Home » कृष्णवर्णीय कमला हॅरिस

कृष्णवर्णीय कमला हॅरिस

by Team Gajawaja
0 comment
Kamala Haris
Share

कमला हॅरिस यांचे नाव अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षपदासाठी पुढे आले आणि अमेरिकेपेक्षा भारतातल्या काही नागरिकांना अधिक आनंद झाला. यासाठी कारण म्हणजे, कमला हॅरिस यांची भारतीय पार्श्वभूमी. कमला यांची आई ही भारताच्या तामिळनाडू राज्यातील आहे. शिक्षणासाठी अमेरिकेत गेलेल्या श्यामला गोपालन नंतर कृष्णवर्णीय डोनाल्ड हॅरिस यांच्या प्रेमात पडल्या. ब्राह्मण कुटुंबातील श्यामला यांनी डोनाल्डबरोबर विवाह केला. आणि अवघ्या नऊ वर्षात त्यांचा घटस्फोटही झाला. श्यामला यांनीच कमला आणि त्यांच्या बहिणीची सर्व जबाबदारी पार पाडली. पण कमला यांनी आपल्या वडिलांबरोबर कायम संबंध ठेवले. त्यामुळेच भारतात, आणि अमेरिकेतील भारतीय त्यांना भारतवंशी कमला, असे म्हणत असले तरी त्यांनी आपली ओळख कृष्णवर्णीय कमला हॅरिस अशीच कामय ठेवली. आणि हेच कारण त्यांच्या पराभवासाठी प्रमुख ठरलं, अशी चर्चा आहे. (Kamala Harris)

कारण अमेरिकेत भारतीयांची मते ही गेमचेंजर करणारी ठरली. या मतदारांमध्ये कमला हॅरिस या आपला प्रभाव टाकू शकल्या नाहीत. त्यातच त्यांनी काश्मिर संदर्भात कमला यांनी केलेले वादग्रस्त वक्तव्य आणि बांगलादेशमध्ये सुरु असलेल्या हिंदू अत्याचारांवर त्यांनी कुठलिही प्रतिक्रीया दिली नाही. या दोन्हीही गोष्टींमुळे अमेरिकेतील हिंदू समाजामध्ये कमला हॅरिस यांची लोकप्रियता कमी झाली. या सर्वांचाच परिणाम म्हणून कमला यांना पराभव स्विकारावा लागल्याची चर्चा सुरु झाली आहे. कमला हॅरिस यांची आई श्यामला गोपालन पासून त्यांचा हा प्रवास बघायला हवा. श्यामला या तामिळनाडू राज्यातील ब्राह्मण कुटुंबातील होत्या. अमेरिकेत त्या वयाच्या 19 व्या वर्षी शिक्षण घेण्यासाठी गेल्या. 1958 चा हा काळ होता. या काळात अमेरिकेत गोरे विरुद्ध काळे असे युद्ध सुरु होते. कृष्णवर्णींयांना अमेरिकेत हिन वागणूक मिळत होती. त्याविरुद्ध मोठं आंदोलन चालू होतं. याच वातावरणात श्यामला यांची ओळख जमैकन तरुण डोनाल्ड हॅरिसशी यांच्याबरोबर झाली. (International News)

अमेरिकेत तेव्हा भारतीयांनाही कृष्णवर्णींय संबोधण्यात येत होतं. त्यामुळे श्यामला आणि डोनाल्ड यांची मैत्री लवकर झाली. दोघंही आंदोलनात हिरारीनं भाग घेत असत. यातूनच या मैत्रीचे रुपांतर प्रेमामध्ये झाले आणि नंतर दोघांनीही लग्न केले. लग्नानंतर श्यामला कायमस्वरुपी अमेरिकेत स्थायिक झाल्या. त्यांना 20 ऑक्टोबर 1964 रोजी कॅलिफोर्नियामधील ऑकलंड येथे कमला ही मुलगी झाली. कमलाच्या जन्मानंतर तीन वर्षांनी माया या आणखी एका बहिणीचा जन्म झाला. दोन मुलींच्या जन्मानंतर श्यामला आणि डोनाल्ड यांच्यातील वाद पराकोटीला गेले आणि त्यांचा घटस्फोट झाला. यावेळी कमला फक्त 7 वर्षांची होती. या दोन मुलींचा ताबा मिळवण्यासाठी श्यामला यांना दोन वर्ष तरी कोर्टात लढा द्यावा लागला. कमला यांचे शिक्षण खडतर परिस्थितीत झाले. कारण कृष्णवर्णीय म्हणूनच त्यांची ओळख होती. तेव्हा अमेरिकेत कृष्णवर्णींयाना चांगल्या शाळेत प्रवेश मिळत नसे. या सर्वांवर मात करीत कमला आणि त्यांच्या बहिणीचे शिक्षण सुरु झाले. वयाच्या 12 व्या वर्षी त्यांची आई नोकरीनिमित्त कॅनडाला गेली, आणि कमलांही कॅनडाला रवाना झाल्या. कॅनडामध्ये शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर, कमलाने हॉवर्ड विद्यापीठात प्रवेश घेतला. हार्वर्डमधून राज्यशास्त्रात पदवी घेतल्यानंतर कमला यांनी कोलंबिया विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. (Kamala Harris)

