१५ ऑगस्ट २०२१ पासून अफगाणिस्तानमध्ये तालिबानचे शासन आहे. मौलवी हिबतुल्ला अखुंदजादा यांच्या नेतृत्वाखाली तालिबानमध्ये इस्लामिक कायद्यानुसार कामकाज करण्यात येत आहे. याच कायद्यानुसार अफगाणिस्तानमध्ये झालेल्या एका मृत्युदंडाच्या शिक्षेमुळे अवघे जग हादरले आहे. हा न्याय आहे की क्रूरता, अशी चर्चा यामुळे सुरु झाली आहे. अफगाणिस्तानमधील खोस्त मध्ये एका मोकळ्या मैदानात १३ वर्षाच्या मुलानं एका व्यक्तीची हत्या केली. हा मुलगा जेव्हा ही हत्या करत होता, तेव्हा त्याच्या साक्षीसाठी ८०००० हून अधिक नागरिक उपस्थित होते. या हत्येनंतर या मुलाला कुठलिही शिक्षा झाली नाही, तर त्याच्या समर्थनार्थ या जमावानं बेभान होऊन घोषणा दिल्या. ही घटना वाचताना जेवढी भयानक आहे, त्याहून अधिक ती पाहतांना वाटते. (Taliban)

अफगाणिस्तानातील खोस्त येथे हजारो लोकांच्या समोर धक्कादायक मृत्युदंडाची शिक्षेची अंमलबजावणी करण्यात आली. यात एका १३ वर्षीय मुलाने आपल्या कुटुंबाच्या खुन्याची गोळ्या घालून हत्या केली. या सार्वजनिक हत्येमुळे जगभरातून तालिबानी शासनावर टीका होत आहे. ज्या मुलानं आपल्या कटुंबाच्या मारेक-याला मारलं, तो अवघा १३ वर्षाचा आहे. अशा मुलाच्या हाती बंदूक देऊन आणि त्याच्याकडून हत्या करुन घेऊन तालिबान शासनानं काय मिळवलं, हा प्रश्नही विचारण्यात येत आहे. सोबतच अफगाणिस्तानमधील मानवी हक्कांबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. हे सर्व प्रकरणच अफगाणिस्तानमधील न्यायव्यवस्थेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. अफगाणिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आणि तालिबानचा सर्वोच्च नेता हिबतुल्ला अखुंदजादा यांच्या मान्यतेनंतर ही शिक्षा झाली आहे. यासंदर्भात एक व्हिडिओही काढण्यात आला आहे. हा व्हिडिओ आता जगभर व्हायरल झाला आहे. (International News)
ही घटना अफगाणिस्तानच्या पूर्वेकडील खोस्त भागामध्ये झाली. येथील एका मोठ्या मैदानात मंगल नावाच्या एका गुन्हेगाराला सार्वजनिकरित्या फाशी देण्यात आली. फक्त फाशी देऊनच त्याला मारण्यात आले नाही, तर एका १३ वर्षीय मुलाने या मंगलवर गोळ्याही झाडल्या. खोस्तमधील तालिबान गव्हर्नरचे प्रवक्ते मुस्तगफर गुरबाज यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. गुन्हेगार म्हणून पकडण्यात आलेल्या मंगल नावाच्या व्यक्तीला १० महिन्यांपूर्वी एका हत्याकांडात दोषी ठरवण्यात आले. त्याने खोस्त येथील रहिवासी अब्दुल रहमान आणि त्याच्या कुटुंबातील एकूण १२ सदस्यांची अली शिर आणि तेरेझियो जिल्ह्यांमध्ये हत्या केली. (Taliban)
२०२१ मध्ये अफगाणिस्तानमध्ये सत्तेत आल्यापासून, तालिबानने अफगाणिस्तानात कठोर शरिया कायदा लागू केला आहे. यामध्ये सार्वजनिक फाशी आणि सार्वजनिक स्थळी चाबकाचे फटके मारण्याच्या शिक्षेचा समावेश आहे. तालिबान शासक एकट्या महिलांना अशाप्रकारे चाबकाने मारण्याची शिक्षा देतात. तालिबान सत्तेत आल्यापासून अशाप्रकारे सार्वजनिक स्थळी फाशी देण्याच्या घटनाही झाल्या आहेत. आत्ता जी फाशी झाली, ती ११ वी सार्वजनिक फाशी ठरली आहे. गुन्हेगार मंगलने अब्दुल रहमान आणि त्याच्या कुटुंबातील इतर १२ सदस्यांची निर्घृण हत्या केल्याचे सिद्ध झाल्यामुळे अफगाण सर्वोच्च न्यायालयाने त्याला हत्येचा दोषी ठरवले. न्यायालयीन कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर, तालिबानने पीडितेच्या कुटुंबाला मंगलला माफ करण्याचा पर्याय दिला होता. मात्र त्या कुटुंबाने न्यायाची मागणी केली. त्यामुळे मृताच्या कुटुंबातील एका १३ वर्षीय सदस्याला तो गुन्हेगाराला माफ करणार का, हे न्यायालयानं विचारलं. (International News)

या प्रश्नावर या १३ वर्षाच्या मुलानं स्पष्टपणे नकार देत पुन्हा समान न्यायाची मागणी केली. त्यामुळेच न्यायालयानं गुन्हेगाराला सार्वजनिक फाशीसह गोळी झाडून मारण्याची शिक्षा सुनावली. ही शिक्षा जेव्हा देण्यात येणार होती, त्या दिवसाची आधी या भागातील जनतेला माहिती देण्यात आली. त्यावेळी खोस्त शहरातील मैदान गर्दीने खचाखच भरलेले होते. मैदानाच्या बाजुच्या भिंतीवरही लोक बसले होते. स्थानिक वृत्तांनुसार, सुमारे ८०,००० लोक या सार्वजनिक फाशीचे साक्षीदार होण्यासाठी आले होते. फाशी दिल्यावर त्या १३ वर्षाच्या मुलानंही गुन्हेगारावर पाच गोळ्या झाडल्या. गोळ्यांचे आवाज येताच गर्दीने धार्मिक घोषणाबाजी केली. सोबतच राष्ट्रीय सुरक्षा मजबूत करण्यासाठी, लोकांचे हक्क चांगल्या प्रकारे सुनिश्चित करण्यासाठी आणि देशभरात इस्लामिक शरिया कायद्याची योग्य अंमलबजावणी करण्यासाठी प्रार्थनाही करण्यात आली. (Taliban)
========
हे देखील वाचा : Pakistan : वेटींग लिस्टवर मुनीर !
========
या घटनेचा व्हिडिओ जगभर व्हायरल झाल्यावर त्यावर आता टीका होत आहे. अफगाणिस्तानसाठी संयुक्त राष्ट्रांचे विशेष दूत रिचर्ड बेनेट यांनी ही घटना अमानवीय, क्रूर आणि आंतरराष्ट्रीय कायद्याच्या विरुद्ध असल्याचे सांगितले आहे. त्यांनी तालिबानकडे अशा सार्वजनिक फाशी आणि सूडाच्या हत्या त्वरित थांबवण्याची मागणी केली. असे असले तरी स्थानिक जनता या शिक्षेचे समर्थन करत आहे. त्यांच्यामतानुसार अशा शिक्षेमुळे भविष्यात कोणीही कोणालाही मारण्याचे धाडस करणार नाही. आता ही घटना न्याय आहे की क्रूरता याची चर्चा सुरु आहे. (International News)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
