तेलंगणा चे मुख्यमंत्री आणि तेलंगणा राष्ट्रीय समितीचे अध्यक्ष के. चंद्रशेखर राव (K. Chandrashekhar Rao) यांनी नुकतीच मुंबईला भेट देऊन राज्यातील महाविकास आघाडीचे प्रणेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्री शरद पवार तसेच मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी ‘तिसऱ्या आघाडी’बाबत चर्चा केली. केंद्रातील भाजप सरकारविरुद्ध विशेषतः पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या विरोधात काँग्रेस पक्ष वगळता इतर सर्व राज्यातील प्रादेशिक पक्षांनी एकत्र येऊन ‘तिसरी आघाडी’ स्थापन करावी यासाठी के. चंद्रशेखर राव गेल्या काही दिवसांपासून प्रयत्नशील आहेत. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी देखील काही दिवसापूर्वी पं. बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांना मुंबईत बोलावून तिसऱ्या आघाडीची संकल्पना मांडली होती. आता तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K. Chandrashekhar Rao) यांनीं देखील शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यामुळे या तिसऱ्या आघाडीला चालना मिळू शकेल असे प्रथमदर्शनी तरी वाटते.
गेल्या काही दिवसांपासून के. चंद्रशेखर राव यांचा मोदी-विरोध हा जाहीरपणे प्रकट होतो आहे. ईडी, सीबीआय यासारख्या केंद्रीय संस्थांचा मोदी सरकार विरोधकांविरुद्ध हेतुपुरस्सर दुरुपयोग करीत आहे असा त्यांचाही गंभीर आरोप आहे. याचा अर्थ त्यांनाही त्याचा अनुभव आलेला असावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्यायाने भाजपाला विरोध करण्यासाठी महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या महाविकास आघाडीचा प्रयोग नाही म्हटले तरी चांगलाच यशस्वी होताना दिसत आहे. हा प्रयोग तूर्तास महाराष्ट्रापुरताच असला तरी देशपातळीवर देखील अशीच महाआघाडी स्थापन करून भाजपाला विरोध करता येईल अशी कल्पना सर्वप्रथम शरद पवार यांनीच मांडली होती आता ती के. चंद्रशेखर राव (K. Chandrashekhar Rao) यांनीही उचलून धरली असल्याचे त्यांच्या नुकत्याच पार पडलेल्या मुंबई भेटीवरून दिसून आले.
अर्थात या ‘तिसऱ्या आघाडी’त काँग्रेसनेही सामील व्हावे अशी शरद पवार यांची इच्छा आहे. त्यासंदर्भात त्यांनी ममता बॅनर्जी यांनाही त्यांच्या मुंबई भेटीत काँग्रेसचे महत्व पटवून दिल्याचे वृत्त होते. के. चंद्रशेखर राव (K. Chandrashekhar Rao) यांना मात्र काँग्रेस वगळून भाजपाविरोधात इतर सर्व प्रादेशिक पक्षांची मोट बांधायची आहे. यासंदर्भात त्यांनी यापूर्वीच द्रमुकचे अध्यक्ष आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री के. स्टालिन यांच्याशीही चर्चा केली होती परंतु काँग्रेस आणि द्रमुक यांचे असलेले मैत्रीसंबंध लक्षात घेता स्टालिन यांनी त्यांना फारसा प्रतिसाद दिला नसावा असे दिसते. तृणमूल काँग्रेस (बंगाल) आणि समाजवादी पार्टी (उत्तर प्रदेश) या पक्षांशीही काँग्रेसचे तसे चांगले संबंध आहेत शिवाय सध्या महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमुळे शिवसेनाही यापुढे काँग्रेसचे समर्थन करणार यात शंका नाही त्यामुळे के. चंद्रशेखर राव (K. Chandrashekhar Rao) यांचा काँग्रेस वगळून तिसऱ्या आघाडीचा प्रयोग कसा यशस्वी करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
