महाकुंभमेळा प्रयागराज येथे 13 जानेवारी 2025 पासून सुरु होत आहे. मात्र त्याआधीपासून प्रयागराजमध्ये भाविकांची तोबा गर्दी सुरु झाली आहे. हिंदू धर्मात महाकुंभमेळा हा फक्त उत्सव नसून तर तो मोक्षप्राप्तीचा मार्गही आहे. त्यामुळेच या कुंभमेळ्याला अनुसरुन अन्यही अनेक प्रकारच्या आराधना करण्यात येतात. त्यामध्ये महत्त्वाचे आहे, कल्पवास. कल्पवास म्हणजे संगमाच्या तीरावर राहून वेदांचे अध्ययन आणि मनन करणे. कल्पवास करण्यासाठी प्रयागराज हे सर्वोत्तम तिर्थ असल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे यावेळी प्रयागराजला होत असलेल्या महाकुंभमेळ्यात कल्पवास ही कठिण आराधना करणा-या भाविकांची संख्या मोठी राहणार आहे. ही एक विशिष्ट तपश्चर्या असून त्यामध्ये भाविक विशेष नियमांचे पालन करून महिनाभर संगमतीरावर राहतात. (Maha Khumbh Mela )
कल्पवास ही हिंदू धर्मातील शतकानुशतके चालत आलेली जुनी परंपरा आहे. माघ आणि कुंभमेळ्यात याचे विशेष महत्त्व मानले जाते. कल्पवास ही मानवी शुद्धीची प्रक्रीयाही मानली जाते. यावेळी अत्यंत कठिण नियम पालन केले जातात. वातावरण कसेही असले तरी संगमतीरावर अंघोळ करणे आणि विशिष्ट धान्याचा आहार करणे बंधनकारक असते. शिवाय रात्रीची निद्राही गवताच्या बिछान्यावर घ्यावी लागते. यातून साधकाचे आत्मिक आणि धार्मिक बळ वाढत असल्याची मान्यता आहे. प्रयागराजच्या संगम तीरावर 13 जानेवारीपासून महाकुंभाचा महान उत्सव सुरू होत आहे. यामुळे आत्तापासून या संगमतिरावर भक्तांचा मेळा जमायला सुरुवात झाली आहे. त्यात कल्पवास करणा-या भक्तांची मोठी गर्दी आहे. कल्पवास माघ महिन्यापासून सुरू होईल आणि माघी पौर्णिमेपर्यंत चालेल. यात सामिल होणारे भाविक प्रापंचिक आसक्ती सोडून एक महिना कठोर व्रत करणार आहेत. पौष महिन्याच्या 11 व्या दिवसापासून माघ महिन्याच्या 12 व्या दिवसापर्यंत कल्पवास सुरू होतो. असे मानले जाते की सूर्याच्या मकर राशीत प्रवेश केल्यापासून सुरू होणारा एक महिन्याचा कल्प एका कल्पाएवढे पुण्य देतो, जे ब्रह्मदेवाच्या एका दिवसाच्या बरोबरीचे असते. (Social News)
त्यामुळेच या दिवसात भाविक संगम तिरावर जमतात आणि हे कठिण व्रत आनंदानं साजरे करतात. यासाठी आलेले भाविक गंगेच्या काठावर उभारलेल्या तंबूत राहतात. ते दिवसभर गंगा मातेची पूजा करतात. तसेच वेद, उपनिषदांचा अभ्यास करतात. कल्पवास केल्याने कुटुंबात सुख-शांती सोबतच माणसाला जन्म-मृत्यूच्या बंधनातून मुक्ती मिळते, अशीही धारणा आहे. कल्पवास केल्यास मोक्षप्राप्ती मिळते, अशीही धारणा असल्यामुळे संगमतीरावर मोठ्याप्रमाणात कल्पवास करायला भाविक येतात. ही पंरपंरा शतकानुशतके चालत असल्यामुळे या भागातील पुजारी यासाठी रहाण्याची व्यवस्था करतात. भाविकांना राहण्यासाठी साधे तंबू उभारण्यात येतात. त्यात गवताचा बिझाना आणि अत्यंत कमी सुविधा असतात. यात राहून कल्ववास करणारे भाविक दिवसातून तीनवेळा गंगास्नान करतात. या दिवसात कडाक्याची थंडी असली तरीही या कल्ववास करणा-या भाविकांना दिवसातून तीनवेळा स्नान करणे बंधनकारक असते. (Maha Khumbh Mela )
========
हे देखील वाचा : महाकुंभ आणि आखाडे
========
या भाविकांना एकाच प्रकारचे धान्य खावे लागते. कल्पवासियांनाही रोज भजन, कीर्तन करावे लागते. यासोबतच गरजूंना दानधर्मही करावा लागतो. संपूर्ण माघ महिना विधीपूर्वक पूजा करुन देवतांच्या प्रती आभार व्यक्त केले जातात. कल्पवासात, पहिल्याच दिवशी भाविक त्यांच्या तंबूजवळ बार्ली आणि तुळशीचे रोप लावतात. कल्पवासाच्या शेवटच्या दिवशी या तुळशीला भाविक आपल्या घरी घेऊन येतात. महाभारतामध्येही या कल्पवास व्रताचे महत्त्व सांगितले आहे. महाभारतानुसार शंभर वर्षे अन्न न खाता तपश्चर्या केल्याने जे पुण्य प्राप्त होते तेवढेच पुण्य केवळ माघ महिन्यात कल्पवासाने केले जाते. या काळात स्वच्छ पांढरे किंवा पिवळ्या रंगाचे कपडे घालणे चांगले मानले जाते आहे. शास्त्रानुसार, कल्पवासाचा किमान कालावधी एक रात्रही असू शकतो. कल्पवास तीन रात्री, तीन महिने, सहा महिने, सहा वर्षे, 12 वर्षे किंवा संपूर्ण आयुष्यभर करता येतो. ब-याचवेळा कल्पवास करणा-यांमध्ये वृद्ध भाविकांचा समावेश असतो. त्यामुळे त्यांची प्रकृती बघूनच कल्पवासाचा कालावधी कसा आणि किती असावा याचा सल्ला दिला जातो. असे मानले जाते की, कल्पवासाचे पालन केल्याने शरीराची संपूर्ण शुद्धी होते. त्यामुळेच आत्ताही होणा-या या कल्पवासाचे व्रत करण्यासाठी प्रयागराज येथे मोठ्याप्रमाणात भाविकांची गर्दी होत आहे. (Social News)
सई बने