Home » Kiswah Epstein Scandal : काबाचा ‘किस्वा’ आणि एपस्टाईन

Kiswah Epstein Scandal : काबाचा ‘किस्वा’ आणि एपस्टाईन

by Team Gajawaja
0 comment
Share

जेफ्री एपस्टाईन प्रकरणात सध्या रोज नवे खुलासे होत आहेत. मात्र आता जो नवीन खुलासा झाला आहे, त्यामुळे अमेरिकेसह मुस्लिम देशांमध्येही खळबळ उडाली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या ईमेलनुसार, इस्लामचे सर्वात पवित्र स्थळ काबाला झाकणारा किस्वा नावाचा पवित्र कपडा सौदी अरेबियाहून जेफ्री एपस्टाईनला पाठवण्यात आला होता. अमिराती व्यावसायिक महिला अझीजा अल-अहमदी यांचे यासंदर्भात नाव पुढे आले आहे. यामध्ये एका इस्रायली गुप्तहेराचेही नाव आल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, एपस्टाईनकडे जेव्हा हा पवित्र किस्वा पाठवण्यात आला, तेव्हा त्याच्यावर लैंगिक गुन्हेगार, हा आरोप सिद्ध झाला होता. ( Kiswah Epstein Scandal )

एपस्टाईनला पहिल्यांदा तुरुंगवास झाला, त्यानंतर या पवित्र कापडाचे तुकडे सौदी अरेबियाहून फ्लोरिडाला एपस्टाईनच्या घरी पाठवण्यात आल्याचे आता उघड झाले आहे. त्यामुळे एपस्टाईन प्रकरणाची मुळं कुठपर्यंत पसरली आहेत, याची कल्पना येऊ शकते. अमेरिकेच्या न्याय विभागाने ३० जानेवारी रोजी, जेफ्री एपस्टाईनच्या तपासाशी संबंधित जवळजवळ ३ दशलक्ष पानांची कागदपत्रे, २००० व्हिडिओ आणि १८०,००० छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. यातून अमेरिका, युरोपमधील नेते, प्रशासकीय अधिकारी, राजघराण्यातील सदस्य, अभिनेते, व्यावसायिक या सर्वांच्या चेह-यावरील बुरखा फाटला आहे.

मात्र आता याच जेफ्री एपस्टाईन फाईलमध्ये इस्लाममधील सर्वात पवित्र स्थळ असलेल्या काबा येथील पवित्र कापड एपस्टाईनला पाठवण्यात आल्याचे उघड झाल्यानं खळबळ उडाली आहे. एपस्टाईन फाइल्सनुसार २०१७ मध्ये काबाच्या पवित्र किस्वाशी संबंधित काही भाग अमेरिकेत पाठवण्यात आले होते. हे पवित्र तुकडे थेट एपस्टाईनच्या घरी पोहोच करण्यात आले होते. उपलब्ध ईमेल रेकॉर्डमध्ये यूएईमधील संपर्क, हवाई मालवाहतूक आणि सीमाशुल्क प्रक्रियांचा उल्लेख असल्यामुळे एपस्टाईनच्या आंतरराष्ट्रीय नेटवर्कबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. कागदपत्रे आणि ईमेलनुसार, संयुक्त अरब अमिराती मधील महिला व्यावसायिक अजीजा अल-अहमदी यांचा पवित्र कापडाची एपस्टाईनला डिलिव्हरी करण्यात सहभाग होता. ( Kiswah Epstein Scandal )

अहवालानुसार, फेब्रुवारी ते मार्च २०१७ दरम्यान अजीजाने एपस्टाईनसाठी किस्वाचे तीन तुकडे ऑर्डर केले होते. ही ऑर्डर ब्रिटिश एअरवेजद्वारे सौदी अरेबियाहून फ्लोरिडाला, एपस्टाईनच्या घरी पाठवण्यात आली. मार्च २०१७ मध्ये एपस्टाईनच्या घरी हे पवित्र कापडाचे तुकडे पोहोचही झाले होते. हे लक्षात घ्यायला हवे की, यावेळी एपस्टाईनने त्याची शिक्षा पूर्ण केली होती आणि त्याची लैंगिक गुन्हेगार म्हणून नोंदणी करण्यात आली होती. त्यातही उपलब्ध असलेल्या ईमेलमध्ये कस्टम प्रक्रिया सुलभ करण्यासाठी या कापडाचे वर्णन “कलाकृती” म्हणून करण्यात आले होते.

ही सर्व बाब उघड झाल्यामुळे व्यावसायिक अजीजा अल-अहमदी या अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण किस्वाचे महत्त्व मुस्लिम देशात अनन्य साधारण आहे. अशात हे पवित्र कापड एका लैंगिक गुन्ह्याखाली शिक्षा भोगलेल्या गुन्हेगहाराला भेट देणे हाही एक गुन्हा ठरणार आहे. त्यामुळे याबाबत आता अजीजा यांच्यावर काय कारवाई होणार याकडे लक्ष लागले आहे. अझीझा आणि एपस्टाईनमध्ये या किस्वाच्या संदर्भात ईमेलही झाल्याचे उघड झाले आहे. त्यात अझीझा यांनी एपस्टाईन याला किस्वाचे महत्त्व सांगितले होते. किमान १ कोटी मुस्लिमांनी या काळ्या कापडाच्या तुकड्याला स्पर्श केला असल्याचेही नमूद केलेले आहे. ( Kiswah Epstein Scandal )

=======

हे देखील वाचा : Epstein Files : हमाम मे सब नंगे… एपस्टाईन फाईल्सनं पुन्हा खळबळ

=======

कागदपत्रांनुसार, अझीझा आणि एपस्टाईन जवळचे मित्र होते. सप्टेंबर २०१७ मध्ये जेव्हा इरमा चक्रीवादळाने एपस्टाईनच्या खाजगी बेटाला उद्ध्वस्त केले तेव्हा अझीझाने त्याच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी अनेक संदेश पाठवले आहेत. दरवर्षी काबा येथे एक नवीन किस्वा अर्पण केला जातो. जुना किस्वा कधीही फेकून दिला जात नाही, कारण त्यात सोन्या-चांदीच्या धाग्यांनी भरतकाम केलेले कुराणातील श्लोक आहेत. इस्लामिक लँडमार्कनुसार, किस्वा नंतर लहान तुकड्यांमध्ये कापला जातो, ज्यामुळे सोने आणि चांदीचे धागे वेगळे होतात. हे तुकडे नंतर मुस्लिम देश, वरिष्ठ व्यक्ती, इस्लामिक संस्था, संग्रहालये आणि पाहुण्यांना भेट म्हणून दिले जातात. समस्त मुस्लिम समाजामध्ये या किस्वाचे महत्त्व मोठे आहे. हे कापड शुद्ध रेशमी कापडापासून बनवलेले असते. आता हेच किस्वा एपस्टाईनच्या घरी पाठवण्यात आल्याचे उघड झाले आहे. ( Kiswah Epstein Scandal )

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.