“माणूस एकतर विवाहित असू शकतो किंवा तो आनंदी असू शकतो, मात्र दोन्ही कधीही असू शकत नाही.” या अनिल कपूरच्या संवादाभोवती ‘जुग जुग जियो’ हा सर्व चित्रपट फिरतो. लग्नाच्या तीन गोष्टी सांगणारा हा चित्रपट अनिल कपूर आणि नितू कपूरच्या सर्वांगसुंदर अभिनयानं तारला आहे. विशेष कौतुक नितू कपूरचं! तिचा अभिनय आहे तसाच आहे, सहज, सुंदर आणि फ्रेश करणारा…राज मेहतांच्या जुग जुग जियोमध्ये या दोघांसह कियारा अडवाणी, वरुण धवन, मनीष पॉल आणि आपली प्राजक्ता कोळी यांच्याही भूमिका आहेत. हिंदीमध्ये या स्टारसोबत प्राजक्ताचा शिरकाव लक्षात रहाण्यासारखा आहे. (Jugjugg Jeeyo Movie Review)
जुग जुग जियोमध्ये दोन लग्नाची आणि एका होणाऱ्या लग्नाची कथा आहे. कुकू (वरुण धवन) आणि नैना (कियारा अडवाणी) हे शालेय मित्र आणि तेव्हापासूनच त्यांचे एकमेकावर प्रेम आहे. त्यांचे लग्न होते. मात्र वैवाहिक आयुष्य आणि प्रेमिका – प्रेयसी यात जमीन आस्मानाचा फरक असल्याची जाणीव त्यांनी होते. लग्नानंतर त्यांच्यात खटके उडतात आणि लग्नाच्या पाचव्या वाढदिवसाच्या दिवशी दोघेही एकमेकांपासून वेगळं व्हायचं ठरवतात आणि घटस्फोटाचा निर्णय घेतात.
इकडे कुकूचे वडील भीम (अनिल कपूर) मीरा नावाच्या शिक्षिकेच्या प्रेमात पडतात. त्यांना त्यांची पत्नी गीतापासून (नीतू कपूर) घटस्फोट हवा असतो. मुलगा आणि वडील, या दोघांचीही लग्न घटस्फोटाच्या मार्गावर आलेली असतांनाच कुकूची बहीण गिन्नीचं(प्राजक्ता कोळी) लग्न ठरते.
बहिणीच्या लग्नात कुठलाही गोंधळ होऊ नये म्हणून कुकू नैनासह घरी येतो आणि लग्नानंतर घटस्फोट घेणार असल्याचे कुटुंबाला सांगण्याचे ठरवतो. तसाच निर्णय कुकूचे वडील भीमही घेतात. यात अजून गम्मत म्हणजे गिन्नीही एकाच्या प्रेमात आहे. पण तिचे लग्न दुस-याच बरोबर होत आहे. त्यामुळे तीसुद्धा वेगळ्याच विचारात आहे. (Jugjugg Jeeyo Movie Review)
प्रेम आणि कुटुंब यांच्यात कोणाची निवड करायची, हा प्रश्न या तिन्ही जोडप्यांसमोर आहे. चित्रपटाची कथा प्रत्येक व्यक्तीच्या लग्न आणि घटस्फोट या संकल्पनांभोवती फिरत रहाते. कुटुंब आणि कुटुंबाची प्रतिष्ठा यासाठी लग्नाचे नाटक…नात्याचे बंध यासारख्या वाक्यात सर्व आपल्याला गुरफटून घेतात.
एकूण धर्मा प्रॉडक्शनचे चित्रपट जसे असतात तसाच ‘जुग जुग जियो’ हा चित्रपट आहे. भव्यदिव्य सेट्स, लग्नाच्या वेळी सुंदर कपड्यात वावरणारे तरुण-तरुणी, नृत्य आणि बेभान संगीत. या सर्वात उठून दिसते ती नितू कपूरच. ‘जुग जुग जियो’ चित्रपटात तिच भाव खाऊन जाते. अनिल कपूर आणि नीतू कपूर म्हणजे या चित्रपटाचा आत्मा आहेत, म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. या दोन्ही अनुभवी कलाकारांनी चित्रपटाला प्रेक्षणीय पातळीवर नेऊन ठेवले आहे. कित्येक प्रसंगांत कियारा अडवाणी आणि वरुण धवनवर हे दोन्ही अनुभवी कलाकार भारी पडले आहेत. (Jugjugg Jeeyo Movie Review)
====
हे देखील वाचा – 777 चार्ली: जेव्हा अपघातामध्ये जखमी झालेल्या कुत्र्याचा लळा लागतो
====
मनीष पॉलचा अभिनयदेखील चांगला असाच आहे. आपल्या मराठमोळ्या प्राजक्ताचा वावर अतिशय सुखद असा आहे. एकूण कुकू आणि भीमच्या लग्नाचे काय होते…गिन्नीचे लग्न नेमके कोणाबरोबर होते…या सर्वांचे उत्तर मिळवायची असतील, तर जुग जुग जियो बघण्यासारखा आहे.
– सई बने