Home » kailash Mansarovar : चलो कैलास !

kailash Mansarovar : चलो कैलास !

by Team Gajawaja
0 comment
kailash Mansarovar
Share

प्रयागराजमध्ये जगभरातील हिंदू धर्मियांसाठी पूजनीय असा महाकुंभ 2025 सुरू असतानाच आणखी एक आनंदाची बातमी आली आहे. हिंदू धर्मियांसाठी भगवान शंकराचे स्थान हे सर्वोच्च आहे, याच भगवान शंकराचे निवासस्थान असलेल्या कैलास मानसरोवर यात्रेला पाच वर्षापासून चीननं अटकाव केला होता. मात्र आता भारत आणि चीन यांच्यातील तणाव दूर झाल्यामुळे चीननं ही पवित्र कैलास मानसरोवर  यात्रा सुरु करण्यास परवानगी दिली आहे. भारत आणि चीनमधील परराष्ट्र सचिव-उपपरराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. (kailash Mansarovar)

यानुसार आता भारत आणि चीनमध्ये थेट विमासेवाही सुरु होत असून कैलास मानसरोवर यात्रेचा मार्ग खुला करण्यात येईल. 5 वर्षानी ही यात्रा सुरु होणार असल्यामुळे आनंद व्यक्त होत आहे. कैलास मानसरोवर यात्रा ही प्रत्येक शिवभक्तासाठी पूजनीय अशी असते. प्रत्यक्ष भगवान शंकर आणि माता पार्वतीचे निवासस्थान म्हणून कैलास पर्वताकडे बघितले जाते. या कैलास यात्रेसाठी चीनची परवानगी आवश्यक असते. मात्र 2020 पासून भारत आणि चीन यांच्यातील तणावामुळे कैलास मानसरोवर यात्रा आणि विमान सेवा बंद होती. दोन्ही देशांच्या सीमेवर वाढलेला तणाव आणि त्यातच आलेली कोविडची महामारी यामुळे शिवभक्तांना कैलास दर्शन दुर्लभ झाले होते. (International News)

मात्र आता या दोन्ही देशांच्या सीमेवरील तणाव कमी झाला आहे. त्यामुळे दोन्ही देशांच्या राजनैतीक अधिका-यांनी एकत्र येत अनेक निर्णय घेतले, त्यातीलच कैलास मानसरोवर यात्रेचा निर्णय प्रमुख आहे. शिवाय 2025 हे वर्ष भारत आणि चीनमधील राजनैतिक संबंधांच्या स्थापनेचे 75 वे वर्ष आहे. त्यामुळे या दोन्ही देशांनी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. कैलास मानसरोवरचा बहुतांश भाग तिबेटमध्ये आहे. चीन तिबेटवर आपला हक्क सांगतो. त्यामुळे येथे जाण्यासाठी चीनची परवानगी आवश्यक असते. 2020 पूर्वी, दरवर्षी सुमारे 50 हजार हिंदू भाविक भारत आणि नेपाळ मार्गे धार्मिक तीर्थयात्रेसाठी येथे येत असत. 2020 पासून चीनने भारतीयांना कैलास मानसरोवरला जाण्याची परवानगी देणे बंद केले. कैलास यात्रेबाबात भारत सरकारनं चीनसोबत 2013 आणि 2014 मध्ये असे दोन करार केले होते. मात्र चीननं या करारांना नकार दिल्यामुळे भारतातील शिवभक्तांची घोर निराशा झाली होती. (kailash Mansarovar)

त्यानंतर कैलासयात्रेसाठी उत्तराखंडमधील व्यास खोऱ्यातून भाविक कैलास पर्वताला भेट देत होते. कैलास उत्तराखंड पर्यटन विभाग, सीमा रस्ते संघटना आणि इंडो-तिबेटी सीमा पोलिस या अधिकाऱ्यांच्या पथकाने कैलास पर्वताचे स्पष्टपणे दृश्यमान स्थान शोधून काढले होते. 3 ऑक्टोबर 2024 रोजी पहिल्यांदाच, जुन्या लिपुलेख खिंडीतून भारतीय हद्दीतून पवित्र कैलास पर्वत दिसला. हे स्थान उत्तराखंडमधील पिथोरागड जिल्ह्यातील व्यास खोऱ्यात वसलेले आहे. त्यामुळे तिथपर्यंत कैलास यात्रा सुरु झाली आहे. मात्र असे असले तरी कैलाससह मानसरोवर यात्रा सुरु करण्यासाठी भारताकडून प्रयत्न करण्यात येत होते. आता त्या प्रयत्नांना यश आले असून पुढच्या महिन्यातच ही यात्र सुरु होण्याचे संकेत मिळाले आहेत. कैलास मानसरोवरची यात्रा उत्तराखंड, सिक्कीम आणि तिबेटमधून जाते. या प्रवासाच्या सुरक्षेची जबाबदारी इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिसाची असते. (International News)

===============

हे देखील वाचा : Donald Trump : ऑर्डर टू डिपोर्ट

Donald Trump : पुतिनच्या वाटेवर ट्रम्प !

===============

कुमाऊँ मंडळ विकास निगम आणि सिक्कीम पर्यटन विकास महामंडळातर्फे या यात्रेचे नियोजन केले जाते. या यात्रेला जाणा-या भाविकांची फिटनेस चाचणी ‘दिल्ली हार्ट अँड लंग इन्स्टिट्यूट’ कडून केली जाते. यासाठी सुरुवातीला परराष्ट्र मंत्रालयाच्या वेबसाइटवर ऑनलाइन नोंदणी करावी लागते. ही संपूर्ण यात्रा 25 दिवसांसाठी असते आणि त्यासाठी 3 लाखांपर्यंत खर्च अपेक्षित असतो. या यात्रेसाठी जाण्याची इच्छा असलेल्यांसाठी फिटनेस हा मुख्य मुद्दा असतो. जर यात्रेमध्ये कुठल्याही भाविकाची तब्बेत खराब झाली तर त्यांना पुन्हा माघारी पाठवले जाते. परराष्ट्र मंत्रालयाच्या वेबसाइटवर कैलास मानसरोवर यात्रेचे बुकींग करता येते. या यात्रेत किती खर्च येणार आहे, चीनच्या हद्दीमध्ये गेल्यावर किती रक्कम खर्च करायची असते, याचीही सविस्तर माहिती या वेबसाईटवर देण्यात आलेली आहे. या खर्चात प्रवास खर्च, जेवण, सामानाची वाहतूक, घोड्याचे भाडे आदी सर्वांचा समावेश असतो. आता या वेबसाईटवर नव्यानं कैलास मानसरोवर यात्रेची नोंदणी करण्यात येणार आहे. (kailash Mansarovar)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.