हिंदू धर्मात अनेक देवतांची पूजा करण्यात येते. त्यापैकीच एक म्हणजे, भगवान कालभैरव. भगवान शंकराचा उग्र अवतार म्हणून भगवान कालभैरवांची पूजा करण्यात येते. याच भगवान कालभैरवांचे जागृत मंदिर वाराणसी येथे आहे. काशीची यात्रा या कालभैरव मंदिरात गेल्याशिवाय पूर्ण होत नाही, असे मानतात. याच कालभैरव मंदिरात कालभैरव जयंतीसाठी विशेष तयारी सुरु करण्यात आली आहे. भगवान कालभैरवांचा जन्म मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला झाला असा उल्लेख हिंदू पौराणिक ग्रंथात आहे. हा दिवस काल भैरव अष्टमी म्हणून साजरा केला जातो. यावर्षी अष्टमी तिथी 22 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6. 7 पासून सुरू होणार असून दुसऱ्या दिवशी 23 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 7.56 पर्यंत असणार आहे. (Kal Bhairav Mandir)
यामुळे वाराणसीच्या कालभैरव मंदिरात कालाष्टमीचा उत्सव दोन दिवस साजरा होणार आहे. यावेळी मंदिरात लाखो भक्तांची गर्दी होते. या भक्तांसाठी मंदिर परिसरात अनेक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या असून मंदिराची सजावट करण्यात येत आहे. मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात येत असून परिसरात मोठ्या संख्येनं साधूसंत येऊ लागले आहेत. सनातन धर्म ग्रंथानुसार कालभैरव हे भगवान भोलेनाथांचे उग्र रूप मानले जाते. काल भैरवांना दंडपाणी असेही म्हटले जाते. तसेच भगवान कालभेरव तंत्र-मंत्र आणि भ्रामक शक्तींचे स्वामी म्हणूनही परिचित आहेत. काशीमध्ये कालभैरव यांना काशीचे कोतवाल म्हणून मान दिला जातो. काशीच्या कोतवालाची आज्ञा घेऊनच भगवान विश्वनाथाचे दर्शन घेता येते. अशा कालभैरवाची जयंती दरवर्षी उत्साहात साजरी करण्यात येते. पुढच्या वर्षी प्रयागराज येथे महाकुंभ होत आहे. त्यामुळे आत्तापासून काशी आणि प्रयागराज येथे साधू महतांची वर्दळ वाढली आहे. जानेवारी महिन्यातील संक्रातीपासून सुरु होणा-या महाकुंभला येण्याआधी भाविकांना काशीमध्ये गर्दी केली आहे. याचवेळी आलेल्या या कालभैरव जयंतीसाठी मोठी गर्दी होणार असल्याचा प्रशासनाचा अंदाज आहे. (Social News)
त्यामुळे कालभैरव मंदिर परिसरात प्रशासनानं या लाखो भक्तांची गैरसोय होणार नाही, अशा पद्धतीनं तयारी सुरु केली आहे. कालभैरव जयंतीच्या दिवशी कालभैरवाची भक्तिभावाने पूजा करणाऱ्या व्यक्तीला अकाली मृत्यू होत नाही आणि स्वतः भगवान शिवाचा आशीर्वाद त्याच्यावर राहतो. अशी भक्तांची धारणा आहे. त्यामुळे या दिवशी मोठी गर्दी कालभैरव मंदिरात होते. वाराणसी येथील काल भैरव मंदिर हे सर्वात जुने मंदिर म्हणून परिचीत आहे. खुद्द भगवान शंकराने कालभैरवांना क्षेत्रपाल म्हणून नियुक्त केल्याची आख्यायिका आहे. मंदिराच्या गाभा-यात कालभैरवाची चांदीची मूर्ती आहे. कालभैरवाचे वाहन म्हणजे कुत्रा आहे. त्याचाही मान मंदिरात ठेवला जातो. या कालभैरव मंदिरात पूजा केल्याशिवाय वाराणसीची यात्रा पूर्ण होत नाही. हे कालभैरव मंदिर 17 व्या शतकातील आहे, असे सांगितले जाते. यापूर्वीही येथे मंदिर होते. पण ते प्राचीन मंदिर उत्तर भारतावरील इस्लामी राज्यकर्त्यांनी नष्ट केले. त्यानंतर 17 व्या शतकात पुन्हा मंदिर बांधले गेले असे मानले जाते. (Kal Bhairav Mandir)
======
हे देखील वाचा : वैकुंठ चतुर्दशीचे महात्म्य, महत्व आणि आख्यायिका
====
माता सतीच्या शरीराचे रक्षण करण्यासाठी भगवान शंकरांनी कालभैरवांना काशीचे क्षेत्रपाल म्हणून नियुक्त केले अशीही आख्यायिका आहे. माता सतीच्या शरीराचा एक भाग “पिंड” च्या रूपात काशीत पडला. हे मातेच्या 51 शक्तीपीठांपैकी एक मंदिर असून या मंदिराला विशालाक्षी मंदिर म्हणून ओळखले जाते. कालभैरव मंदिर संकुलात इतर लहान मंदिरेही आहेत. काशी विश्वनाथ मंदिरापासून 1 किमी अंतरावर असलेल्या या मंदिरात आता कालभैरव जयंतीची जोरात तयारी सुरु आहे. याशिवाय आणखी एक कालभैरव मंदिर भाविकांमध्ये प्रसिद्ध आहे. हे मंदिर मध्यप्रदेशमधील खरगोनमध्ये आहे. या मंदिर परिसराला मिनी बंगाल म्हणूनही ओळखले जाते. कारण कालभैरव जयंतीनिमित्त येथे देशभरातून अनेक तांत्रिकही गर्दी करतात. भगवान काल भैरव यांना तंत्रविद्येचा देव म्हणूनही ओळखले जाते. बाबा काळभैरव जयंतीनिमित्त भैरव मंदिरांमध्ये विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या सोहळ्यासाठी आठवडाभर आधीच कालभैरवाचे उपासक उपस्थित रहातात. या मंदिराची स्वच्छता आणि सजावट करण्यासाठीही याच भाविकांचा पुढाकार असतो. 22 आणि 23 नोव्हेंबरच्या या कालभैरव जयंतीसाठी खरगोनमधील या मंदिराचाही मोठी सजावट करण्यात आली आहे. (Social News)
सई बने