रशिया आणि युक्रेन युद्धाला आता हजार दिवस होत आले आहेत. रशियनं आपल्या शेजारी देशावर जेव्हा आक्रमण केलं, तेव्हा हे युद्ध अगदी आठवड्याभराचं असेल असा अंदाज भल्याभल्या तज्ञांनी व्यक्त केला होता. युक्रेन हे रशियाच्या पुढे अगदी पालापाचोळ्यासारखे होते. रशियाच्या सैन्य ताकदीपुढे त्यांचा पाडाव लागणार नाही, असा अंदाज होता. मात्र हा अंदाज पार फोल ठरला. युक्रेननं रशियाच्या आक्रमणाला तोंड दिले. अर्थात या सर्वांत युक्रेनची अर्थव्यवस्था पार झोपली गेली. लाखो लोकांनी दुस-या देशात आश्रय घेतला. लाखो नागरिकांची कत्तल झाली. पण युक्रेननं अमेरिका आणि अन्य देशांकडून मिळणा-या युद्ध सामुग्रीच्या जोरावर युद्ध सुरुच ठेवले. आता अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचे सरकार आल्यावर हे युद्ध संपेल अशी आशा होती. कारण डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनला युद्ध सामुग्री देण्याच्या भूमिकेवर टिका केली होती. मात्र त्याआधीच अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी एक धक्कादायक निर्णय घेतला आहे. अध्यक्षपद सोडायला अवघे काही दिवस राहिले असतांना जो बिडेन यांनी युक्रेनला रशियन लक्ष्यांवर हल्ला करण्यासाठी लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा वापर करण्यास मान्यता दिली आहे. (Joe Biden)
या क्षेपणास्त्रांचा उपयोग कुर्स्क, पश्चिम रशियामध्ये रशियन आणि उत्तर कोरियाच्या हल्ल्यांपासून युक्रेनियन सैन्याच्या बचावासाठी केला जाऊ शकतो. जो बिडेन यांच्या या निर्णयावर रिपब्लिकन पक्षाने जोरदार टीका केली आहे. ट्रम्प यांच्या मोठ्या मुलानं हा निर्णय म्हणजे, तिसरे महायुद्ध सुरु करण्यासाठी बिडेन सरकारचा पुढाकार अशा शब्दात टिका केली आहे. तर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी या घटनेचे गंभीर परिणाम होणार असल्याची धमकी दिली आहे. रशियावर युक्रेनच्या हल्याला हजार दिवस होत असतांना संपत आलेले हे युद्ध अमेरिकेच्या एका निर्णयामुळे पुन्हा भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जगभरात जे तणावाचे वातावरण आहे, त्याची सुरुवात रशिया-युक्रेन यांच्या युद्धापासून झाली. फेब्रुवारी 2022 मध्ये या युद्धाची दाहकता जाणवू लागली. सुरुवातीला अगदी काही दिवसात रशिया युक्रेनला युद्धात पराभूत करेल असा अंदाज होता. मात्र यूक्रेनी राष्ट्रपति वलोडिमिर ज़ेलेंस्की यांना युरोपमधील देशांमधून मिळालेल्या मदतीमुळे हे युद्ध आत्ताही चालू आहे. (International News)
या युद्धामुळे दोन्ही देशांचा भुगोल बदलला आहे. लाखो लोक बेघर झाले आहेत. दोन्ही देशांमध्ये मृत्युचा आकडा मोठा आहे. विशेषतः युक्रेनमध्ये किती नागरिक मारले गेले आहेत, याची खरी आकडेवारी अद्यापही समोर आलेली नाही. एका अहवालानुसार युक्रेनमध्ये सुमारे 4 दशलक्ष लोक विस्थापित झाले आहेत. तर 6 दशलक्षाहून अधिक युक्रेनियन नागरिकांनी परदेशात आश्रय घेतला आहे. याशिवाय या युद्धात आतापर्यंत दहा लाखांहून अधिक लोक मारले