोनी कपूर आणि श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूरने (Janhavi Kapoor) करण जोहरच्या ‘धडक’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. या चित्रपटात ईशान खट्टरही झळकला होता. ‘सैराट’ या सुपरहिट चित्रपटाचा ‘धडक’ रिमेक होता. ईशान खट्टर आणि जान्हवी कपूरची केमिस्ट्री रसिकांच्या पसंतीस पात्र ठरली होती. जान्हवी नुकतीच ‘गुंजन सक्सेना – द कारगिल गर्ल’ आणि ‘रुही’ चित्रपटामध्ये झळकली आहे.
सैफ अली खानची लेक सारा अली खान (Sara Ali Khan) हिच्या बॉलीवुड पदार्पणासाठी करण जोहनेच मेहनत घेतली होती. याता आता शाहरुख खानचा लेक आर्यन खान आणि सारा या दोघांना एकत्र घेऊन सिनेमा करण्याचीही केजोची इच्छा आहे. त्यामुळे साराचं हिंदी चित्रपटसृष्टीतील भविष्य उज्ज्वल असल्याचं म्हटल्यास वावगं ठरु नये.
अनेक स्टारकिड्स करणचे बोट पकडून या मनोरंजन विश्वात आले आहेत. यामुळे बहुतेक वेळेस करणला नेपोटीझमच्या मुद्दयांवरुन धारेवर धरलं जातं. अशा परिस्थितीत सैफ अली खानचा मुलगा ‘इब्राहिम अली खान’ला लाँच केले तर, करणला पुन्हा एकदा या टीका सहन कराव्या लागल्या असत्या. म्हणूनच हा वाद टाळण्यासाठी त्याने इब्राहिमला त्याच्या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम दिले आहे.
हे देखील वाचा: वैविध्यपूर्ण भूमिकांमधून प्रेक्षकांत ठसा उमटवणारी अनुष्का!
आणखी काही स्टारकिड्स आगामी काळात रूपेरी पडद्यावर एंट्री मारण्यासाठी सज्ज आहेत. आपल्या आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनयाचा वारसा पुढे नेण्यासाठी या यंग जनरेशनला करण जोहरनेच पुढाकार घेत आपल्या सिनेमात संधी देत ओळख मिळवून दिली. आणि याच कारणांमुळे तो अनेकदा ट्रोल होतो. बहुतेक वेळेस करणवर नेपोटीझमचा प्रचार केल्याचा आरोप केला जातो. सुशांत सिंह राजपूत आत्महत्येनंतर अनेकांनी करण जोहरवर नेपोटीझमचे आरोप लावले होते. यादरम्यान त्याला सोशल मिडियावरही बरेच ट्रोल केले गेले. त्यामुळे करणने काही दिवस सोशल मिडीयापासून दूर राहणे पसंत केले होते. त्यामुळे आरोपांमधून सुटण्यासाठी आता करण जोहर प्रयत्न करत आहे.
शब्दांकन – शामल भंडारे.