Home » Gauri Puja : गौरी आवाहनाचा शुभ मुहूर्त आणि या सणाचे महत्व

Gauri Puja : गौरी आवाहनाचा शुभ मुहूर्त आणि या सणाचे महत्व

by Jyotsna Kulkarni
0 comment
Gauri Pujan
Share

गणेश चतुर्थीला सर्वत्र बाप्पांचे आनंदात आणि जल्लोषात आगमन झाले. गणरायाचे आगमन झाले की, मग वेध लागतात ते गणेशच्या पाठोपाठ येणाऱ्या गौरीचे. गणेशाची प्राणप्रतिष्ठा झाली की, घरातील महिलांची लगेच गौरींची तयारी सुरु होते. गौरी म्हणजे महिला वर्गाचा आवडता सण. महाराष्ट्रातील प्रत्येक प्रांतामध्ये गौरीचा सण मोठ्या जल्लोषात साजरा होतो. हा सण तीन दिवसाचा असतो. प्रांतानुसार हा सण साजरा करण्याच्या नानाविध पद्धती असल्या तरी सगळ्यांचा भाव आणि आनंद एकसारखाच असतो. गणपती चतुर्थीला बसले की सप्तमीला आगमन होते गौरीचे. (Ganesh Chatuthi)

भाद्रपद शुद्ध सप्तमीला अनुराधा नक्षत्रात गौरी आवाहन केले जाते. गौरी ही कधीही एकटी नसते तर त्या दोघी बहिणी असल्याने त्यांना ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरी म्हणतात. अनेक ठिकाणी या गौरींना गणपती बाप्पाची बहीण म्हटले जाते तर काही ठिकाणी त्यांना गणपती बाप्पाची आई म्हटले जाते. भाद्रपद शुद्ध सप्तमीला गौरी आवाहन केले जाते. अर्थात या दिवशी गौरी बसवल्या जातात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी गौरी पूजन केले जाते. याच दिवशी संध्याकाळी महिलावर्गाचा हळदी कुंकवाचा समारंभ देखील होतो. तर तिसऱ्या आणि शेवटच्या दिवशी गौरींचे विसर्जन केले जाते. प्रत्येक घरात आपापल्या घराण्याच्या चालीरिती, कुळधर्म-कुळाचार पळून गौरी आवाहन, पूजन आणि विसर्जन केले जाते. काही घरांत गणपती बसत असला तरी गौरी बसत नाही. यंदा देखील आता महिला वर्ग याच माहेरवाशिणी असलेल्या गौरींच्या आगमनाची आणि स्वागताची तयारी करत आहे. (Marathi News)

गौरी आवाहन २०२५ माहिती
रविवारी, ३१ ऑगस्ट २०२५ रोजी गौरीचे आवाहन केले जाईल. ज्येष्ठा गौरीचे आवाहन सायं ५ वाजून २५ मिनटापर्यंत करता येणार आहे. सोमवारी, १ सप्टेंबर २०२५ रोजी गौरीची पूजा केली जाते. या गौरी पूजनाचा शुभ मुहूर्त पहाटे ५ वाजून ५९ मिनिटांपासून ते संध्याकाळी ६ वाजून ४३ मिनिटांपर्यंत आहे. याच दिवशी संध्याकाळी हळदी कुंकू केले जाईल. तर गौरी विसर्जन मंगळवार, २ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ०९.५० पर्यंत करता येईल. (Latest Marathi Headline)

Gauri Pujan

=========

Ganesh Chaturthi : गणेश जयंती आणि गणेश चतुर्थीमधील फरक

=========

माहेरवाशीण असणाऱ्या या गौरींचा मनोभावे पाहुणचार केला जातो. कोकणात किंबहुना सगळीकडेच या सणासाठी मुली माहेरी जातात. कोकणात काही भागात फुलांच्या गौरींची पद्धत आहे. नदीवरून पाच खडे आणि गौरीची फुलं आणली जातात. त्या फुलांची घरी आणल्यावर पूजा केली जाते आणि त्याची गौरी बांधतात. तिला साडी, दागिने मुखवटा घालतात. काही भागांत मूर्तींची पूजा होते. काही ठिकाणी शाडू मातीचे, पितळेचे देखील मुखवटे असतात. त्यांना धड आणि कोठ्यांवर बसवले जाते. अनेक ठिकाणी खड्यांच्या गौरी देखील बसवल्या जातात. बऱ्याच भागात लाकडी गौरी असतात. मुखवटेही असतात. दरवर्षी त्यांना साडी नेसवून अगदी देवाप्रमाणे नटवतात. महिला आपल्या गौरीचा साजश्रृंगार प्रेमाने करतात. (Top Marathi Headline)

ज्येष्ठा गौरींना विदर्भात ‘महालक्ष्म्या’ म्हणतात. ‘लक्ष्मी’ या शब्दाआधी ‘महा’ हे विशेषण लावून ‘महालक्ष्मी’ हा शब्द तयार झाला. मराठवाड्यात ‘लक्ष्म्या’, तर कोकणात ‘गौरी’ म्हटले जाते. काही प्रदेशात गौरी पूजनाला महालक्ष्मी पूजनाची उपासना देखील मानली जाते. या सणात गौरीच्या मूर्ती सजवल्या जातात आणि विशेष पूजा केली जाते. भारतातील प्रत्येक प्रदेशाची स्वतंत्र संस्कृती आहे आणि यातील बहुतेक संस्कृती ५००० वर्षे जुन्या आहेत. यामध्ये शाडू, पितळे, कापडी, फायबरचे असे अनेक प्रकार पाहायला मिळतात. काही जण केवळ मुखवट्यांची पूजा करतात, तर काही जणांकडे उभ्या गौरी असतात. (Todays Marathi Headline)