गेले आहेत. तर त्याहून अधिक नागरिक गंभीर जखमी झाले असून त्यांना अपंगत्व आले आहे. सद्यस्थितीत युक्रेनमधील शहरे, गावे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. या सर्वांची पुन्हा घडी बसवण्यासाठी युद्धामध्ये जेवढा पैसा खर्च झाला आहे, त्यापेक्षा दुप्पट निधीची गरज भासणार आहे. मुख्य म्हणजे, युक्रेनमधील शेतीयोग्य जमीन नष्ट झाली आहे. या जमिनीवर पुढच्या काही वर्षात शेती उत्पन्न होण्याची आशा नाही. त्यामुळे युक्रेनमधील जनतेला भविष्यात अन्नधान्याचाही प्रचंड तुटवडा जाणवू लागणार आहे. (Joe Biden)
या युद्धात रशिया आणि युक्रेनचे किती नागरिक मारले गेले आहेत, याची खरी आकडेवारी मिळत नाही. दोन्हीही देशांनी ही आकडेवारी लपवण्याचा प्रयत्न केला आहे. काही अहवालांमध्ये शहीद झालेल्या सैनिकांची संख्या सुमारे दोन लाख तर जखमींची संख्या सुमारे चार लाख आहे. ऑगस्ट 2024 पर्यंत युक्रेनमध्ये किमान 11,743 नागरिक मारले गेले आणि 24,614 जखमी झाल्याचीही माहिती आहे. मारल्या गेलेल्या नागरिकांमध्ये लहान मुलांचा समावेश अधिक आहे. युद्धामुळे युक्रेनचा जन्मदर आता अडीच वर्षांपूर्वीच्या एक तृतीयांश इतका घसरला आहे. युक्रेनची 25 टक्के लोकसंख्या नष्ट झाली आहे. युक्रेन सरकारच्या सगळ्या विकासकामांचा खर्च युद्धावर खर्च होत आहे. आता युक्रेनने 2025 च्या प्रस्तावित अर्थसंकल्पात सुमारे 26 टक्के म्हणजे $53.3 अब्ज संरक्षणावर खर्च करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. अर्थात युक्रेनकडे एवढा पैसा नाही. युरोपमधील देशांकडून येणा-या मदतीवर ही आकडेवारी मांडण्यात आली आहे. (International News)
======
हे देखील वाचा : टीव्ही होस्ट ते संरक्षण मंत्री
====
जर युक्रेनची पुनर्बांधणी करायची असेल तर त्यासाठी अंदाजे रक्कम $486 बिलियनच्याहून अधिक निधी लागणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यात गृहनिर्माण, वाहतूक, वाणिज्य आणि उद्योग, ऊर्जा आणि कृषी क्षेत्र या सर्वांचा समावेश आहे. युद्धाची ही सगळी पार्श्वभूमी असतांना अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी घेतलेला निर्णय यात अधिक दाहकता आणण्याची शक्यता आहे. त्यांच्या निर्णयानं युक्रेन आर्मी अमेरिकेची टॅक्टिकल मिसाइल सिस्टम वापरणार आहे. 1991 च्या आखाती युद्धात अमेरिकेने पहिल्यांदा इराकमध्ये या क्षेपणास्त्रांचा वापर केला होता. यामुळे युक्रेन थेट रशियातील महत्त्वाच्या शहरांना लक्ष करु शकते. असे झाले तर रशिया अमेरिकन शस्त्रांचा कोणताही हल्ला युद्धात नाटोचा थेट हस्तक्षेप मानेल. हे क्षेपणास्त्र डागल्यास त्याला चोख प्रत्युत्तर देण्याची धमकी रशियानं देत गरज भासल्यास रशिया अण्वस्त्रांचाही वापर करेल असेही सांगितले आहे. जो बिडेन यांचा हा निर्णय तिस-या महायुद्धाची नांदी असल्याचे ट्रम्प आणि एलॉन मस्क यांनी करुन बिडेन सरकारवर टिका केली आहे. अर्थात असे झाले तर जो बिडेन यांच्या कारकिर्दीवर एक काळी रेघ मात्र ओढली जाणार आहे. (Joe Biden)
सई बने