1990 मध्ये, त्या कॅलिफोर्नियाच्या स्टेट बार कौन्सिलमध्ये सामील झाल्या. 1994 मध्ये त्यांची भेट 60 वर्षीय विली ब्राउनशी झाली. त्यावेळी ते कॅलिफोर्निया विधानसभेचे अध्यक्ष होते. कमला त्यावेळी 30 वर्षांच्या होत्या. या भेटीचे नंतर प्रेमात रुपांतर झाले. विली यांच्याबरोबरच्या नात्यानं त्यांच्यावर अनेकांनी टिका केली. 2020 मध्ये कमला उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवार म्हणून निवडून आल्यावरही या नात्यासंदर्भात त्यांना मोठ्या टिकेला सामोरे जावे लागले. त्यानंतर कमला यांच्या आयुष्यात सेलिब्रिटी अँकर मोंटेल विल्यम्स यांची एन्ट्री झाली. या नात्यावरही मोठ्या प्रमाणात टिका झाली. त्यानंतर कमला यांच्या आय़ुष्यात घटस्फोटीत डग्लस एमहॉफ यांची एन्ट्री झाली. डग्लस हे व्यवसायाने वकील आहेत. एक वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांनी 2014 मध्ये लग्न केले. कमलाला स्वतःची मुले नाहीत. यावरूनही विरोधक त्यांच्यावर हल्लाबोल करत आहेत. वकील म्हणून काम करतांना कमला यांनी लढवलेल्या अनेक खटल्यांवरही अमेरिकन नागरिकांनी टिका केली आहे. कमला हॅरिस यांनी 2016 मध्ये निवडणुकीच्या राजकारणात प्रवेश केला. त्याचवेळी डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले होते. सिनेटवर निवडून आलेल्या त्या दुसऱ्या कृष्णवर्णीय महिला ठरल्या. (International News)

====

हे देखील वाचा : सूरमयी शाम आणि शेतक-याचा लढा !

====

खासदार बनल्यानंतर अवघ्या दोन वर्षांनी कमला हॅरिस यांनी 2019 मध्ये अध्यक्षपदाच्या शर्यतीत सामील होण्यासाठी आपले नाव पुढे केले. मात्र त्यांचा जो बिडेन यांनी पराभव केला. अर्थात त्याच बिडेन यांनी नंतर कमला यांचे नाव उपाध्यक्षपदासाठी पुढे केले. 2020 मध्ये बिडेनच्या विजयानंतर, कमला हॅरिस अमेरिकेच्या इतिहासातील पहिल्या कृष्णवर्णीय महिला उपराष्ट्रपती म्हणून निवडून आल्या. राजकारणात प्रवेश केल्यानंतर 7 वर्षांच्या आत त्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार ठरल्या. निवडणुकीची घोषणा झाल्यापासून कमला यांचे पारडे जड असल्याच्या बातम्या येत होत्या. अमेरिकेतील सोशल मिडीयामध्येही कमला हॅरिस यांचीच हवा होती. मात्र सभा सुरु झाल्यावर कमला यांच्याकडे कुठलेही मुद्दे नसल्याचे स्पष्ट झाले. तसेच बिडेन यांच्याच धोरणांना त्यांनी पुढे केले. चर्चांमध्ये तर त्या कुठल्याही प्रश्नावर उत्तर देतांना अडखळत राहिल्या. भाषणांमध्ये टेलिप्रिंटरचा त्यांनी केलेला वापर हा हास्याचा विषय ठरला. एकूण फक्त भारतीय म्हणून त्यांच्या उमेदवारीचे भारतामध्ये स्वागत झाले तरी, त्या अमेरिकन राष्ट्रध्यक्षपदाचा भार वाहू शकण्यासाठी सक्षम नाहीत, असे त्यांचे स्वकीयच म्हणू लागले होते. यातच त्यांच्या पराभवाची बीजे रोवली गेली. (Kamala Harris)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.