परंपरेनुसार घरातील मुख्य दाराजवळ असलेल्या तुळशीपासून ते गौरी स्थापनाच्या जागेपर्यंत रांगोळीने लक्ष्मीच्या पावलांचे ठसे काढले जातात. त्यावर हळदी कुंकू टाकले जाते. त्यावरून गौरींचे मुखवटे आणले जातात. गौरीचे आगमन करताना ते वाजत गाजत केले जाते. अतिशय मंगलमय आणि शुभ वातावरणात या गौरी घरी येतात. गौरींचे आगमन हे नक्षत्रानुसार होते. अनुराधा नक्षत्रामध्ये गौरींचे आगमन होते आणि मूळ नक्षत्रात त्यांचे विसर्जन केले जाते. यावेळी ”गौरी आली, सोन्याच्या पावली…गौरी आली, चांदीच्या पावली…गौरी आली, गाई वासराच्या पावली…गौरी आली, पुत्र-पौत्रांच्या पावली…” असे म्हणत गौरींचे माहेरवाशीणीसारखे स्वागत केले जाते. त्यांना नवीन साड्या आणि दागदागिने घालून सजवले जाते. (Latest Marathi News)

स्त्रिया साज शृंगार करून या गौरींचे स्वागत करतात. गौरीची स्थापना करण्यापूर्वी त्यांना घरातील समृद्धी, दूध-दुभत्याची अशा गोष्टी आवर्जून दाखवतात. महाराष्ट्रातील काही भागात सुगडाच्या तर काही ठिकाणी मुखवट्याच्या गौरी बसवल्या जातात. या दिवशी ज्येष्ठा आणि कनिष्ठा या दोन्ही गौरीचे आगमन होते. हिंदू धर्मानुसार गौरी हे शिवाच्या शक्तीचे आणि गणेशाच्या आईचे रूप मानले गेले आहे. कोकणात काही ठिकाणी खुर्चीवर बसलेली गौरी पाहायला मिळते. तसेच समुद्र किंवा नदीतील खडा आणून पूजण्याची रितही असते. काही ठिकाणी तांब्यावर चेहरा रेखाटून गौरी पूजन केले जाते. प्रत्येक कुटुंबात आपआपल्या पद्धतीनुसार गौरी बसविल्या जातात. मनोभावे गौरींची स्थापना करून त्यांचे पूजन केले जाते. (Top Trending News)

Gauri Pujan

या गौरींची देखील एक आख्यायिका सांगितली जाते. ‘समुद्र मंथन’ या लेखात सांगितल्याप्रमाणं, मंथनातून ‘श्री महालक्ष्मी’ आणि त्यांची बहीण ‘श्री अलक्ष्मी’चा जन्म झाला. श्री महालक्ष्मी म्हणजे ‘येणारं धन’ आणि श्री अलक्ष्मी म्हणजे ‘येणारं धन जे खर्च होतं’. याप्रमाणं लक्ष्मीची थोरली बहीण ‘अलक्ष्मी’ ही देखील पूजनीय आहे. ‘समुद्र मंथना’तून अनेक रत्नांबरोबर लक्ष्मी हे रत्न निघालं. साक्षात श्री विष्णूनं श्री लक्ष्मीचा पत्नी म्हणून स्वीकार करण्याचा निश्चय केला. त्यावेळी आपल्या ज्येष्ठा भगिनीचा विवाह (अलक्ष्मी) झाल्याशिवाय आपण विवाह करणार नाही, असं श्री लक्ष्मीनं सांगितल्यावर विष्णूने तिचा विवाह एका तपस्वीशी लावून दिला. (Top Marathi News)

=========

Ashtavinayak : अष्टविनायकांमधील दुसरा गणपती- थेऊरचा चिंतामणी

Radha : राधा अष्टमीचे व्रत म्हणजे काय? कधी केले जाते हे व्रत?

=========

श्री अलक्ष्मीच्या उपद्रवी अवगुणामुळं तो तपस्वी वनात निघून गेला. तेव्हा श्री अलक्ष्मी अश्र्वत्थ (पिंपळाचे झाड) वृक्षाखाली रडत बसली. तिथून श्री विष्णू जात असता त्यांनी तिला रडताना पाहिलं. तिची हकिकत ऐकून त्यांनी तिचं सांत्वन केलं आणि तिला तीन ‘वर’ (वरदान) दिले. पहिला वर, जिथे भक्तीचा अभाव, आळस, व्यसनाधीनता, नास्तिकता, अधर्म असेल तिथे तिने वास्तव्य करावे. दुसरा वर, शनिवारी अश्र्वत्थास प्रदक्षिणा घालणाऱ्यास तिने पिडा देऊ नये. तिसरा वर, दरवर्षी भाद्रपद महिन्यात ज्येष्ठा नक्षत्रावर तिची पूजा केली जाईल. तेव्हापासून ज्येष्ठा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ‘लक्ष्मी’ व ‘अलक्ष्मी’ या दोघी बहिणींची पूजा केली जाते, अशी आख्यायिका आहे. (Top Stories)

अजून एका पौराणिक कथेनुसार असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया आपले सौभाग्य अक्षय करण्यासाठी गौरीला शरण गेल्या. तिची प्रार्थना केली तेव्हा श्री गौरीने भाद्रपद शुद्ध अष्टमीला असुरांचा संहार करून पृथ्वीवरील प्राण्यांना सुखी केले. अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी स्त्रिया ज्येष्ठा गौरी हे व्रत करतात. याला गौरी गणपती किंवा महालक्ष्मी पूजन देखील म्हटले जाते. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.