वास्तविक, के. चंद्रशेखर राव (K. Chandrashekhar Rao) हे तसे मूळ काँग्रेसचेच. आंध्र प्रदेशचे विभाजन करून आंध्र प्रदेश आणि तेलंगणा ही दोन स्वतंत्र राज्ये निर्माण करण्याचा जेंव्हा केंद्रातील तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारने निर्णय घेतला होता त्याच्या आधी तेलंगणाच्या अस्मितेसाठी याच के. चंद्रशेखर राव यांनी काँग्रेस सोडून तेलंगणा राष्ट्र समिती नावाचा प्रादेशिक पक्ष स्थापन केला होता. त्यानंतर स्वतंत्र तेलंगणा निर्माण झाल्यावर त्याच पक्षाच्या झेंड्याखाली त्यांनी निवडणूक लढविली आणि बहुमत मिळवून ते मुख्यमंत्री झाले. असे म्हणतात की, काँग्रेस श्रेष्ठी आणि के. चंद्रशेखर राव (K. Chandrashekhar Rao) यांच्यात आंध्र प्रदेशाच्या विभाजनाच्या आधी झालेल्या परस्पर सामंजस्यानुसार तेलंगणा राज्याची निर्मिती झाल्यावर तेलंगणा राष्ट्र समिती हा प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्यात येईल परंतु तेलंगणात सत्ता मिळाल्यानंतर मात्र के. चंद्रशेखर राव (K. Chandrashekhar Rao) यांनी त्यांचा शब्द पाळला नाही आणि नंतर तर केंद्रातील काँग्रेसचे सरकार जाऊन काँग्रेस पक्षाचीही वाताहत झाली त्यामुळे के. चंद्रशेखर राव के. चंद्रशेखर राव (K.Chandrashekhar Rao) यांचे चांगलेच फावले. आपल्या लोकप्रियतेचा फायदा घेत त्यांनी मुख्यमंत्री म्हणून तेलंगणावरील आपली पकड घट्ट केली आहे.
====
हे ही वाचा: उत्तरप्रदेशच्या राजकारणातील नवं वादळः अपर्णा यादव
====
मात्र त्यांना आता मोदी-विरोधाच्या निमित्ताने केंद्रीय पातळीवर नेतृत्व करण्याची स्वप्ने पडू लागली आहेत त्यामुळेच त्यांनी ‘तिसरी (महा) आघाडी’ स्थापन करण्यासाठी वेगाने हालचाल सुरु केली असावी असे दिसते. अर्थात काँग्रेस या राष्ट्रीय पक्षाला वगळून ही तिसरी आघाडी कशा प्रकारे स्थापन होईल आणि तिला कितपत यश मिळेल याबाबत खुद्द या आघाडीचे नेतेच सांशक आहेत. काँग्रेसने देखील या तिसऱ्या आघाडीबाबत आतापर्यंत तरी फारसे स्वारस्य दाखविलेले नाही. काँग्रेसला ‘एकला चलो रे’ चेच धोरण स्वीकारायचे आहे असे दिसते. उत्तर प्रदेश निवडणुकीत काँग्रेसने आपल्या या धोरणाची अंमलबजावणी केली आहे.
====
हे ही वाचा: आठवणीतले एन.डी.पाटील: दाजी जेव्हा उनाड मुलांनाही शाबासकी देतात….!
====
देशात यापूर्वीही ‘तिसऱ्या आघाडीचे प्रयोग झाले आहेत मात्र ते फार काळ टिकले नाहीत असा इतिहास आहे त्यामुळे २०२४ साली भाजपविरोधात देशपातळीवर काँग्रेस वगळून महा आघाडी स्थापन करण्याचा प्रयोग कितपत यशस्वी होईल हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. तेलंगणाची राजधानी असलेल्या हैदराबाद या ऐतिहासिक शहरात ‘चारमिनार’ नावाची जगप्रसिद्ध वास्तू आहे. त्याचा संदर्भ घेता तिसऱ्या आघाडीच्या नावाखाली तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचे देशपातळीवर नेतृत्व करण्याच्या स्वप्नांचे ‘मिनार’ वास्तवात येतात का तेच आता पहावयाचे.
— श्रीकांत नारायण
( लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत )